Thursday, January 22, 2026

‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीद समागम वर्षानिमित्त विविध उपक्रमांची भव्य रॅलीने सांगता

 वनामकृविच्या अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालय व कृषि तंत्र विद्यालयाचा संयुक्त उपक्रम


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त जनजागृतीपर विविध साप्ताहिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांचे आयोजन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेने, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांच्या निर्देशानुसार आणि सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. संजीव बंटेवाड यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरीत्या राबविण्यात आले.

या सप्ताहभर चाललेल्या उपक्रमांमध्ये ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्याग, धर्मस्वातंत्र्य, मानवता व सहिष्णुतेचा संदेश युवकांपर्यंत पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात आला. यामध्ये त्यांच्या गौरवशाली जीवनकार्यावर आधारित चित्रफित प्रदर्शन, माहितीपर बॅनर्स, चित्रकला स्पर्धा, भाषण स्पर्धा तसेच निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या सर्व उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमांची सांगता म्हणून दि. २२ जानेवारी २०२६ रोजी ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या प्रतिमेची भव्य रॅली काढण्यात आली. सदर रॅलीत त्यांच्या बलिदानाचा जयघोष करत मानवता, धार्मिक सहिष्णुता व सामाजिक सलोखा यांचा संदेश समाजात पोहोचविण्यात आला. या रॅलीमध्ये सुमारे २०० हून अधिक विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

या वेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजीव बंटेवाड तसेच कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर खळगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमास कृषि महाविद्यालय व कृषि तंत्र विद्यालय अंबाजोगाई येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापकवर्ग, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक जाणीव, नैतिक मूल्ये व मानवतेची भावना वृद्धिंगत झाली, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.