वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र
विभागामार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हा (ता. मानवत, जि. परभणी) येथे दिनांक १३ जानेवारी २०२६
रोजी शेतकऱ्यांसाठी जैविक खतांचा योग्य व शाश्वत वापर या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण
शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या शिबिरात आंबा, संत्रा बागायतदारांसह हरभरा, गहू व तूर उत्पादक शेतकरी
सहभागी झाले होते. उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविणे, संतुलित
पीक पोषण राखणे आणि जमिनीचे आरोग्य सुधारण्याबाबत विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांनी
मार्गदर्शन केले. तसेच हवामान बदलाचा पिकांवर होणारा परिणाम, माती परीक्षणाचे महत्त्व आणि रासायनिक खतांचा मर्यादित वापर याविषयी त्यांनी
शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली.
मृद विज्ञान विभागातील दीर्घकालीन खतप्रयोग योजनेचे प्रमुख डॉ. रामप्रसाद खंदारे
यांनी राष्ट्रीय कृषि विकास योजना, प्रशिक्षणाचे उद्दिष्ट आणि रासायनिक खतांचा
जमिनीवर होणारा परिणाम याविषयी माहिती दिली. संतुलित खत वापरामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते
व उत्पादनात स्थिरता राहते, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विद्यापीठनिर्मित जैविक खत ‘एनपीके कन्सोरशियम’चे प्रातिनिधिक स्वरूपात
वितरण करण्यात आले तसेच त्याच्या वापराचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
या शिबिरात सर्वश्री तुकाराम भिसे, रुस्तुम भिसे, नारायण राऊत, माणिकराव मोहिते, उद्धव तारे, प्रकाश राऊत, रावसाहेब तिडके, बालासाहेब तारे, दत्ता मिरजे, गजानन भिसे, माणिकराव देशमुख, प्रभाकर मोहकरे, अर्जुन ठाकरगे आदी शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला व रब्बी हंगामातील पीक पोषणविषयक समस्यांचे निराकरण करून घेतले. परिसरातील १०० हून अधिक शेतकऱ्यांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


