परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत कार्यरत
बायोमिक्स संशोधन केंद्रास दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यापीठाचे माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद
अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्र येथील जैवतंत्रज्ञान
विषयातील सेवानिवृत्त ख्यातनाम राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार
सिंह यांनी भेट दिली.
या प्रसंगी विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ.
विश्वनाथ खंदारे, संचालक बियाणे संशोधन डॉ. हिराकांत काळपांडे उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले
की, बायोमिक्सच्या वापरामुळे हळद, अद्रक, फळपिके व भाजीपाला या पिकांमध्ये विक्रमी उत्पादन साध्य झाले असून हे
शाश्वत व पर्यावरणपूरक शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जमिनीतील मित्र बुरशी व
मित्र जिवाणूंची संख्या वाढून वनस्पतींची पोषणक्षमता, रोगप्रतिकारशक्ती
व उत्पादनक्षमता सुधारत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे बायोमिक्सचे उत्पादन
व प्रसार अधिक व्यापक स्तरावर वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह यांनी जैवतंत्रज्ञानाधारित इनपुट्समुळे खर्चात
बचत, जमिनीची सुपीकता टिकवणे आणि दीर्घकालीन उत्पादनवाढ साध्य होते, असे प्रतिपादन केले. संशोधन–विस्तार–शेतकरी या त्रिसूत्रीचा प्रभावी
समन्वय साधल्यास मराठवाड्यातील शेती अधिक सक्षम होईल, असेही
त्यांनी नमूद केले.
सध्या बायोमिक्सची ख्याती शेतकऱ्यांमध्ये झपाट्याने वाढत असून, वापराकडे मोठ्या
प्रमाणावर कल वाढलेला आहे. भविष्यात शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके
व क्षेत्रीय चाचण्या वाढवून तंत्रज्ञानाचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत
पोहोचविण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
या भेटीदरम्यान बायोमिक्स संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर
अंबाडकर यांनी केंद्रातील संशोधन कार्य, तंत्रज्ञान हस्तांतरण व
शेतकऱ्यांच्या शेतात बायोमिक्सच्या वापरामुळे झालेल्या उत्पादनवाढीबाबत सविस्तर
माहिती दिली. या वेळी बायोमिक्स विभागातील श्री कपिल निर्वंळ, श्री राम रनेर तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

