Wednesday, January 14, 2026

माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ उपक्रमांतर्गत मराठवाड्यात शेतकऱ्यांशी थेट संवाद — ३५० शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 शेतकरी देवो भव:” भावनेतून विद्यापीठ शेतकऱ्यांसोबत — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून व विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणारा माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ हा उपक्रम मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी नियमितपणे आयोजित केला जातो. त्यानुसार दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी हा उपक्रम आठही जिल्ह्यांतील विविध गावांमध्ये यशस्वीरीत्या राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत विद्यापीठाच्या ११ चमूंमधील २४ शास्त्रज्ञांनी प्रक्षेत्र भेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके व शेतकरी मेळाव्यांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. यामध्ये सुमारे ३५० शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या विशेष विस्तार उपक्रमांतर्गत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ऑनलाईन माध्यमातून पेडगाव (ता. जि. परभणी) येथील कार्यक्रमात सहभागी होत शेतकऱ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. शेतकऱ्यांचे हित जपत विद्यापीठ शेतकरी देवो भव:” या भावनेतून कार्य करीत आहे. शेतकऱ्यांना अधिक नफा मिळावा यासाठी विद्यापीठ सातत्याने आधुनिक तंत्रज्ञान व सुधारित वाणांच्या विकासावर भर देत आहे. त्याचबरोबर उत्पादन खर्चात बचत व्हावी यासाठी नैसर्गिक शेतीच्या विकासास प्रोत्साहन देत आहे, असे सांगून त्यांनी शेती हा निरंतर चालणारा व्यवसाय असून गटशेतीच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या जैविक निविष्ठा जसे की बायोमिक्स, ट्रायकोडर्मा आदींचा सेंद्रिय शेतीमध्ये वापर करण्याचे महत्व सांगितले.

विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी विविध ठिकाणी हळद पिकाचे खत व्यवस्थापन व करपा रोग नियंत्रण, मोसंबीतील कोळी कीड व सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच हरभरा लागवड यावर मार्गदर्शन केले. याबरोबरच जमिनीचे आरोग्य संवर्धन, रबी हंगामातील पीक नियोजन व फळबाग व्यवस्थापन यावरही चर्चा झाली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कापूस व मका या एकाच पिकांची लागवड सातत्याने होत असल्याने किड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत असून उत्पादन घटत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे येत्या खरीप हंगामात काही क्षेत्रावर तूर ‘गोदावरी’ वाणाची पाहणी करून त्याचे फायदे सांगून तूर पिकाची निवड उपयुक्त ठरेल, असे मार्गदर्शन मौजे वाकी देवाची (ता. कन्नड) येथे करण्यात आले.

शास्त्रज्ञांनी पुढे नमूद केले की, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर योग्य पीक पद्धतीची निवड करणे आवश्यक असून त्यासाठी विद्यापीठाचे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. अन्नधान्य उत्पादन हे केवळ शेतीद्वारेच शक्य असल्याने शेती हा सर्वात शाश्वत व आवश्यक व्यवसाय आहे, असे प्रतिपादन करण्यात आले. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेतीकडे वळावे. यासाठी विद्यापीठातर्फे दर मंगळवारी व शुक्रवारी सायंकाळी सात वाजता आयोजित ऑनलाईन शेतकरी–शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले. शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष शेतांवर भेट देऊन पिकांची पाहणी केली व वैयक्तिक मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतभेटींमधून उपक्रम अधिक प्रभावी ठरला.

या उपक्रमात परभणी येथील विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालनालय, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र,  छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्र, नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र, तसेच विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रे (छ. संभाजीनगर, अंबाजोगाई, लातूर, परभणी), कृषि विज्ञान केंद्रे (छ. संभाजीनगर, खामगाव, बदनापूर) आणि लातूरचे गळीत धान्य संशोधन केंद्र आदी संलग्न कार्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात  मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, विभाग प्रमुख डॉ हरिहर कौसडीकर, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे, डॉ. सूर्यकांत पवार, प्रा. अरुण गुट्टे, डॉ. वसंत सुर्यवंशी, डॉ. अरविंद पंडागळे, डॉ. मोहन धुप्पे, प्रा. अशोक घोटमुखळे, डॉ. बस्वराज भेदे, डॉ.पावन ढोके, डॉ अजित पुरी,  डॉ. एस. डी. सोमवंशी, श्री. अभिलाष बनसोडे, श्री. अमोल दाभाडे, किशोर जगताप, डॉ. एफ आर तडवी, श्री रामेश्वर ठोंबरे,  श्री. राम पाटील, तसेच कृषि विभागातीलअधिकारी श्री.प्रकाश देशमुख, श्री विजय पवार यांनी मार्गदर्शन केले.