Saturday, January 31, 2026

फायदेशीर कापूस उत्पादनासाठी सघन लागवड व पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 

कापूस पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी कमी अंतरावर सघन पद्धतीने लागवड करावी, तसेच कीड व्यवस्थापनावरील खर्च आणि त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करावा, असे प्रतिपादन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले. ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राच्या वतीने दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी मौजे सायाळ (ता. लोहा, जि. नांदेड) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग व विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे उपस्थित होते.

सद्यस्थितीत हवामान बदलामुळे अतिवृष्टी अथवा पावसाच्या खंडामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब, बेडवरील लागवड, कमी कालावधीच्या वाणांची निवड अशा जोखीम कमी करणाऱ्या पद्धतींचा वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. एकाच पद्धतीवर अवलंबून राहण्याऐवजी पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर उत्पादन खर्च कमी करण्यासाठी पर्यायी निविष्ठा व आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचा वापर करावा, असेही त्यांनी नमूद केले. श्रम, सचोटी व सत्कार्य यांमुळेच जीवन आनंदमय होते, असा सल्ला त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला. तसेच शेतीकामात महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून त्यांना निर्णयप्रक्रियेत सहभागी केल्याशिवाय कुटुंबाची सर्वांगीण प्रगती होऊ शकत नाही, असेही माननीय कुलगुरूंनी यावेळी सांगितले.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी विद्यापीठामार्फत विकसित करण्यात आलेल्या बीटी स्वरूपातील सरळ कपाशी वाणांची माहिती दिली. तसेच विविध पिकांचे अधिक उत्पादनक्षम वाण विद्यापीठाने विकसित केले असून शेतकऱ्यांनी या वाणांची लागवड करावी, असे आवाहन केले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी विद्यापीठाने शिफारस केलेल्या पीक लागवड व संरक्षण तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादनात सातत्य येऊन शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी सायाळ गावातील प्रगतशील शेतकरी श्री. रत्नाकर ढगे यांनी सघन पद्धतीने कापूस लागवड केल्यामुळे उत्पादनात ३० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे सांगितले. तसेच गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाच्या नवीन तंत्रज्ञानामुळे अळीचा प्रादुर्भाव लक्षणीयरीत्या कमी झाल्याचा अनुभव त्यांनी व्यक्त केला. पारडी (ता. लोहा) येथील महिला शेतकरी गटाच्या सदस्या सौ. वर्षा पवार व इतर सदस्यांनी गटशेतीचे फायदे सांगितले. कापूस पिकात मूग हे आंतरपीक घेतल्यामुळे उत्पन्नात वाढ झाली असून, मूगाची डाळ गटामार्फत तयार करून प्रक्रिया उद्योग सुरू केल्याने अधिक आर्थिक लाभ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठ शिफारशीत तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे कमी खर्चात उत्पादनात वाढ होत असल्याचे अनुभवही त्यांनी कथन केले.

या मेळाव्यास संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे, डॉ. बस्वराज भेदे, डॉ. विजयकुमार चिंचाणे, डॉ. पवन ढोके, डॉ. संजय देवकुळे, तसेच कृषि विभाग, तालुका लोहा येथील अधिकारी व कर्मचारी आणि पंचक्रोशीतील सुमारे ३०० शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सायाळ येथील ग्रामस्थ तसेच संशोधन केंद्राचे श्री. सोनुले, श्री. ईंदरोड व श्री. जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.