Tuesday, January 20, 2026

वनामकृवित रेशीम कोष न विणण्याच्या समस्यांवर उपाय विषयक तीन दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन

 रेशीम तंत्रज्ञानात प्राविण्य मिळवून उद्योजक व्हावे  — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील कीटकशास्त्र विभागातर्फे रेशीम संशोधन योजना अंतर्गत व आयसीएआर अनुसूचित जाती उपयोजनेच्या माध्यमातून रेशीम कोष न विणण्याची समस्या व त्यावरील उपाय” या विषयावर आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवार दि. २० जानेवारी २०२६ रोजी कीटकशास्त्र विभागात उत्साहात पार पडले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली झाले. उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू म्हणाले, रेशीम उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीची क्षमता आहे. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी रेशीम तंत्रज्ञानात प्राविण्य मिळवून स्वतः यशस्वी रेशीम उद्योजक बनावे. केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष उद्योग उभारणीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.

याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कीरेशीम उद्योग हा कृषिपूरक व्यवसाय असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सखोल व तांत्रिक प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी उद्योजक बनावे.

यावेळी व्यासपीठावर सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, महाराष्ट्र सिल्क असोसिएशनचे श्री. राजेश उरकुडे, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, केंद्रीय रेशीम बोर्डाचे शास्त्रज्ञ श्री. अशोक जाधव, श्रीमती शुभांगी गोरे, तसेच रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. धिरजकुमार कदम, डॉ. चंद्रकांत लटपटे, डॉ. मिलिंद सोनकांबळे, डॉ. अनंत लाड, डॉ. फारिया खान, डॉ. श्रद्धा धुरगुडे व डॉ. राजेंद्र जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

तीन दिवसीय या प्रशिक्षण कार्यक्रमात रेशीम कोष न विणण्यामागील कारणे, रोग-कीड व्यवस्थापन, योग्य संगोपन पद्धती, गुणवत्तापूर्ण कोष उत्पादन, आधुनिक रेशीम तंत्रज्ञान तसेच उद्योजकतेच्या संधी यावर तज्ज्ञ मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी एकूण ३० विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी तर आभार प्रदर्शन श्री. धनंजय मोहोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. संजोग बोकन, डॉ. राजरतन खंदारे, अनुराग खंडारे, श्री. दत्ता जटाळे व रोहित मोरे यांनी मोलाचे योगदान दिले.