शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी एफपीओ प्रभावी माध्यम – विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि यांच्या प्रेरणेतून तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली
छत्रपती संभाजीनगर येथील कृषि विज्ञान केंद्र–१ यांच्या वतीने आयोजित ‘शेतकरी–शास्त्रज्ञ
कृषि संवाद’ या ऑनलाईन कार्यक्रमाचा ८१ वा भाग दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी यशस्वीपणे
संपन्न झाला.
या भागामध्ये ‘शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे समृद्ध शेतकरी
(एफपीओ – स्थापना, महत्त्व, योजना व विविध
व्यवसाय संधी)’ हा विषय घेण्यात आला.
कार्यक्रमास विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, मुख्य विस्तार अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, कृषिभूषण महाराष्ट्र एफपीओ फेडरेशनचे (महाराष्ट्र
राज्य) चेअरमन श्री. भूषण निकम, कार्यक्रम समन्वयक डॉ. दिप्ती
पाटगावकर, विषयतज्ज्ञ डॉ. बसवराज पिसुरे, डॉ. संजूला भावर, डॉ. अनिता जिंतूरकर तसेच श्री. अशोक
निर्वळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना डॉ. राकेश अहिरे म्हणाले की, शेतकऱ्यांना सक्षम व समृद्ध बनविण्यासाठी एकत्र येऊन संघटितपणे काम करणे अत्यंत
आवश्यक आहे. यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीओ) हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. विविध
कृषि व्यवसाय सुरू करून अधिक आर्थिक लाभ व सर्वांगीण विकास साधायचा असल्यास शेतकऱ्यांनी
एफपीओ स्थापन करून एकजुटीने कार्य करावे.
प्रमुख विषयावर मार्गदर्शन करताना श्री. भूषण निकम यांनी सांगितले की, कृषि उद्योग उभारणीसाठी शेतकऱ्यांनी उद्योगशील दृष्टिकोन व योग्य ज्ञान अंगीकारणे
गरजेचे आहे. जोपर्यंत उद्योग करण्याची मानसिकता विकसित होत नाही आणि नाविन्यपूर्ण उपक्रम
राबविण्याचा प्रयत्न केला जात नाही, तोपर्यंत यशस्वी उद्योग उभारणी
शक्य होत नाही. यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविणे आवश्यक
आहे.
ते पुढे म्हणाले की, गावपातळीवरील किमान १० शेतकरी किंवा शेतकरी
गट एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करू शकतात. यासाठी ५ संचालक व ५ सदस्य असणे
आवश्यक आहे. किमान एक महिला संचालक असल्यास अतिरिक्त लाभ मिळतो. एकापेक्षा अधिक गावे
मिळूनही एफपीओ स्थापन करता येते.
एफपीओ स्थापनेसाठी संचालक व सदस्यांचे जन्म प्रमाणपत्र, पॅन कार्ड (मूळ/स्कॅन), आधार कार्ड (मूळ/स्कॅन),
लाईट बिल किंवा मागील दोन महिन्यांचे बँक स्टेटमेंट, चार छायाचित्रे (मूळ किंवा JPEG स्वरूपात), ७/१२ उतारा (झेरॉक्स/PDF), शेतकरी असल्याचा दाखला,
कार्यालयीन पत्त्यासाठी लाईट बिल, आवश्यक अर्ज
व कंपनीचे नाव, संचालकांची नावे, मोबाईल
क्रमांक व कार्यालयाचा पत्ता आदी कागदपत्रांची आवश्यकता असते. यातील बहुतांश प्रक्रिया
सीए व सीएस यांच्या माध्यमातून पूर्ण करावी लागते.
केवळ कंपनी स्थापन करणे हा उद्देश नसावा, तर कंपनी स्थापन झाल्यानंतर
परिसरातील बाजारपेठेचा सखोल अभ्यास करून त्यानुसार उद्योग उभारणी करावी. तसेच कृषिमालाला
परदेशी बाजारपेठेत मोठ्या संधी असून योग्य मार्गदर्शनाच्या आधारे निर्यातीवरही लक्ष
देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या ऑनलाईन कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शेतकरी बांधव मोठ्या
संख्येने सहभागी झाले होते. सहभागी शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे निरसन
तज्ज्ञांमार्फत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या नियोजनात मुख्य विस्तार अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांचे विशेष
सहकार्य लाभले. प्रास्ताविक डॉ. दिप्ती पाटगावकर यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. बसवराज पिसुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. संजूला भावर
यांनी केले.
.jpeg)

.jpeg)

.jpeg)
.jpeg)