माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात ‘एमएयुएस–७२५’ वाणासाठी मोठे यश
एमएयुएस- ७२५ चे झाड
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सोयाबीन संशोधन प्रकल्पाद्वारे यांनी विकसित केलेल्या
सोयाबीन पिकाच्या ‘एमएयुएस–७२५’ या वाणास
नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या वनस्पती वाण संरक्षण आणि शेतकरी हक्क
नोंदणी प्राधिकरणाकडून (Protection
of Plant Varieties and Farmers’ Rights Authority - PPV&FRA)
अधिकृत मान्यता
व नोंदणी प्राप्त झाली आहे. प्राधिकरणाने या वाणाची विद्यापीठाच्या नावे नोंदणी केली असून, विद्यापीठास या वाणावर वनस्पती वाण हक्क
प्रदान करण्यात आले आहेत. ही नोंदणी दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी देण्यात आली
असून नोंदणी क्रमांक REG/2025/0269 असा आहे.
‘एमएयुएस–७२५’ या वाणाची नोंदणी विद्यापीठासाठी
अत्यंत गौरवास्पद असून संशोधन क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण यश म्हणून मानली जात
आहे. हे यश माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व,
सातत्यपूर्ण मार्गदर्शन व प्रेरणेमुळे शक्य झाले. तसेच संशोधन
संचालक डॉ. खिजर बेग यांचे मोलाचे सहकार्य व शास्त्रीय मार्गदर्शन लाभले आहे.
हा वाण दि. २४
ते ३० डिसेंबर २०२१ दरम्यान झालेल्या ४९ व्या संयुक्त कृषि संशोधन व विकास
समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार,
अखिल भारतीय समन्वयित सोयाबीन संशोधन प्रकल्पांतर्गत एमएयुएस–७२५ हा
वाण स्थानिक व राष्ट्रीय तुल्यबळ वाणांपेक्षा उत्पादनात सरस आढळून आला आहे. तसेच
हा वाण विविध कीड व रोगांना मध्यम प्रतिकारक असल्याने मराठवाडा विभागासाठी
लागवडीसाठी शिफारस करण्यात आली होती.
भाकृअपचे उपमहासंचालक
(पीक विज्ञान)डॉ. टी. आर. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दि. २६ ऑक्टोबर २०२२ रोजी
झालेल्या केंद्रीय उपसमितीच्या ८९ व्या बैठकीनुसार हा वाण महाराष्ट्र राज्यासाठी
शिफारस करण्यात आला. त्यानंतर भारत सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या
दि. ६ मार्च २०२३ रोजीच्या अधिसूचनेद्वारे एमएयुएस–७२५ हा वाण महाराष्ट्रासाठी
अधिसूचित करण्यात आला.
या वाणाच्या
विकासासाठी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, माजी सोयाबीन पैदासकार डॉ. एस. पी.
मेहत्रे, सहाय्यक पैदासकार डॉ.
व्ही. आर. घुगे यांच्यासह अनेक शास्त्रज्ञ व संशोधन कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान
लाभले.
तसेच सदरील वाण निर्मिती साठी विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे,
डॉ.व्ही.के.खर्गखराटे, माजी संचालक संशोधन डॉ.डी.पी. वासकर सहाय्यक कीटक
शास्त्रज्ञ डॉ.डी.जी. मोरे, डॉ. आर. एस. जाधव, सहाय्यक पैदासकार श्री.
एस.बी.बोरगावकर, श्री. डी. एच. सारंग, श्रीमती एम.जे. पतंगे, वरिष्ठ संशोधन
सहाय्यक श्री. डी.व्ही. सुरनार, कृषि सहाय्यक श्रीमती के.डी. किंगरे, श्री. बी.एस.
रंधवे, यांची महत्वपूर्ण मदत मिळाली.
एमएयुएस–७२५
या वाणास नोंदणी व कायदेशीर संरक्षण मिळाल्यामुळे विद्यापीठाच्या संशोधन कार्यास
बळकटी मिळाली असून शेतकऱ्यांना उच्च उत्पादन देणारा,
रोगप्रतिबंधक व दर्जेदार वाण उपलब्ध होणार आहे. त्यामुळे राज्यातील
सोयाबीन उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सकारात्मक बदल होईल, असा विश्वास कृषि तज्ञांनी व्यक्त केला आहे.
‘एमएयुएस–७२५’
या वाणाची प्रमुख वैशिष्ट्ये
हा वाण लवकर
येणारा असून अवघ्या ९० ते ९५ दिवसांत पीक तयार होतो.
या वाणाची पाने निमपसऱ्या व चिरके स्वरूपाची असून झाडावर शेंगांचे प्रमाण
अधिक आढळते. विशेष म्हणजे यामध्ये २० ते २५ टक्के शेंगांमध्ये चार दाणे असतात,
त्यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
या वाणास प्रमुख कीड व रोगांबाबत मध्यम प्रतिकारक्षमता असून, त्यामुळे पीक संरक्षणाचा खर्च कमी होण्यास मदत
होते. तसेच हा वाण कोरडवाहू परिस्थितीतही चांगले उत्पादन देणारा असल्यामुळे अल्प पावसाच्या
भागातील शेतकऱ्यांसाठी तो उपयुक्त ठरणार आहे.
या वाणाची सरासरी उत्पादकता २५ ते ३१.५० क्विंटल प्रति हेक्टर इतकी
असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे
उत्पन्न वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. कमी कालावधीत अधिक उत्पादन, चांगली प्रतिकारक्षमता आणि कोरडवाहूसाठी अनुकूलता या गुणधर्मांमुळे हा वाण
शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरणार आहे.
एमएयुएस - ७२५ ची जांभळ्या रंगाची फुले
एमएयुएस - ७२५ च्या शेंगा


