Sunday, February 15, 2026

ज्वारी संशोधन अधिक बळकट करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व आंतरविभागीय सहकार्य आवश्यक – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठ अंतर्गत कार्यरत ज्वारी संशोधन केंद्रास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी शास्त्रीय पाहणी भेट देण्यात आली. या वेळी नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राचे जैवतंत्रज्ञान विषयातील सेवानिवृत्त ख्यातनाम राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह, उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे तसेच सहयोगी संचालक (बियाणे)डॉ. हिराकांत काळपांडे उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शनात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ज्वारीतील पोषणमूल्याशी संबंधित गुणधर्मांचे अचूक विश्लेषण करण्यासाठी प्रयोगशाळा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला. बदलत्या हवामान परिस्थितीला तोंड देणाऱ्या व उद्योगांच्या गरजांनुसार उपयुक्त ठरणाऱ्या वाणांच्या विकासावर संशोधन केंद्राने लक्ष केंद्रित करावे, जेणेकरून ज्वारीस बाजारपेठेत मागणी वाढून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल, असे त्यांनी सांगितले. तसेच अन्नतंत्रज्ञान व कृषि  अभियांत्रिकी विभागांशी समन्वय साधून विकसित होणारी तंत्रज्ञाने व्यवहार्य, वापरास सुलभ आणि शेतकरी-केंद्रित असावीत, अशा सूचना माननीय कुलगुरूंनी दिल्या.

या पाहणीदरम्यान ज्वारी पिकावरील सुरू असलेल्या संशोधन कार्याचा आढावा घेण्यात आला. मार्गदर्शन करताना प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह यांनी विद्यमान ज्वारी जनुकसंपदेतील (germplasm) विशिष्ट व उच्च मूल्याच्या गुणवैशिष्ट्यांचे संवर्धन, मूल्यमापन आणि शोध घेण्याची नितांत गरज अधोरेखित केली. प्रजनन प्रक्रिया वेगवान करण्यासाठी प्रगत फिनोटायपिंग व जीनोटायपिंग तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, तसेच सध्याच्या ज्वारी उत्पादनातील अडथळे दूर करण्यासाठी जैवतंत्रज्ञान तज्ज्ञांशी सहकार्य वाढवावे, अशी ठाम शिफारस त्यांनी केली.

या भेटीमुळे ज्वारी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांना पुढील स्तरावर संशोधन कार्य नेण्यासाठी महत्त्वपूर्ण दिशा व प्रेरणा मिळाल्याचे चित्र दिसून आले.