Friday, January 16, 2026

वनामकृविच्या गोळेगाव कृषी महाविद्यालयात ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम साजरा

 हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या शहीदी समागमातून विद्यार्थ्यांना मूल्यांची प्रेरणा


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील गोळेगाव (ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) येथील कृषी महाविद्यालयाच्या वतीने शीख धर्माचे नववे गुरु ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्याचे आयोजन दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले.हा कार्यक्रम विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेने, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांच्या निर्देशानुसार सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजीराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत नम्रतेने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी चित्रफित व बॅनर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. शिवाजीराव शिंदे यांनी विद्यार्थ्यांना जीवनामध्ये त्याग, जिद्द व सत्यनिष्ठा या मूल्यांचे महत्त्व सखोलपणे स्पष्ट केले. सत्याच्या मार्गावर निःसंकोचपणे चालणे, अन्यायाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठविणे, सर्व धर्मांचा आदर करणे, मानवतेची सेवा करणे तसेच एकता, बंधुता व शांतता या मूल्यांची जोपासना करण्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. तसेच मा. श्री गुरु जर्मनजीतसिंग बाबाजी यांच्या अमूल्य उपस्थितीबद्दल व प्रेरणादायी संवादाबद्दल समाधान व्यक्त करून अध्यक्षीय समारोप करण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र नानकसार गुरुद्वारा समितीचे अध्यक्ष मा. श्री गुरु जर्मनजीतसिंग बाबाजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या करुणाशील व ओघवत्या वाणीने उपस्थितांचे मन जिंकले. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्याग, परोपकार, समर्पण, धैर्य, संयम व दूरदृष्टीपूर्ण जीवनकार्याचा सजीव आढावा त्यांनी प्रभावीपणे मांडला. त्यांच्या संस्कारमय उपदेशाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध व भावविभोर झाले.

यानंतर सभागृहामध्ये श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या समर्पित कार्याचा इतिहास चित्रफितीद्वारे सादर करण्यात आला. या कार्यक्रमास कृषी तंत्र विद्यालय, आंबेजोगाई येथील माजी प्राचार्य श्री नारायणराव चव्हाण, कृषी महाविद्यालय, गोळेगाव येथील प्राध्यापकवृंद सर्वश्री डॉ. डी. एस. सारंग, डॉ. प्रवीण राठोड, डॉ. ज्योती गायकवाड, प्रा. वैशाली बास्टेवाड, श्री शेख सलीम, श्री डी. के. पवार, श्री मारोती गुहाडे, श्रीमती रंजना बरकुले तसेच सर्व सत्रांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रा. पुंडलिक वाघमारे व समिती सदस्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आठव्या सत्रातील विद्यार्थिनी कु. निकिता धर्माधिकारी व कु. आरती काळे यांनी केले, तर कार्यक्रमाचे ऋणनिदर्शन चौथ्या सत्रातील विद्यार्थिनी कु. वैशाली कंधारे यांनी केले.