Sunday, March 16, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने ३७ वा ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद संपन्न

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जावर पोहोचविण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि कीटकशास्त्र विभागाद्वारे आयोजित ३७ वा ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रम माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली १४ मार्च  रोजी यशस्वीपणे पार पडला.

या कार्यक्रमात बोलताना माननीय कुलगुरूंनी मोदीपुरम (मीरत, उत्तर प्रदेश) येथील पहिल्या आंतरराष्ट्रीय एकात्मिक शेती पद्धती परिषदेत तसेच नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान संस्थान आणि उत्तर भारतातील विविध संशोधन केंद्रांना भेटी दिल्याचे सांगितले. या उपक्रमात मराठवाड्यातील प्रगतशील शेतकऱ्यांनी भाग घेतला होता आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांशी संवाद साधला. विद्यापीठाच्या पुढाकारामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. मराठवाड्यातील शेतकरी राज्य पातळीवर चॅम्पियन होते, या सहभागातून ते राष्ट्रीय पातळीवर पोहोचले. भविष्यात मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जावर पोहोचविण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापुढे जिल्हाधिकाऱ्यांच्या समन्वयाने अधिकाधिक शेतकऱ्यांना अशा उपक्रमात सहभागी करून घेतले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

झाशी येथील आर.एल.बी.सी.ए.यु.चे माननीय कुलगुरू व भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक डॉ. पंजाब सिंह यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय स्तरावर मोठी प्रगती साधल्याचे गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी केले. त्यांनी शेतकऱ्यांनी या अभिनव उपक्रमाचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन केले.

मोदीपुरम दौऱ्यात सहभागी झालेले शेतकरी १४ मार्च रोजी परभणी येथे परतले आणि त्यांनी या कार्यक्रमात आपले अनुभव सांगितले. श्री. जनार्दन आवरगंड यांनी शास्त्रज्ञांशी झालेल्या संवादातून नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळाल्याचे सांगितले. श्री. रत्नाकर ढगे यांनी पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. भारत भूषण त्यागी यांच्या शेतीला भेट दिल्याचे आणि त्यातून नवे प्रयोग करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.

श्रीमती सुषमा देव यांनी जागतिक महिला दिनानिमित्त मोदीपुरम येथे त्यांचा सत्कार झाल्याचे सांगितले आणि पद्मश्री श्री. त्यागी यांच्या सेंद्रिय शेतीला भेट देऊन सेंद्रिय शेतीचे महत्त्व अधिक पटल्याचे सांगितले. याच कार्यक्रमातून महिला शेतकऱ्यांना विक्री व्यवस्थापनाच्या नव्या संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात उन्हाळी हंगामातील भाजीपाला लागवडीबाबत डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी वेलवर्गीय भाजीपाला, खरबूज, टरबूज, मिरची, टोमॅटो लागवडीसंबंधी महत्त्वाच्या बाबी शेतकऱ्यांना सांगितल्या.

या कार्यक्रमात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या महिला शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यांचे प्रश्न विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. वसंत सूर्यवंशी, प्रा. अरुण गुट्टे, डॉ. गजानन गडदे, डॉ. एस एल जावळे, डॉ. रमेश पाटील, डॉ. जाधव यांनी समर्पक उत्तरांद्वारे सोडवले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मानले.