बायोमिक्सचा प्रसार उत्तर प्रदेशातही व्हावा: डॉ. नीरज कुमार श्रीवास्तव
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि उत्तर प्रदेश कृषि
विभागाचे निवृत्त सहसंचालक (अभियांत्रिकी) डॉ. नीरज कुमार श्रीवास्तव यांनी दिनांक
२९ मार्च रोजी विद्यापीठातील बायोमिक्स संशोधन व निर्मिती केंद्राला भेट दिली. या
भेटीदरम्यान त्यांनी बायोमिक्सच्या प्रभावीतेबाबत समाधान व्यक्त केले व या जैविक
उत्पादनाचा प्रचार व प्रसार उत्तर प्रदेशातही व्हावा, अशी
इच्छा व्यक्त केली.
बायोमिक्स हे जैविक
उत्पादन शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले असून, त्याची निर्मिती वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागामार्फत केली जाते. शेतातील
उत्पादनवाढीवर होणारे सकारात्मक परिणाम पाहता, बायोमिक्सच्या
वापराची व्याप्ती वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे
मत डॉ. श्रीवास्तव यांनी व्यक्त केले. यावेळी वनस्पती रोगशास्त्र विभागाचे
विभागप्रमुख डॉ. प्रफुल घंटे, बायोमिक्स संशोधन केंद्राचे
प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर अंबाडकर, तसेच संशोधन सहाय्यक
कपिल निर्वळ, सोमनाथ फाळके व इतर कर्मचारी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान
बायोमिक्सच्या संशोधन प्रक्रियेची पाहणी करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना अधिकाधिक
जैविक उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने
चर्चा करण्यात आली. या उपक्रमामुळे बायोमिक्सच्या प्रचार व प्रसाराला चालना मिळणार
असून शेतकऱ्यांना नैसर्गिक व परिणामकारक पर्याय उपलब्ध होण्यास मदत होईल.