Saturday, January 31, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ‘आविष्कार–२०२६’ संशोधन स्पर्धेत संशोधन सादरीकरण

विद्यार्थ्यांच्या संशोधन सादरीकरणाला माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन; आत्मविश्वास व सकारात्मकतेचा संदेश

सर्वोत्तम चॅम्पियनशिपचे फिरते चषक मुंबई विद्यापीठाने प्राप्त करून विजेता संघ ठरला


महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे माननीय कुलपती श्री आचार्य देवव्रतजी यांच्या निर्देशानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठ, परभणी येथे दिनांक २८ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान आयोजित आविष्कार–२०२६ अंतर्गत १८ वे महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय संशोधन स्पर्धेत संशोधक विद्यार्थ्यांचे संशोधन सादरीकरण संपन्न झाले.

आविष्कार–२०२६’ या राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेअंतर्गत संशोधन सादरीकरणासाठी पुढीलप्रमाणे सहा प्रमुख विषय गटामध्ये स्पर्धा घेण्यात आल्या —

१) मानविकी, भाषा व ललित कला

२) वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा

३) शुद्ध विज्ञान

४) कृषि व पशुसंवर्धन

५) अभियांत्रिकी व तंत्रज्ञान

६) वैद्यकीय व औषधनिर्माणशास्त्र

सदर स्पर्धा पदवी (UG), पदव्युत्तर (PG) तसेच पोस्ट पीजी (PPG) या तीन स्तरांमध्ये आयोजित करण्यात आली होती.

दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजी ८६७ संशोधक विद्यार्थ्यांचे पोस्टर (भित्तीपत्रके), मॉडेल्स व विविध प्रयोगांचे सादरीकरण घेण्यात आले. या दरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रयोग दालनास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भेट दिली.

यावेळी त्यांच्या समवेत आविष्कार समितीचे निमंत्रक तथा शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, सहनिमंत्रक तथा आयोजन सचिव डॉ. राजेश कदम, विद्यापीठ आविष्कार प्रभारी तथा सहयोगी अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे (लातूर) आणि सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य (परभणी) उपस्थित होते.

माननीय कुलगुरूंनी भित्तीपत्रके, मॉडेल्स व प्रयोगांच्या सादरीकरण दालनास भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षकांसमोर सादरीकरण करताना नेमकी व मुद्देसूद मांडणी करावी, पूर्वतयारी ठेवून आत्मविश्वासपूर्ण उत्तरे द्यावीत तसेच विचार व शब्द यांचा योग्य समन्वय साधावा, असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. ही प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या संशोधन कारकिर्दीची सुरुवात असून भविष्यात त्याचा निश्चित लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संमेलनात सहभाग घेऊन संशोधन सादर केल्याबद्दल त्यांनी सर्व संशोधक विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची आपुलकीने चौकशी करत त्यांच्या निवास, भोजन, सुरक्षितता व इतर सोयीसुविधांबाबतही माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी आनंदी व तणावमुक्त जीवन जगावे यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला. स्पर्धेत सहभागी होताना निकालाची चिंता न करता संपूर्ण क्षमतेने सादरीकरण करावे, असे आवाहन करत अनेक सादरीकरणांमध्ये नाविन्यपूर्ण संशोधन स्पष्टपणे दिसून आल्याचे त्यांनी नमूद केले. अशा संशोधन विषयांचा विद्यापीठ पातळीवरही विचार करून निवड करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी दिली. या माध्यमातून मराठवाडा विभागातील शैक्षणिक व संशोधन संस्कृती अधिक बळकट होईल, अशी आशा माननीय कुलगुरूंनी व्यक्त केली.

पोस्टर (भित्तीपत्रके, मॉडेल्स व विविध प्रयोग) सादरीकरणाचे राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ परीक्षकांमार्फत परीक्षण व मूल्यमापन करण्यात आले. त्यानुसार प्रत्येक विषय गटात पदवी (UG) मधून १५, पदव्युत्तर (PG) मधून १२ आणि पोस्ट पीजी (PPG) मधून १० — अशा सरासरी ३७ विद्यार्थ्यांची पोडियम सादरीकरणासाठी निवड करण्यात आली. यामध्ये मानविकी, भाषा व ललित कला (३७), शुद्ध विज्ञान (३७), अभियांत्रिकी व तंत्रज्ञान (३७), वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा (३९), वैद्यकीय व औषधनिर्माणशास्त्र (३९) तसेच कृषि व पशुसंवर्धन (४२) अशा एकूण २३१ संशोधक विद्यार्थ्यांचा समावेश होता.

दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी पोस्टर सादरीकरणातून निवड झालेल्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांचे पोडियम सादरीकरण घेण्यात आले. पोडियम सादरीकरणाच्या प्रारंभी माननीय शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व परीक्षकांची बैठक पार पडली.

या बैठकीस संमेलनाचे सहनिमंत्रक तथा आयोजन सचिव डॉ. राजेश कदम, विद्यापीठ आविष्कार प्रभारी तथा सहयोगी अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे (लातूर), सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य (परभणी), संमेलनाच्या Oversee and Study the Organisation उपसमितीचे अध्यक्ष तथा मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी विकास संचालक डॉ. सुनील पाटील, संमेलनाच्या वित्त व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा बाटू विद्यापीठ, लोणेरे येथील डॉ. संजय खोब्रागडे, पोडियम समितीचे अध्यक्ष डॉ. गजानन भालेराव यांच्यासह राष्ट्रीय पातळीवरील परीक्षक समितीतील सर्व सदस्य उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान डॉ. सुनील पाटील यांनी पोडियम सादरीकरणात अवलंबावयाच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये विद्यार्थ्यांची ओळख गोपनीय ठेवण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या.

पोडियम सादरीकरणाचे मूल्यांकन संबंधित विषयांतील राष्ट्रीय पातळीवरील प्रत्येकी सहा तज्ज्ञ परीक्षकांच्या चमूने केले. सहा विषय गटातून प्रत्येकी आठ, अशा एकूण ४८ संशोधक विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार तर सहाही गटातून प्रत्येकी २ प्रमाणे एकूण ३६ विद्यार्थांना प्रोत्साहन पुरस्कार असे एकूण ८४ पुरस्कार देण्यात आले.

यामध्ये पदवी (UG) व पदव्युत्तर (PG) स्तरासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना अनुक्रमे रुपये ३५ हजार, ३० हजार व २५ हजार इतकी फेलोशिप पुढील संशोधनासाठी एक वर्षाकरिता देण्यात येणार आहे. तसेच पोस्ट पीजी (PPG) स्तरासाठी प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना अनुक्रमे रुपये १ लाख २० हजार व रुपये १ लाख इतकी फेलोशिप दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रदान करण्यात येणार आहे.

याबरोबरच विश्वनाथ शंकरभाई दलवाई सर्वोत्तम चॅम्पियनशिपचे फिरते चषक मुंबई विद्यापीठाने प्राप्त करून विजेता संघ ठरला तर ॲड त्रिंबक माधव चांदे उपविजेते फिरते चषक पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाने प्राप्त करून उपविजेता संघ ठरला. सर्व सहाही विविध विषयातील गटाचे फिरते चषक मुंबई विद्यापीठाने प्राप्त केले

प्रथम क्रमांक पुरस्कार प्राप्त विद्यार्थी

मानविकी, भाषा व ललित कला विभागामध्ये पदवीपूर्व स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या इनामदार झफीराह झहीर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पदव्युत्तर स्तरावर मुंबई विद्यापीठाच्याच पणगेकर मनश्री यांनी प्रथम पुरस्कार मिळवला, तर पोस्ट पीजी स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या नवले मनीषा यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा विभागामध्ये पदवीपूर्व स्तरावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रणव सुनील कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. पदव्युत्तर स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या बाणे चैताली यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तसेच पोस्ट पीजी स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या जैन वीरा सुनील यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

शुद्ध विज्ञान विभागामध्ये पदवीपूर्व स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या वर्मा प्रमोद यांनी प्रथम क्रमांक मिळवला. पदव्युत्तर स्तरावर मुंबई विद्यापीठाच्याच परमार ऑस्टिन अश्विन यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर पोस्ट पीजी स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या मिश्रा राहुल मनोजकुमार यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

कृषी व पशुसंवर्धन विभागामध्ये पदवीपूर्व स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या तिवारी अनुज कुमार यांनी प्रथम क्रमांक मिळवला. पदव्युत्तर स्तरावर एचएसएनसी विद्यापीठाच्या अमान मिर्झा यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तसेच पोस्ट पीजी स्तरावर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अजिंक्य पोटे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागामध्ये पदवीपूर्व स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या विश्वकर्मा दिवाकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. पदव्युत्तर स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या शेख माझ मोहम्मद यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर पोस्ट पीजी स्तरावर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रोशन चांदवाणी यांनी प्रथम पुरस्कार मिळवला.

वैद्यकीय व औषधनिर्माणशास्त्र विभागामध्ये पदवीपूर्व स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या क्षीरसागर चिन्मयी यांनी प्रथम पुरस्कार मिळवला. पदव्युत्तर स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या काटकर मयुरेश यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तसेच पोस्ट पीजी स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या नाथानी खुशाली यांनी प्रथम क्रमांक मिळवला.