सोहळ्यात वनामकृविच्या शास्त्रज्ञांचाही यथोचित गौरव
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मेहनतीला सलाम करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित वार्षिक “सत्यमेव जयते फार्मर कप” पुरस्कार सोहळा बालेवाडी क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे २३ मार्च रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमात माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचा आणि मान्यवरांच्या शुभहस्ते राज्यभरातील ४,३६० शेतकरी गटांचा तसेच कृषि क्षेत्रातील शास्त्रज्ञांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यास महाराष्ट्र
राज्याचे माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस प्रमुख
अतिथी म्हणून उपस्थित होते. माननीय कृषि मंत्री ना. श्री माणिकरावजी कोकाटे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक
अध्यक्ष श्री अमिर खान आणि किरण राव, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यजित भटकळ सह्याद्री
एग्रोचे श्री विलास शिंदे यांची विशेष उपस्थिती होती.
शेतीविकास व
शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी मोलाची भूमिका बजावल्याने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना या कार्यक्रमासाठी
विशेष निमंत्रण देण्यात आले. कुलगुरूंनी उपस्थित राहून शेतकरी व शास्त्रज्ञांना
प्रेरणा दिली.
कार्यक्रमात पाणी
फाउंडेशनचे संस्थापक श्री आमिर खान यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाच्या ऑनलाइन शेतकरी शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाचे कौतुक करून
शेतकऱ्यांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे नमूद केले.
या सोहळ्यात विद्यापीठाचे
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ राकेश अहिरे यांच्याही कृषि
विकासातील योदानाबद्दल पुरस्कार देण्यात आला.
दिवसभर चाललेल्या या
सोहळ्यात शेतकऱ्यांच्या संघर्षमय वाटचालीची, जिद्दीची आणि यशाची कथा
उलगडणाऱ्या प्रेरणादायी सादरीकरणांचा समावेश होता. कार्यक्रमाद्वारे राज्यातील
जलसंधारण आणि शाश्वत शेतीसाठी कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांना उचित
सन्मान मिळाला.
या कार्यक्रमात कृषि
संशोधन व तंत्रज्ञानाच्या प्रसारात भरीव योगदान देणाऱ्या वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात विशेषतः
तुरीच्या गोदावरी वाणाचे जनक डॉ. दीपक पाटील, सोयाबीन मध्ये उल्लेखनीय कार्य
केलेले डॉ. शिवाजी म्हेत्रे, कापूस संशोधक डॉ. अरविंद
पांडागळे, ज्वार तज्ञ डॉ. एल. एन. जावळे, वनस्पती रोग
शास्त्रज्ञ डॉ. गजेंद्र जगताप आणि डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ.
प्रीतम भुतडा, सोयाबीन तज्ञ डॉ. राजेंद्र
जाधव, आणि डॉ. प्रशांत सोनटक्के यांचा सन्मान करण्यात आला.
याबरोबरच कीटकशास्त्र क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. पी. एस. नेहरकर,
डॉ. मिलिंद सोनकांबळे आणि डॉ. अनंत लाड यांचा यथोचित गौरव करण्यात
आला. त्यांच्या संशोधनामुळे कृषि क्षेत्रात नवसंशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा
प्रभावी वापर होण्यास मदत झाली आहे.
कार्यक्रमास विविध
क्षेत्रातील मान्यवर आणि समाजातील अनेक स्तरांतील नागरिक उपस्थित होते. हा सोहळा
शेतकरी व कृषि क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला. पाणी फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे
महाराष्ट्रातील शेतकरी व शास्त्रज्ञांना नवसंजीवनी मिळत असून त्यांच्या
परिश्रमांना योग्य मान्यता मिळत आहे.
पाणी फाउंडेशनच्या वतीने विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या सन्मानामुळे विद्यापीठात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या सर्वांचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी कौतुक करून अभिनंदन केले.