Sunday, February 15, 2026

वनामकृविच्या करडई संशोधन केंद्रास मान्यवरांची भेट; आधुनिक जैवतंत्रज्ञानावर भर

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत असलेल्या करडईवरील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (AICRP on Safflower) केंद्रास दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राचे जैवतंत्रज्ञान विषयातील सेवानिवृत्त ख्यातनाम राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह यांनी भेट दिली.

या भेटीदरम्यान मान्यवरांनी केंद्रावर सुरू असलेल्या करडई पिकाच्या संशोधन उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. सध्या केंद्रावर पैदास (Breeding) २१, अग्रोनॉमी ६, रोगशास्त्र ८ अशा चाचण्या सुरू असून ८०० हून अधिक जर्मप्लाझम संग्रह उपलब्ध आहे. सुमारे ४ हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिक व चाचणी प्रयोग राबविले जात आहेत.

करडई पिकातील सुधारित वाणनिर्मिती, रोग-किड व्यवस्थापन, उत्पादनवाढीचे तंत्रज्ञान, तेलगुणवत्ता सुधारणा तसेच हवामान बदलास अनुरूप संशोधन या बाबींवर मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी जैवतांत्रिक हस्तक्षेप, बियाणे शुद्धता राखणे आणि संशोधनातून विकसित तंत्रज्ञानाचे प्रभावी हस्तांतरण यावर अधिक भर देण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शनात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मराठवाडा विभागातील कोरडवाहू शेतीसाठी करडई पिकाचे महत्त्व अधोरेखित करून संशोधन निष्कर्ष थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश दिले. तर प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह यांनी आधुनिक जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्पादनक्षमता वाढविणे व ताणतणाव-सहनशील वाण विकसित करण्यासाठी संशोधन अधिक बळकट करण्याचा सल्ला दिला.

यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी संचालक (बियाणे) तथा वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, करडई पैदासकार तथा प्रभारी अधिकारी डॉ. राजेश धूतमल, शास्त्रज्ञ डॉ. संतोष शिंदे आदी उपस्थित होते. केंद्राच्या भविष्यातील संशोधन दिशा, आंतरसंस्थात्मक सहकार्य आणि शेतकरीहिताच्या विविध उपक्रमांबाबत सकारात्मक चर्चा यावेळी झाली.