Monday, February 16, 2026

वनामकृविच्या वनस्पती रोगशास्त्र विभागात आळंबी, ट्रायकोडर्मा व जैविक विघटन उत्पादन कौशल्यावर तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि महाविद्यालयातील वनस्पती रोगशास्त्र विभागात  भारतीय कृषि संशोधन परिषद यांच्या अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत आळंबी (मशरूम) उत्पादन, ट्रायकोडर्मा निर्मिती व जैविक विघटन उत्पादन या विषयांवर आधारित तीन दिवसीय कौशल्यवर्धक प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक ११ ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत करण्यात आले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य तसेच वनस्पती रोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रफुल घंटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि सांगितले की, आधुनिक शेतीत केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी पूरक व्यवसाय स्वीकारणे काळाची गरज आहे. आळंबी उत्पादन, ट्रायकोडर्मा व जैविक विघटकांची निर्मिती हे पर्यावरणपूरक व उत्पन्नवर्धक व्यवसाय असून शेतकरी, युवक व महिलांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

या प्रशिक्षणात आळंबी उत्पादनाची संपूर्ण प्रक्रिया, ट्रायकोडर्मा निर्मितीचे तंत्रज्ञान, जैविक विघटकांचा शेतीत वापर, कचरा व्यवस्थापन, सेंद्रिय शेतीतील उपयोग, उत्पादन खर्च, बाजारपेठेतील संधी तसेच स्वयंरोजगार निर्मिती याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणार्थ्यांना प्रात्यक्षिकांद्वारे प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील युवकांना कौशल्याधारित स्वयंरोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची ग्लोबल विकास ट्रस्टला भेट

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सिरसाळा (ता. परळी, जि. बीड) येथील ग्लोबल विकास ट्रस्टला भेट दिली. यावेळी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मयंक गांधी यांनी त्यांचे स्वागत केले.

ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून परळी तालुक्यातील विविध गावांमध्ये अनेक कृषी विषयक उपक्रम राबविण्यात येत असून, त्यांना विद्यापीठाकडून तांत्रिक पाठबळ पुरविण्यात येत आहे. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व ग्लोबल विकास ट्रस्ट यांच्यात यापूर्वी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे.

या भेटीदरम्यान भविष्यात संयुक्त उपक्रमांच्या माध्यमातून कार्य करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. फळबाग लागवड वाढविणे, रेशीम उद्योगास चालना देणे तसेच शेतीतील वैविध्यता जपण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्यावर मान्यवरांमध्ये एकमत झाले. या सहकार्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस लागून ग्रामीण भागातील शाश्वत विकासाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

Hon’ble Vice-Chancellor of Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Prof. (Dr.) Indra Mani, visited Global Development Trust.

 

The Hon’ble Vice Chancellor of Vasantrao Naik Marathwada Agricultural University, Parbhani, Prof. (Dr.) Indra Mani, visited the Global Development Trust at Sirsaala (Taluka Parli, District Beed) on 16 February 2026. On this occasion, the Trust’s Founder President, Mayank Gandhi, welcomed him.

Through the Global Development Trust, several agriculture-related initiatives are being implemented in various villages of Parli taluka, for which technical support is being provided by the University. A Memorandum of Understanding has already been signed earlier between Vasantrao Naik Marathwada Agricultural University and the Global Development Trust.

During the visit, detailed discussions were held on undertaking joint initiatives in the future. The dignitaries reached a consensus on working together to promote orchard development, boost sericulture, and preserve diversification in agriculture. It was expressed that this collaboration would help increase farmers’ income and accelerate sustainable development in rural areas.


वनामकृवित श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२६ निमित्त भव्य आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयामार्फत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंतीचे सुवर्ण जयंती दिक्षांत सभागृहात दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात आले असुन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि  हे राहणार. त्यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात येणार असुन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच दुपारी ४.०० वाजता शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी असे आवाहन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी केले आहे.

Sunday, February 15, 2026

वनामकृविच्या सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन केंद्रास मान्यवरांची भेट; मृदा आरोग्य व पोषणमूल्य अभ्यासावर भर

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठ, परभणी येथील सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्रास दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी मान्यवरांनी भेट दिली. या भेटीत विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राचे जैवतंत्रज्ञान विषयातील सेवानिवृत्त ख्यातनाम राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह, सहयोगी संचालक (बियाणे) तथा वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, करडई पैदासकार तथा प्रभारी अधिकारी डॉ. राजेश धूतमल, शास्त्रज्ञ डॉ. संतोष शिंदे यांचा समावेश होता.

मान्यवरांनी केंद्रातील सेंद्रिय व नैसर्गिक शेतीवरील विविध संशोधन प्रयोगांची पाहणी केली. यामध्ये भाजीपाला, तृणधान्य, कडधान्य व तेलबिया पिकांवरील संशोधन, हरभरा+करडई व हरभरा+जवस आंतरपीक पद्धती, रबी ज्वारी आदी पिकांवरील प्रयोगांचा समावेश होता. तसेच भारतीय कृषि  अनुसंधान परिषद (आयसीएआर) प्रायोजित नैसर्गिक शेती मॉडेल फार्मलाही त्यांनी भेट दिली.

या प्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेतीमुळे मातीतील सेंद्रिय कर्ब (Soil Organic Carbon) मध्ये होणारे हळूहळू सकारात्मक बदल तसेच शेतमालाच्या पोषणमूल्यातील सुधारणा यांचा शास्त्रीय अभ्यास करण्यावर भर दिला. पारंपरिक शिफारस केलेल्या ‘पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस’ची तुलना नैसर्गिक शेतीतील नवीन इनपुट्ससोबत करून उत्पादनासह इतर लाभांचे सखोल मूल्यांकन करावे, असेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह यांनी शेतकरी वापरत असलेल्या विविध शेती पद्धतींचे स्पष्ट परिभाषण व दस्तऐवजीकरण करण्याची गरज अधोरेखित केली. तसेच नवीन शिफारस केलेल्या उपाययोजनांशी तुलना करून अतिरिक्त लाभांचा अभ्यास करावा आणि नैसर्गिक शेतीखाली विविध वाणांचे परीक्षण व मूल्यांकन करावे, अशी सूचना त्यांनी केली.

यावेळी सेंद्रिय संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. आनंद गोरे यांनी केंद्रातील संशोधन व प्रशिक्षण उपक्रमांची माहिती दिली, तर डॉ पपीता गौरखेडे, यांनी नैसर्गिक शेती मॉडेल फार्मवरील उपक्रमांचे सादरीकरण केले. या भेटीप्रसंगी डॉ. विवेक घुगे, डॉ. तेजस्विनी कच्छवे यांच्यासह संशोधक, शास्त्रज्ञ व कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे नैसर्गिक व सेंद्रिय शेतीतील संशोधनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.





ज्वारी संशोधन अधिक बळकट करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व आंतरविभागीय सहकार्य आवश्यक – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठ अंतर्गत कार्यरत ज्वारी संशोधन केंद्रास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी शास्त्रीय पाहणी भेट देण्यात आली. या वेळी नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राचे जैवतंत्रज्ञान विषयातील सेवानिवृत्त ख्यातनाम राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह, उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे तसेच सहयोगी संचालक (बियाणे)डॉ. हिराकांत काळपांडे उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शनात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ज्वारीतील पोषणमूल्याशी संबंधित गुणधर्मांचे अचूक विश्लेषण करण्यासाठी प्रयोगशाळा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला. बदलत्या हवामान परिस्थितीला तोंड देणाऱ्या व उद्योगांच्या गरजांनुसार उपयुक्त ठरणाऱ्या वाणांच्या विकासावर संशोधन केंद्राने लक्ष केंद्रित करावे, जेणेकरून ज्वारीस बाजारपेठेत मागणी वाढून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल, असे त्यांनी सांगितले. तसेच अन्नतंत्रज्ञान व कृषि  अभियांत्रिकी विभागांशी समन्वय साधून विकसित होणारी तंत्रज्ञाने व्यवहार्य, वापरास सुलभ आणि शेतकरी-केंद्रित असावीत, अशा सूचना माननीय कुलगुरूंनी दिल्या.

या पाहणीदरम्यान ज्वारी पिकावरील सुरू असलेल्या संशोधन कार्याचा आढावा घेण्यात आला. मार्गदर्शन करताना प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह यांनी विद्यमान ज्वारी जनुकसंपदेतील (germplasm) विशिष्ट व उच्च मूल्याच्या गुणवैशिष्ट्यांचे संवर्धन, मूल्यमापन आणि शोध घेण्याची नितांत गरज अधोरेखित केली. प्रजनन प्रक्रिया वेगवान करण्यासाठी प्रगत फिनोटायपिंग व जीनोटायपिंग तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, तसेच सध्याच्या ज्वारी उत्पादनातील अडथळे दूर करण्यासाठी जैवतंत्रज्ञान तज्ज्ञांशी सहकार्य वाढवावे, अशी ठाम शिफारस त्यांनी केली.

या भेटीमुळे ज्वारी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांना पुढील स्तरावर संशोधन कार्य नेण्यासाठी महत्त्वपूर्ण दिशा व प्रेरणा मिळाल्याचे चित्र दिसून आले.




वनामकृविच्या बायोमिक्स संशोधनामुळे शाश्वत शेतीला नवी दिशा – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत कार्यरत बायोमिक्स संशोधन केंद्रास दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्र येथील जैवतंत्रज्ञान विषयातील सेवानिवृत्त ख्यातनाम राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह यांनी भेट दिली.

या प्रसंगी विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, संचालक बियाणे संशोधन डॉ. हिराकांत काळपांडे उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, बायोमिक्सच्या वापरामुळे हळद, अद्रक, फळपिके व भाजीपाला या पिकांमध्ये विक्रमी उत्पादन साध्य झाले असून हे शाश्वत व पर्यावरणपूरक शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जमिनीतील मित्र बुरशी व मित्र जिवाणूंची संख्या वाढून वनस्पतींची पोषणक्षमता, रोगप्रतिकारशक्ती व उत्पादनक्षमता सुधारत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे बायोमिक्सचे उत्पादन व प्रसार अधिक व्यापक स्तरावर वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह यांनी जैवतंत्रज्ञानाधारित इनपुट्समुळे खर्चात बचत, जमिनीची सुपीकता टिकवणे आणि दीर्घकालीन उत्पादनवाढ साध्य होते, असे प्रतिपादन केले. संशोधन–विस्तार–शेतकरी या त्रिसूत्रीचा प्रभावी समन्वय साधल्यास मराठवाड्यातील शेती अधिक सक्षम होईल, असेही त्यांनी नमूद केले.

सध्या बायोमिक्सची ख्याती शेतकऱ्यांमध्ये झपाट्याने वाढत असून, वापराकडे मोठ्या प्रमाणावर कल वाढलेला आहे. भविष्यात शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके व क्षेत्रीय चाचण्या वाढवून तंत्रज्ञानाचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

या भेटीदरम्यान बायोमिक्स संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी केंद्रातील संशोधन कार्य, तंत्रज्ञान हस्तांतरण व शेतकऱ्यांच्या शेतात बायोमिक्सच्या वापरामुळे झालेल्या उत्पादनवाढीबाबत सविस्तर माहिती दिली. या वेळी बायोमिक्स विभागातील श्री कपिल निर्वंळ, श्री राम रनेर तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.




वनामकृविच्या करडई संशोधन केंद्रास मान्यवरांची भेट; आधुनिक जैवतंत्रज्ञानावर भर

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत असलेल्या करडईवरील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (AICRP on Safflower) केंद्रास दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राचे जैवतंत्रज्ञान विषयातील सेवानिवृत्त ख्यातनाम राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह यांनी भेट दिली.

या भेटीदरम्यान मान्यवरांनी केंद्रावर सुरू असलेल्या करडई पिकाच्या संशोधन उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. सध्या केंद्रावर पैदास (Breeding) २१, अग्रोनॉमी ६, रोगशास्त्र ८ अशा चाचण्या सुरू असून ८०० हून अधिक जर्मप्लाझम संग्रह उपलब्ध आहे. सुमारे ४ हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिक व चाचणी प्रयोग राबविले जात आहेत.

करडई पिकातील सुधारित वाणनिर्मिती, रोग-किड व्यवस्थापन, उत्पादनवाढीचे तंत्रज्ञान, तेलगुणवत्ता सुधारणा तसेच हवामान बदलास अनुरूप संशोधन या बाबींवर मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी जैवतांत्रिक हस्तक्षेप, बियाणे शुद्धता राखणे आणि संशोधनातून विकसित तंत्रज्ञानाचे प्रभावी हस्तांतरण यावर अधिक भर देण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शनात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मराठवाडा विभागातील कोरडवाहू शेतीसाठी करडई पिकाचे महत्त्व अधोरेखित करून संशोधन निष्कर्ष थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश दिले. तर प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह यांनी आधुनिक जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्पादनक्षमता वाढविणे व ताणतणाव-सहनशील वाण विकसित करण्यासाठी संशोधन अधिक बळकट करण्याचा सल्ला दिला.

यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी संचालक (बियाणे) तथा वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, करडई पैदासकार तथा प्रभारी अधिकारी डॉ. राजेश धूतमल, शास्त्रज्ञ डॉ. संतोष शिंदे आदी उपस्थित होते. केंद्राच्या भविष्यातील संशोधन दिशा, आंतरसंस्थात्मक सहकार्य आणि शेतकरीहिताच्या विविध उपक्रमांबाबत सकारात्मक चर्चा यावेळी झाली.