वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाद्वारा ‘नैसर्गिक शेतीमधील अनुभव’ विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील सेंद्रीय
शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि शेकरू फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित सेंद्रीय व नैसर्गिक शेती प्रशिक्षण व संवाद मालिके अंतर्गत ‘नैसर्गिक शेतीमधील अनुभव’ या विषयावर दि. २० जानेवारी २०२६ रोजी ऑनलाइन
पद्धतीने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून मौजे तिवसा (जिल्हा यवतमाळ) येथील नैसर्गिक शेती तज्ज्ञ
पद्मश्री श्री. सुभाष शर्मा यांनी आपल्या अनुभवांवर आधारित सखोल मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय
भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, नैसर्गिक शेती ही केवळ शेती पद्धत नसून ती
शाश्वत विकासाकडे नेणारी एक व्यापक चळवळ आहे. उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांचा
आर्थिक ताण कमी करणे, जमिनीचे आरोग्य जपणे आणि पर्यावरणीय
संतुलन राखणे हे नैसर्गिक शेतीचे मुख्य उद्दिष्ट आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाने नैसर्गिक शेतीला एक अभियान म्हणून राबविण्याचा संकल्प केला असून
विद्यापीठातील सर्व घटक व संलग्न महाविद्यालयांमध्ये नैसर्गिक शेतीची मॉडेल्स
विकसित करण्यात आली आहेत. यामुळे शेतकरी कर्जमुक्तीकडे वाटचाल करतील. तसेच त्यांनी
पुढे सांगितले की, शुद्ध व सकस अन्नामुळे मानवी आरोग्य आणि
मानसिक संतुलन अबाधित राहते. ‘जसे अन्न तसे मन’ या तत्त्वाची पूर्तता नैसर्गिक
शेतीतून होते. म्हणूनच नैसर्गिक शेतीचा प्रसार व स्वीकार ही काळाची गरज आहे. यावेळी
त्यांनी पद्मश्री श्री. सुभाष शर्मा यांच्या ज्ञान, अनुभव व
कार्याचे विशेष कौतुक करून विद्यापीठात प्रत्यक्ष मार्गदर्शनासाठी त्यांना
निमंत्रित केले.
या
कार्यक्रमाचे आयोजन संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रीय
शेती प्रकल्प केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद गोरे तसेच डॉ. मीनाक्षी पाटील यांनी केले.
पद्मश्री
श्री. सुभाष शर्मा यांनी नैसर्गिक शेती म्हणजे काय,
नैसर्गिक शेती कशी करावी, पीक रचना व पीक
विविधीकरण, जमीन आरोग्य सुधारणा, कीड-रोग-तण
व्यवस्थापन, मजूर व बाजारपेठ व्यवस्थापन याबाबत सविस्तर
मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत शंका समाधान
केले.
या कार्यक्रमात
शेतकरी बंधु-भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. प्रश्नोत्तर सत्रात नैसर्गिक
शेतीसंबंधी विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले असून त्यावर पद्मश्री श्री. सुभाष
शर्मा यांनी समाधानकारक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आनंद गोरे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. मीनाक्षी पाटील यांनी केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील शास्त्रज्ञ तसेच शेतकरी बंधु-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण झूम मीटिंग, युट्यूब चॅनल व फेसबुक या सामाजिक माध्यमांद्वारे करण्यात आले.
.jpeg)

