Tuesday, January 20, 2026

दर्जेदार संशोधनासाठी सकारात्मक दृष्टिकोन व शिस्त आवश्यक – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वनामकृवित पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रम संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष एम.एस्सी. व पीएच.डी. (कृषि/उद्यानविद्या) विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिक्षण व संशोधन यांचा समतोल व योग्य समन्वय साधणे अत्यंत आवश्यक आहे. संशोधन हे केवळ पदवी प्राप्तीसाठी नसून समाज, शेतकरी आणि देशाच्या प्रगतीसाठी दिशादर्शक ठरणारे असावे. उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण संशोधनासाठी मन प्रसन्न, सकारात्मक, जिज्ञासू व उत्साही असणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात शिस्त, वेळेचे नियोजन व नैतिक मूल्यांचे पालन करावे, तसेच शैक्षणिक व महाविद्यालयीन नियमावलीचे काटेकोर पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संशोधन प्रक्रियेत सातत्य, चिकाटी, प्रामाणिक प्रयत्न आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या बाबी अनिवार्य असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यार्थी व संशोधन मार्गदर्शक यांच्यात परस्पर विश्वास, ऐक्य व जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले, तर समन्वय अधिक दृढ होऊन संशोधन अधिक दर्जेदार, परिणामकारक व समाजोपयोगी ठरू शकते. अशा संशोधनातूनच विद्यापीठाची शैक्षणिक प्रतिमा अधिक भक्कम होत असून देशाला सक्षम संशोधक घडविण्याचे कार्य साध्य होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.

प्रमुख अतिथी डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, संशोधनामध्ये आधुनिक तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) यांचा प्रभावी वापर करून अचूक शेतीतील विविध संशोधन बाबी साधाव्यात. आपण भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या (ICAR) ‘अ’ दर्जा प्राप्त विद्यापीठात शिक्षण घेत आहोत, याचा अभिमान बाळगून उच्च दर्जाचे संशोधन करावे, असे त्यांनी नमूद केले. विद्यापीठास राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून, नुकताच कोरडवाहू शेती संशोधन केंद्रास ‘बेस्ट परफॉर्मिंग सेंटर’ पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी सांगितले. याच गुणवत्तेमुळे देशभरातून पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी १६८ पैकी ४० विद्यार्थी या विद्यापीठात प्रवेश घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विविध राज्यांतील विद्यार्थ्यांमुळे ज्ञानाचे आदान–प्रदान होऊन संशोधन अधिक समृद्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. प्रवीण वैद्य यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्पांचे विषय शेतकरीकेंद्रित, समाजोपयोगी व काळानुरूप आवश्यक असलेले निवडावेत, असे आवाहन केले.

शिक्षण प्रभारी डॉ. रणजीत चव्हाण यांनी महाविद्यालयीन नियमावलीची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमास विद्यापीठातील विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, संशोधन मार्गदर्शक तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनुराधा लाड यांनी केले, तर डॉ. मकरंद भोगावकर यांनी आभार प्रदर्शन केले.