Saturday, January 24, 2026

आंतरराष्ट्रीय कृषि महोत्सवात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे नैसर्गिक व सेंद्रिय शेतीवर मार्गदर्शन

 



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी श्री स्वामी समर्थ ट्रस्ट, दिंडोरी यांच्या वतीने नाशिक येथील युवक महोत्सव मैदानावर दिनांक २३ ते २७ जानेवारी २०२६ दरम्यान आयोजित आंतरराष्ट्रीय कृषी महोत्सवात दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी नैसर्गिक व सेंद्रिय शेती या विषयावर शेतकरी, कृषी उद्योजक तसेच युवकांना मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासपीठावर परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे, श्री स्वामी समर्थ ट्रस्टचे पदाधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरूंनी सांगितले की, नैसर्गिक शेती ही शाश्वत विकासाची प्रभावी दिशा असून मातीचे आरोग्य जपणे, पर्यावरणाचे संवर्धन करणे आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. रासायनिक निविष्ठांवरील अवलंबित्व कमी करून स्थानिक व नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर केल्यास शेती अधिक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले.

तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेली बैलचालित सुधारित अवजारे व यंत्रे वापरल्यास नैसर्गिक व सेंद्रिय शेतीतील मशागतीवरील खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या वतीने नैसर्गिक शेतीच्या प्रसारासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यापीठामार्फत नैसर्गिक शेती मॉडेलची स्थापना, प्रात्यक्षिके, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केंद्रांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषि महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित भव्य प्रदर्शनात विद्यापीठाच्या विविध कृषी तंत्रज्ञान, कृषी उत्पादने, प्रक्रिया-आधारित नमुने तसेच नैसर्गिक शेतीवर आधारित मॉडेलला शेतकरी व नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. माननीय कुलगुरूंनी विविध स्टॉलना भेट देऊन उत्पादकांशी प्रत्यक्ष संवाद साधला व त्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले.

या प्रदर्शनात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे दालन पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण योजना प्रभारी अधिकारी तथा संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आले होते.

यामध्ये पशुशास्त्रज्ञ डॉ. संदेश देशमुख, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री अजय वाघमारे, अभियंता श्री दीपक राऊत, श्री दीपक यंदे, श्री रुपेश काकडे व श्री मंगेश खाडे यांनी उपस्थित शेतकरी व अभ्यागतांना तांत्रिक मार्गदर्शन केले.

विद्यापीठाच्या अवजारे स्टॉलला विविध मान्यवरांनी भेटी दिल्या. यामध्ये परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे, या महोत्सवाचे संयोजक परमपूज्य माऊली आबासाहेब मोरे, सिने अभिनेते प्रवीण तरडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्टॉलला भेट देऊन विद्यापीठाच्या उपक्रमांचे कौतुक केले.

या आंतरराष्ट्रीय कृषी महोत्सवात देशभरातील शेतकरी, कृषि शास्त्रज्ञ, कृषि उद्योजक, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.