सुरवातीला स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीस अभिवादन व श्रद्धांजली अर्पण
‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांच्या नवोपक्रमशीलतेला चालना : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचे माननीय राज्यपाल तथा
विद्यापीठाचे माननीय कुलपती श्री आचार्य देवव्रत यांच्या निर्देशानुसार वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे दिनांक २८ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान आयोजित आविष्कार–२०२६
अंतर्गत १८ वे महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय संशोधन स्पर्धेत संशोधक
विद्यार्थ्यांचे संशोधन सादरीकरण संपन्न झाले.
या संशोधन स्पर्धेत विजेत्यांना दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी पारितोषिके
वितरीत करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र राज्याचे स्वर्गीय
उपमुख्यमंत्री माननीय श्री. अजित पवार यांच्या प्रतिमेस वंदन करून दोन मिनिटे मौन
पाळण्यात आले व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि त्यांच्या उल्लेखनीय
कार्याचे वाचन सभागृहात करण्यात आले.
बक्षीस वितरणास अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि हे होते. व्यासपीठावर नवी
दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन संस्थेचे माजी संचालक पद्मश्री माननीय डॉ. ए. के.
सिंह,
प्रगतशील शेतकरी पद्मश्री माननीय डॉ. श्रीरंग (दादा) लाड, लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे माननीय
कुलगुरू डॉ. कारभारी काळे, माननीय राज्यपाल नियुक्त देखरेख
समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील पाटील, सदस्य डॉ. प्रिया गेडाम,
डॉ. दयाराम पवार, डॉ. विलास अवारी, डॉ. विनायक धुलप तसेच वित्त समितीचे सदस्य डॉ. संजय खोब्रागडे व डॉ. जयंत
चौधरी, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक
डॉ. राकेश अहिरे, नियंत्रक श्री अनंत कदम, विद्यापीठ अभियंता इंजि. दीपक कशाळकर, आजोजन सचिव
डॉ. राजेश कदम, विद्यापीठातील विविध महाविद्यालयांचे सहयोगी
अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. बाबासाहेब ठोंबरे आणि डॉ. विश्वनाथ खंदारे यांची उपस्थिती होती.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी माननीय राज्यपाल (महाराष्ट्र
राज्य) यांचे प्रधान सचिव माननीय डॉ. प्रशांत नारनवरे (भा.प्र.से.), माननीय राज्यपालांच्या शिक्षण विभागाचे अवर सचिव माननीय श्री. विकास
कुलकर्णी, विद्यापीठाचे कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, माननीय राज्यपाल नियुक्त वित्त व्यवस्थापन उपसमितीचे अध्यक्ष श्री. विकास
देसाई, डॉ. चारुशीला गायके तसेच श्री. बोधीकिरण सोनकांबळे यांचे मोलाचे योगदान
लाभले.
या संशोधन स्पर्धेत महाराष्ट्रातील कृषि व अकृषि अशा एकूण २६ विद्यापीठांतील ९०७ संशोधक
विद्यार्थी नोंदणी केली होती या पैकी ८६७ संशोधक विद्यार्थी त्यांचे संघ
व्यवस्थापक व विद्यार्थी कल्याण संचालक, संपूर्ण
भारतातून त्या त्या विषयातील (३६ तज्ञ) परीक्षक अशा एकूण १३० प्रतिनिधीसह विविध
विद्यापीठांचे अधिकारी व कर्मचारी अशा एकूण १५०० हून अधिक सहभागी झाले. यामध्ये
पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), नाशिक, सातारा, अमरावती,
अकोला, जळगाव, नांदेड,
राहुरी, सोलापूर, गडचिरोली
आदी भागांतील विद्यापीठांनी सहभाग नोंदविला.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी महाराष्ट्र
राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण
करून त्यांच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण विद्यापीठात शोककळा पसरल्याची भावना
व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर औपचारिक उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करून केवळ
संशोधक विद्यार्थ्यांच्या औपचारिक संशोधन स्पर्धा घेण्यात आल्याचे नमूद केले. आजचा
बक्षीस वितरण समारंभ हा सहभागी संशोधक विद्यार्थ्यांचे कौतुक व प्रोत्साहन
देण्याच्या उद्देशाने तसेच राष्ट्रीय पातळीवरील नामवंत शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. ए.
के. सिंग (भात पिके तज्ज्ञ) आणि पद्मश्री डॉ. श्रीरंग (दादा) लाड (कापूस तज्ज्ञ)
यांच्याशी विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘आविष्कार’ हा संपूर्ण कार्यक्रम माननीय लोकभवन यांच्या
रूपरेषेनुसार व त्यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आल्याचे नमूद करताना माननीय
कुलगुरूंनी या स्पर्धेत सादर करण्यात आलेले संशोधन प्रकल्प अत्यंत उच्च दर्जाचे
असल्याचे सांगितले. अनेक प्रकल्प इतके दर्जेदार होते की प्रथम व द्वितीय क्रमांक
निश्चित करताना परीक्षकांनाही संभ्रम निर्माण झाला. तरीही देशभरातून सहभागी
झालेल्या ३६ विविध परीक्षकांच्या सखोल निरीक्षणानंतर ठरलेल्या निकषांनुसार निकाल
जाहीर करण्यात आला.
‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेची परंपरा स्वामी विवेकानंद
यांच्या १२ जानेवारी जन्मदिनी त्यांच्या विचारांची युवकांमध्ये रुजवणूक करण्याच्या
उद्देशाने, माननीय लोकभवन यांच्या मार्गदर्शनाखाली
सुरू करण्यात आली आहे. मात्र परभणी येथे निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर ही
स्पर्धा २८ ते ३१ जानेवारी या कालावधीत घेण्यास माननीय लोकभवन यांनी अनुमती
दिल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये
संशोधनाची आवड, नवोपक्रमशील विचारसरणी आणि वैज्ञानिक
दृष्टिकोन विकसित करण्यासाठी ‘आविष्कार’ हे एक प्रभावी व्यासपीठ ठरत आहे.
राज्यातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थी एकत्र येऊन आपले संशोधन सादर करीत
असल्यामुळे त्यांची संशोधक वृत्ती विकसित होत असून ज्ञानवृद्धीस चालना मिळत आहे.
विद्यार्थ्यांना माननीय कुलगुरूंनी सांगितले की, केवळ विद्या प्राप्त केल्याने ज्ञान मिळते; मात्र
विद्वान होण्यासाठी विनम्रता आवश्यक आहे. मिळवलेल्या ज्ञानाचा समाजहितासाठी योग्य
वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. भविष्यात
विद्यार्थ्यांच्या हातात अनेक महत्त्वपूर्ण संस्थांची जबाबदारी येऊ शकते, त्यामुळे येणाऱ्या अडचणींवर मात करत आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा सल्ला
त्यांनी दिला.
पद्मश्री माननीय डॉ. ए. के. सिंह यांनी सुरवातीला माननीय
उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी सांगितले
की,
‘आविष्कार’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प सादर
करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. याबद्दल त्यांनी माननीय लोकभवन
कार्यालयाप्रती आदर व्यक्त केला. तसेच विद्यापीठासाठी भूषण ठरलेले व सातत्याने
नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
यांच्या कार्याचा त्यांनी विशेष उल्लेख करत गुणगौरव केला. शेवटी त्यांनी
पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील काळात अधिक जोमाने कार्य
करावे याबरोबरच दूरदृष्टी, कठोर मेहनत, पक्का निश्चय व शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केले.
पद्मश्री माननीय डॉ. श्रीरंग (दादा) लाड यांनी माननीय
उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना अभिवादन करून पुढे नमूद केले की, चिंतनातूनच संशोधन आपोआप घडते. यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या
कार्यक्षेत्रात किंवा शेतीमध्ये नियमित भेटी देऊन सूक्ष्म निरीक्षण करावे. अशा
निरीक्षणामुळे विविध बाबी समजून येतात आणि त्यातून चिंतनास चालना मिळते. त्यांनी
आपल्या संशोधनातून सध्या कापूस पिकामध्ये ‘दादा लाड तंत्रज्ञान’ विकसित केले
असल्याचे सांगितले. तसेच भविष्यात मराठवाड्याचे भूषण असलेल्या शाळू ज्वारी या
पिकावर संशोधन करून अधिक उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने कार्य करण्याचा मानस
व्यक्त केला.या संशोधन वृत्तीमुळेच आज खेड्यातील संशोधक शेतकरी अशा व्यासपीठावर
उभा राहून आपल्याशी संवाद साधतो; यातच खरे यश दडलेले आहे,
असे त्यांनी सांगितले.
माननीय कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनीही माननीय
उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून पुढे नमूद केले
की, आविष्कार संशोधन स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करत विद्यापीठाचे
अभिनंदन केले. आविष्कार संशोधन संमेलनाची सुरुवात सन २००६ मध्ये झाल्याचे त्यांनी
सांगितले व त्याची संकल्पना स्पष्ट केली. सध्या नवीन शैक्षणिक धोरण अस्तित्वात
असले तरी महाराष्ट्राने सन २००६ मध्येच लोकभवन कार्यालयाच्या माध्यमातून आंतरशाखीय
(Interdisciplinary)
दृष्टिकोन स्वीकारून सहा विविध विषयगट एकत्र आणले. विद्यार्थ्यांना
आपले संशोधन सादर करण्याचे तसेच एकमेकांचे विचार ऐकण्याचे प्रभावी व्यासपीठ
म्हणजेच ‘आविष्कार’ संशोधन संमेलन असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढे ते म्हणाले की,
अपयश ही यशाची पहिली पायरी असते. ज्यांना पुरस्कार प्राप्त झाले
नाहीत त्यांनी खचून न जाता अधिक जोमाने कार्य करावे व पुढील काळात यश संपादन
करावे. मिळालेल्या पुरस्काराचा खरा आनंद तो समाज व राष्ट्राच्या हितासाठी उपयोगात
आणल्यासच आहे. विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर, स्वावलंबी व
उद्योजक बनावे, हेच ‘आविष्कार’मध्ये सहभाग घेतल्याचे खरे यश
असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
आविष्कार समितीचे निमंत्रक तथा शिक्षण संचालक डॉ. भगवान
आसेवार यांनीही माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली
अर्पण करून स्पर्धेच्या आयोजनाची पार्श्वभूमी व उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले की
ज्ञान व संशोधन सादर करण्यासाठी ही एक मोठी व महत्त्वपूर्ण स्पर्धा असून, त्यातून समाजातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी तसेच सामाजिक परिवर्तन घडवून
आणण्यासाठी निश्चितच लाभ होईल. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान व कौशल्य
विकसित होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले. ते पुढे
म्हणाले की जिज्ञासू वृत्ती ही यशाकडे नेणारी पहिली पायरी आहे. यश त्वरित मिळत
नाही, त्यासाठी सातत्य आवश्यक असते. त्यामुळे
विद्यार्थ्यांनी नेहमी जिज्ञासू वृत्ती ठेवावी, सातत्याने
प्रयत्न करावेत आणि स्वतःवर विश्वास ठेवावा, असा सल्लाही
त्यांनी दिला.
माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना
श्रद्धांजली अर्पण करून माननीय राज्यपाल नियुक्त ‘आविष्कार’ देखरेख समितीचे
अध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी या स्पर्धेबाबत माहिती देत मार्गदर्शन केले. ते
पुढे म्हणाले की, या संशोधन स्पर्धेतून
निवडलेल्या प्रकल्पांचे भविष्यात स्वतंत्र प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.
प्रास्ताविकात आविष्कार समितीचे सह-निमंत्रक तथा आयोजन
सचिव डॉ. राजेश कदम यांनी माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना
श्रद्धांजली अर्पण करून ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेचे महत्त्व विशद केले. तसेच
दिनांक २८ जानेवारी रोजी सर्व कार्यक्रम रद्द करून केवळ औपचारिक स्पर्धेचे नियोजन
करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी माननीय लोकभवन कार्यालयाने
नियुक्त केलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले.
यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील बामू विद्यापीठाचे संघ
व्यवस्थापक श्री. सुनील निंभोरे यांनी आपले अभिप्राय व्यक्त करून भावना मांडल्या.
‘Innovation,
Invention, Discovery’ या संकल्पनेवर आधारित हे संमेलन विद्यार्थ्यांमधील
संशोधनवृत्ती, नवकल्पना आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत
करण्यासाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरले.
आविष्कार–२०२६ संशोधन स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय लोकभवन
कार्यालयाचे समिती सदस्य, आविष्कार समितीचे निमंत्रक
तथा शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, सह निमंत्रक तथा आजोजन
सचिव डॉ. राजेश कदम, विद्यापीठ प्रशासन, आयोजन समिती, विविध विभागांचे प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव व दयानंद मोरे
यांनी केले, तर आभार डॉ. राजेश कदम यांनी मानले.
‘आविष्कार–२०२६’ अंतर्गत संशोधन सादरीकरणासाठी पुढीलप्रमाणे सहा प्रमुख विषय गटामध्ये स्पर्धा घेण्यात आली.
१. मानविकी, भाषा व ललित कला
२. वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा
३. शुद्ध विज्ञान
४. कृषि व पशुसंवर्धन
५. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
६. वैद्यकीय व औषधनिर्माणशास्त्र
सदरील स्पर्धा पदवी (UG), पदव्युत्तर
(PG) तसेच पोस्ट
पीजी (PPG) या तीन स्तरांमध्ये आयोजित करण्यात आली. दिनांक
२९ जानेवारी रोजी भित्तीपत्रके, मॉडेल्स, विविध प्रयोग सादरीकरण तर दिनांक ३० जानेवारी रोजी पोडियम सादरीकरण
घेण्यात आले. या सर्वांचे परीक्षण सबंधित विषयातील तज्ज्ञ परीक्षाकाद्वारे करण्यात
आले. प्रत्येक ६ गटातून प्रत्येकी ८ प्रमाणे एकूण ४८ विद्यार्थांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार तर ६ गटातून प्रत्येकी २ प्रमाणे एकूण ३६
विद्यार्थांना प्रोत्साहन पुरस्कार असे एकूण ८४ पुरस्कार देण्यात आले.
यामध्ये पदवी (UG) व पदव्युत्तर (PG) स्तरासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त
करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना अनुक्रमे रुपये ३५ हजार, ३०
हजार व २५ हजार इतकी फेलोशिप पुढील संशोधनासाठी एक वर्षाकरिता देण्यात येणार आहे.
तसेच पोस्ट पीजी (PPG) स्तरासाठी प्रथम व द्वितीय क्रमांक
प्राप्त विद्यार्थ्यांना अनुक्रमे रुपये १ लाख २० हजार व रुपये १ लाख इतकी फेलोशिप
दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रदान करण्यात येणार आहे.
याबरोबरच विश्वनाथ शंकरभाई दलवाई सर्वोत्तम चॅम्पियनशिपचे फिरते चषक मुंबई विद्यापीठाने प्राप्त करून विजेता संघ ठरला तर ॲड त्रिंबक माधव चांदे उपविजेते फिरते चषक पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाने प्राप्त करून उपविजेता संघ ठरला. सर्व सहाही विविध विषयातील गटाचे फिरते चषक मुंबई विद्यापीठाने प्राप्त केले.

.jpeg)

.jpeg)

.jpeg)
.jpeg)




.jpeg)
.jpeg)