Wednesday, January 21, 2026

वनामकृविच्या बदनापूर येथील कृषि महाविद्यालयाद्वारा ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी शहीदी शताब्दी निमित्त विविध उपक्रम

हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे समाजासाठीचे योगदान गौरवशाली – श्री. खडकसिंग ग्रंथी


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषि महाविद्यालयाद्वारा ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे उपक्रम दि. १६ जानेवारी ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या माध्यमातून राबविण्यात आले.

हे सर्व उपक्रम विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेने, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांच्या निर्देशानुसार सहयोगी अधिष्ठाता डॉ. दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

या उपक्रमांतर्गत दि. २१ जानेवारी २०२६ रोजी महाविद्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिपक पाटील यांनी विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार करून सामाजिक सलोखा, सहिष्णुता व राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले.

छत्रपती संभाजीनगर येथील गुरुद्वाराचे  श्री. खडकसिंग ग्रंथी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. आपल्या प्रभावी व ओघवत्या शैलीत त्यांनी ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनकार्य, धर्मस्वातंत्र्यासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान, मानवता, सहिष्णुता व सत्याचा संदेश यावर सखोल मार्गदर्शन केले. समाजात अन्याय, अत्याचार आणि धार्मिक असहिष्णुता नष्ट करण्यासाठी ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आहेत. त्यांनी केवळ एका धर्मासाठी नव्हे, तर संपूर्ण मानवजातीच्या हक्कांसाठी आपले प्राण अर्पण केले, असे प्रतिपादन श्री. खडकसिंग ग्रंथी यांनी केले.

‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहिदी समागम निमित्त आयोजित निबंध, वक्तृत्व, घोषवाक्य लेखन व इतर विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्हे व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक बांधिलकी व मूल्याधिष्ठित विचारांची रुजवणूक व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या कार्यक्रमास कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन सोमवंशी, महाविद्यालयाचे जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुनील माने, डॉ. रावसाहेब राऊत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश तनपुरे व कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. प्रवीण चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीण चव्हाण यांनी केले.

या प्रसंगी महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.