नैसर्गिक व सेंद्रिय शेती ही आजच्या काळाची अपरिहार्य गरज — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
देऊळगाव
दुधाटे (ता. पूर्णा) येथील ग्रामस्थांच्या पुढाकारातून आयोजित “माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत ” हा अभिनव
उपक्रम दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख पाहुणे
म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक
डॉ. राकेश अहिरे, नुकतेच कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ
पुरस्काराने सन्मानित उद्यान पंडित श्री प्रताप काळे, तसेच
पोलिस पाटील संघटनेचे मराठवाडा विभागाध्यक्ष श्री बालासाहेब हिंगे उपस्थित होते.
याशिवाय पोलिस
पाटील शिवाजीराव दुधाटे, उपसरपंच डिगांबर
दुधाटे, चेअरमन तुकाराम दुधाटे, तंटामुक्ती
अध्यक्ष रंगनाथदादा दुधाटे, माजी सरपंच पांडुतात्या दुधाटे,
भगवानराव दुधाटे, अच्युतराव दुधाटे आदी
मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांचे
गावात आगमन होताच विद्यार्थिनींनी लेझीमच्या गजरात त्यांचे पारंपरिक पद्धतीने
स्वागत केले.
यानंतर
मान्यवरांना गावातील स्वच्छ, सुंदर व हरित वैकुंठधाम स्मशानभूमी दाखविण्यात आली. या उपक्रमाचे विशेष
कौतुक करत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी समाधान व्यक्त केले.
त्यानंतर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात
आले तसेच शाळेतील सेंद्रिय परसबागेचे उद्घाटन करण्यात आले.
अध्यक्षीय
भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेती ही
केवळ पर्याय नसून आजच्या काळाची अपरिहार्य गरज आहे,
असे ठामपणे सांगितले. वाढते रासायनिक प्रदूषण, जमिनीची होत चाललेली अधोगती आणि मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात
घेता शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
सेंद्रिय शेतीमुळे उत्पादन खर्च कमी होतो, मातीची सुपीकता
टिकून राहते आणि शाश्वत शेतीचा मार्ग खुला होतो, असे सांगून त्यांनी
शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करावा असे आवाहन केले.
विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की,
फक्त अभ्यासापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांनी आपले छंद,
कला, क्रीडा व सामाजिक जाणिवा विकसित
कराव्यात. छंदातून सर्जनशीलता वाढते, व्यक्तिमत्त्व घडते आणि
मानसिक संतुलन टिकते. आत्मविश्वास, सातत्य आणि सकारात्मक
दृष्टिकोन यांच्या बळावरच यश प्राप्त होते, असे त्यांनी
सांगितले.
प्रास्ताविक डॉ.
अनिल गोरे यांनी केले. यावेळी गावातील उत्कृष्ट कार्य करणारे गोविंद क्षीरसागर, प्रकाश भोसले, पंढरीनाथ
शिंदे, पांडुरंग बकाल, गोविंदराव
दुधाटे, मोतीराम दुधाटे, तरुण उद्योजक विष्णुभाऊ
दुधाटे, ऊसाचे भरघोस उत्पादन घेणारे कृष्णा दुधाटे व रोहिदास
दुधाटे, तसेच मुख्याध्यापक आबनराव पारवे यांचा सत्कार
करण्यात आला.
कार्यक्रमाच्या
यशस्वीतेसाठी उद्धव दुधाटे, गोविंद दुधाटे,
पंढरीनाथ शिंदे, विष्णू दुधाटे, मोतीराम दुधाटे, बळिराम दुधाटे, प्रकाश दुधाटे, आत्माराम दुधाटे, व्यंकटदादा दुधाटे, रामेश्वर दुधाटे व अशोक दुधाटे यांनी
विशेष परिश्रम घेतले.
.jpeg)

.jpeg)
