सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात प्रायोगिक पूर्व-प्राथमिक शाळेचा १३ वा दीक्षांत समारंभ संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागांतर्गत कार्यरत प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेतील ब्रिज सेक्शनच्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ दिनांक २८ मार्च रोजी आयोजित करण्यात आला. दीक्षांत समारंभाच्या पाश्चात्य पद्धतीस फाटा देऊन भारतीय संस्कृतीची जपणूक करत गतवर्षापासून या शाळेतर्फे या समारंभाचे आयोजन केले जाते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्व प्राथमिक
शिक्षणाचे अनन्य साधारण महत्व असून ते दर्जेदारपणे प्राप्त झाल्यास बालकांचे
भविष्य उज्वल होते. विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा ताण येणार नाही याबाबत
दक्षता घेऊन त्यांना आनंददायी शिक्षण द्यावे असे मत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी
उपस्थिताना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. सामुदायिक
विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभाग अंतर्गत असलेल्या
पूर्व प्रायोगिक प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या तेराव्या
दीक्षांत समारंभात अध्यक्षीय समारोप करताना त्यांनी आपले विचार मांडले. या शाळेची
प्रतिमा टिकून ठेवत ती अधिक उंचावण्यासाठी कार्यरत असणारे प्राध्यापक तसेच सर्व
शिक्षक आटोकाट प्रयत्न करत असल्याने त्यांचेही त्यांनी अभिनंदन केले.
विद्यार्थ्यानी शिक्षणासोबतच विनयशील असणे महत्वाचे असल्याचे नमूद केले. यावेळी
माननीय कुलागुरुनी विद्यार्थ्यांना घरातील आई - वडिलांचा, मोठ्या व्यक्तींचा आदर, शिक्षकांचा सन्मान तसेच
पर्यावरणाचे रक्षण, आपल्या राष्ट्राचा सन्मान करावा अशी
यावेळी विदयार्थ्यांना प्रतिज्ञा दिली.
या समारंभासाठी उपस्थित असलेल्या विशेष अतिथी माननीय श्रीमती
जयश्री मिश्रा व
अन्नतंत्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर यांनी
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच
बालकांच्या आहाराबाबत काळजी घेताना त्यांना फास्टफुड पासून दूर ठेवत
पौष्टिक आहार देण्यासाठी पालकांनी प्रयत्नशिल असावे असे डॉ. राजेश क्षीरसागर यांनी
याप्रसंगी स्पष्ट केले.
प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेतील ४ वर्षाचे शिक्षण पूर्ण
करुन हे सर्व विद्यार्थी पुढील शिक्षण घेण्यासाठी सर्वोतोपरी तयार झालेले असून
निश्चितच त्यांचे भविष्य उज्वल राहाणार आहे असे आपल्या प्रास्ताविकात सामुदायिक विज्ञान
महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. जया बंगाळे यांनी अधोरेखित
केले. या समारोहात ब्रिज सेक्शनचे विद्यार्थी देवांश करभाजने आणि रेयांश वाघमारे
यांनी शाळेविषयी असणाऱ्या त्यांच्या हृदयस्पर्शी भावना प्रातिनिधीक स्वरूपात
व्यक्त केल्या. कार्यक्रमात प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेमधून पूर्व प्राथमिक
शिक्षण यशस्वीपणे
पूर्ण केलेल्या एकूण ३२ विद्यार्थ्यांना मान्यवरांनी प्रशस्तीपत्रे प्रदान केली.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या विविध विभागाचे प्रमुख डॉ. विजया पवार, डॉ. शंकर पूरी, सहा-प्राध्यापक डॉ. विद्यानंद मनवर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. नीता गायकवाड, डॉ. वीणा भालेराव तसेच शाळेतील सर्व शिक्षिका, मदतनीस ,महाविद्यालयीन कर्मचारी, पदवीपूर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. डॉ.वीणा भालेराव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक ,प्राध्यापक व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.