वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ,
परभणी येथील सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र व शेकरू
फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “नैसर्गिक शेतीची संकल्पना” या विषयावर ऑनलाईन
मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि यांच्या प्रेरणेतून तसेच संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली
हा कार्यक्रम दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी संपन्न झाला. माननीय कुलगुरू यांनी सदरील
कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या तसेच उत्कृष्ट नियोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
हा उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी त्यांनी आयोजकांना
विशेष प्रोत्साहन दिले.
या कार्यक्रमात
अमरेली (गुजरात) येथील नैसर्गिक शेती महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा.
भौमिक मकवाणा यांनी नैसर्गिक शेतीची मूलभूत संकल्पना, तत्त्वज्ञान,
जैवविविधतेचे महत्त्व आणि शाश्वत शेती पद्धती याविषयी सखोल
मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनादरम्यान
त्यांनी रासायनिक निविष्ठांवरील अवलंबित्व कमी करून स्थानिक व नैसर्गिक
स्रोतांच्या आधारे उत्पादन खर्चात घट कशी करता येईल, याची माहिती दिली.
नैसर्गिक शेतीमुळे मातीचे आरोग्य सुधारते, पर्यावरणीय समतोल
राखला जातो तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस मदत होते, असे
त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात
नैसर्गिक शेतीचे पाच स्तंभ यामध्ये बीजामृत, जीवामृत/घनजीवामृत, मिश्र पीक पद्धती, आच्छादन आणि वाफसा यांचे महत्त्व
विशद करण्यात आले. तसेच देशातील विविध अग्रणी व्यक्तींच्या नैसर्गिक शेती
क्षेत्रातील कार्याचा आढावा घेण्यात आला.
यावेळी
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त जैविक निविष्ठांची निर्मिती, त्यांचा योग्य वापर,
मातीची सुपीकता वाढविण्याचे उपाय आणि कमी खर्चात शाश्वत उत्पादन
घेण्याच्या पद्धतींबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
या ऑनलाईन
कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, संशोधक, विद्यार्थी तसेच विविध भागांतील शेतकरी
मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमात प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून
संवाद साधून त्यांच्या शंका व समस्यांचे निरसन करण्यात आले. विशेष बाब म्हणजे हा
संपूर्ण कार्यक्रम हिंदी भाषेत पार पडला.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक डॉ. आनंद गोरे यांनी केले, तर सूत्रसंचालन व
आभारप्रदर्शन डॉ. मीनाक्षी पाटील यांनी केले. या उपक्रमामुळे नैसर्गिक शेतीविषयी
जनजागृती वाढून शाश्वत व पर्यावरणपूरक शेतीकडे वाटचाल करण्यास निश्चितच चालना
मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

.jpeg)

.jpeg)