Friday, January 16, 2026

‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी वर्षानिमित्त वनामकृविच्या समुदायिक विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या समुदायिक विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेने, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांच्या निर्देशानुसार सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात शीख धर्माचे नववे गुरु, ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनकार्यावर, धर्मरक्षणासाठी केलेल्या अतुलनीय बलिदानावर तसेच मानवतेच्या रक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च त्यागावर आधारित माहितीपूर्ण व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आले. या व्हिडिओंच्या माध्यमातून त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाची, धार्मिक स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाची आणि समाजासाठी दिलेल्या प्रेरणादायी संदेशाची प्रभावी मांडणी करण्यात आली.

कार्यक्रमाचा मुख्य उद्देश युवकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक सहिष्णुता, मानवता, सत्य आणि त्याग यांसारखी मूल्ये रुजविणे हा होता. यावेळी उपस्थित विभाग प्रमुख डॉ. नीता गायकवाड, डॉ. वीणा भालेराव, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तथा विभाग प्रमुख डॉ. शंकर पुरी, प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी या व्हिडिओ सादरीकरणातून श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांच्या महान कार्याची सखोल माहिती घेतली व त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेतली.

हा कार्यक्रम अत्यंत श्रद्धा, आदर व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. समाजात धार्मिक स्वातंत्र्य व मानवतेच्या संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यास हा कार्यक्रम उपयुक्त ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

शेवटी, कार्यक्रम अधिकारी तथा विभाग प्रमुख डॉ. शंकर पुरी यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या निर्देशानुसार महाविद्यालयाच्या वतीने पुढील आठवडाभर विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करून ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या कार्याचा गौरव करण्यात येत असल्याची माहिती दिली.