वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मृद विज्ञान विभागास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांनी दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी भेट देऊन विभागातील शैक्षणिक, संशोधन व सेवा उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी
त्यांनी प्राध्यापक तसेच आचार्य व पदव्युत्तर विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत
मृदविज्ञान विषयाचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले.
माननीय कुलगुरूंनी
विभागातील सर्व प्रयोगशाळांची पाहणी करून त्यांचे पुनर्रचना व अद्ययावतीकरण
करण्याबाबत मार्गदर्शन केले. केंद्रीय माती परीक्षण प्रयोगशाळेतील उपकरणांच्या
नोंदी तपासून कार्यपद्धती अधिक शिस्तबद्ध करण्याच्या सूचना दिल्या. तसेच माती
परीक्षणासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र भेट नोंदवही ठेवण्यावर त्यांनी भर
दिला.
विद्यार्थ्यांकडून
विविध रासायनिक पृथक्करण प्रक्रियांची माहिती घेऊन त्यामध्ये तांत्रिक सुधारणा कशा
करता येतील, यावर सविस्तर चर्चा
करण्यात आली. ‘शेतकरी देवो भवः’ ही भावना केंद्रस्थानी ठेवून अत्याधुनिक
उपकरणांच्या माध्यमातून अधिक दर्जेदार माती परीक्षण सेवा उपलब्ध करून देण्याचे
निर्देश त्यांनी विभागास दिले.
या
भेटीदरम्यान प्रयोगशाळा, वाचनालय तसेच पायाभूत
सुविधांबाबत येणाऱ्या अडचणी समजून घेत प्राध्यापक व विद्यार्थ्यांशी सुसंवाद
साधण्यात आला. जागतिक पातळीवरील मृदविज्ञान संशोधन मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या
उपयोगात कसे आणता येईल, यावर सखोल चर्चा झाली. संशोधन
प्रकल्प ठरविताना शेतकऱ्यांच्या जमिनीशी निगडित समस्यांना प्राधान्य देण्याचे
स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
मनुष्यबळाचा
प्रभावी वापर, प्रयोगशाळेतील
उपकरणांची निगा, तसेच मृदा सुपीकता आराखडे, अन्नद्रव्य व्यवस्थापन, नैसर्गिक व सेंद्रिय
शेतीच्या अनुषंगाने संशोधन प्रकल्पांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज त्यांनी
अधोरेखित केली.
पदव्युत्तर
विद्यार्थ्यांनी आधुनिक उपकरणांचे आत्मविश्वासाने संचालन करून देशपातळीवर सक्षम
तांत्रिक मनुष्यबळ निर्मितीत योगदान द्यावे,
असे प्रतिपादन माननीय कुलगुरूंनी यावेळी केले.
या प्रसंगी
सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य,
विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांच्यासह विभागातील प्राध्यापक डॉ. अनिल
धमक, डॉ. महेश देशमुख, डॉ. सुरेश वाइकर,
डॉ. स्वाती झाडे, डॉ. बी. आर. गजभिये, डॉ. रामप्रसाद खंदारे, डॉ. संतोष चिक्षे, डॉ. संतोष पिल्लेवाड, डॉ. स्नेहल शिलेवंत तसेच विभागातील
सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

.jpeg)


