विद्यार्थ्यांनी बदलत्या औद्योगिक गरजांनुसार कौशल्य विकसित करणे गरजेचे… माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परभणी येथील कृषी महाविद्यालयाच्या वतीने "कॅम्पस टू कॉर्पोरेट" या तीन दिवसांच्या विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ११ मार्च ते १३ मार्च २०२५ या कालावधीत पार पडला. विद्यार्थ्यांच्या सॉफ्ट स्किल्स व रोजगारक्षमतेसाठी आवश्यक कौशल्य विकासावर भर देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन दिनांक ११ मार्च रोजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची अध्यक्षतेखाली संपन्न झाले. मुख्य अतिथी म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार हे होते. कार्यक्रमास सहयोगी अधिष्ठाता डॉ सय्यद इस्माईल, प्लेसमेंट सेलचे अध्यक्ष डॉ. रणजीत चव्हाण, कॉर्पोरेट क्षेत्रातील तज्ज्ञ श्री. संतोष सांगवे आदींची उपस्थिती होती.
आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील आवश्यक
कौशल्ये आत्मसात करण्याचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी बदलत्या औद्योगिक
गरजांनुसार कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे, यामुळे त्यांना उत्तम संधी उपलब्ध
होतील. असे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षण संचालक डॉ. भगवान
आसेवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, उद्योजक जन्मत: होत नाहीत,
ते घडवले जातात. त्यासाठी संवाद कौशल्य, नेतृत्वगुण
आणि ठोस निर्णयक्षमतेची आवश्यकता आहे.
कार्यशाळेच्या प्रारंभी प्लेसमेंट
सेलचे अध्यक्ष डॉ. रणजीत चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. यानंतर कॉर्पोरेट तज्ज्ञ
श्री. संतोष सांगवे यांनी विद्यार्थ्यांना मुलाखत कौशल्य, संभाषण
कौशल्य आणि ध्येयधिष्ठित वर्तन याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या
प्रतिनिधी म्हणून नवल कोंडे यांनी मनोगत व्यक्त केले.
उद्घाटन समारंभास विविध विभागाचे प्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अनुराधा लाड यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. धीरज पाथरीकर आणि ऋचा जाधव यांनी केले. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला.