Sunday, February 15, 2026

वनामकृविच्या सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन केंद्रास मान्यवरांची भेट; मृदा आरोग्य व पोषणमूल्य अभ्यासावर भर

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठ, परभणी येथील सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्रास दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी मान्यवरांनी भेट दिली. या भेटीत विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राचे जैवतंत्रज्ञान विषयातील सेवानिवृत्त ख्यातनाम राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह, सहयोगी संचालक (बियाणे) तथा वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, करडई पैदासकार तथा प्रभारी अधिकारी डॉ. राजेश धूतमल, शास्त्रज्ञ डॉ. संतोष शिंदे यांचा समावेश होता.

मान्यवरांनी केंद्रातील सेंद्रिय व नैसर्गिक शेतीवरील विविध संशोधन प्रयोगांची पाहणी केली. यामध्ये भाजीपाला, तृणधान्य, कडधान्य व तेलबिया पिकांवरील संशोधन, हरभरा+करडई व हरभरा+जवस आंतरपीक पद्धती, रबी ज्वारी आदी पिकांवरील प्रयोगांचा समावेश होता. तसेच भारतीय कृषि  अनुसंधान परिषद (आयसीएआर) प्रायोजित नैसर्गिक शेती मॉडेल फार्मलाही त्यांनी भेट दिली.

या प्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेतीमुळे मातीतील सेंद्रिय कर्ब (Soil Organic Carbon) मध्ये होणारे हळूहळू सकारात्मक बदल तसेच शेतमालाच्या पोषणमूल्यातील सुधारणा यांचा शास्त्रीय अभ्यास करण्यावर भर दिला. पारंपरिक शिफारस केलेल्या ‘पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस’ची तुलना नैसर्गिक शेतीतील नवीन इनपुट्ससोबत करून उत्पादनासह इतर लाभांचे सखोल मूल्यांकन करावे, असेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह यांनी शेतकरी वापरत असलेल्या विविध शेती पद्धतींचे स्पष्ट परिभाषण व दस्तऐवजीकरण करण्याची गरज अधोरेखित केली. तसेच नवीन शिफारस केलेल्या उपाययोजनांशी तुलना करून अतिरिक्त लाभांचा अभ्यास करावा आणि नैसर्गिक शेतीखाली विविध वाणांचे परीक्षण व मूल्यांकन करावे, अशी सूचना त्यांनी केली.

यावेळी सेंद्रिय संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. आनंद गोरे यांनी केंद्रातील संशोधन व प्रशिक्षण उपक्रमांची माहिती दिली, तर डॉ पपीता गौरखेडे, यांनी नैसर्गिक शेती मॉडेल फार्मवरील उपक्रमांचे सादरीकरण केले. या भेटीप्रसंगी डॉ. विवेक घुगे, डॉ. तेजस्विनी कच्छवे यांच्यासह संशोधक, शास्त्रज्ञ व कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे नैसर्गिक व सेंद्रिय शेतीतील संशोधनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.