शेतकरी स्वतःच इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात, ही पद्धत सहज, सरळ आणि प्रभावी ... माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ‘शेतकरी
देवो भव:’ भावनेतून प्रगतशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा मुलाखती
द्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. या ऑनलाईन नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या
मालिकेचा चौथा भाग दिनांक ११ मार्च रोजी
माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.
आनंद गोरे
यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन सेंद्रीय शेती संशोधन व
प्रशिक्षण केंद्र आणि शेकरु फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या
भागात प्रगतशील शेतकरी श्री. नरेश शिंदे (सणपुरी, जि.
परभणी) यांनी नैसर्गिक शेती आणि हळद
प्रक्रिया उद्योगाची यशोगाथा विद्यापीठाच्या स्टुडिओ मधून त्यांच्या मुलाखती
द्वारे सादर केली.
यावेळी माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी म्हणाले
की, मोदीपुरम (मीरत,
उत्तर प्रदेश) येथे भारतीय शेती संशोधन संस्थेमध्ये आयोजित पहिल्या
आंतरराष्ट्रीय एकात्मिक शेती पद्धती परिषदेत परभणी येथून कुलगुरूंसोबत प्रगतशील
शेतकरी, विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांसह १५ जणांचा चमू सहभागी
झाला. या परिषदेत विद्यापीठाच्या 'शेतकरी-शास्त्रज्ञ कृषी
संवाद' या उपक्रमावर विशेष चर्चा झाली. या उपक्रमाचे
राष्ट्रीय पातळीवरील अतिउच्च शास्त्रज्ञांनी कौतुक केले. मराठवाड्यातील
शेतकऱ्यांचे विद्यापीठासोबत असलेली जवळीकता आणि विस्तार कार्यात त्यांचा सक्रीय
सहभाग यामुळे हे यश मिळाले आहे. विद्यापीठाने विकसित केलेली तंत्रज्ञान
शेतकऱ्यांनी आत्मसात करून आपल्या शेतीच्या प्रगतीसाठी वापरल्याने हा उपक्रम
देशपातळीवर एक आदर्श ठरत आहे. या यशस्वी सहभागाबद्दल माननीय कुलगुरूंनी
मराठवाड्यातील शेतकरी आणि विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे अभिनंदन करून शुभेच्छा
दिल्या. परिषदेच्या अनुषंगाने मिरत येथे आयोजित शेतकरी सत्रात मराठवाड्यातील चार
प्रगतशील शेतकऱ्यांनी आपले अनुभव मनोगतातून व्यक्त केले. शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या
'शेतकरी देवो भव:' या भावनेतून
चालणाऱ्या कार्याचा उल्लेख करत, विशेषतः "माझा एक दिवस माझ्या
बळीराजासोबत" या उपक्रमाबाबत माहिती दिली. तसेच दर मंगळवारी आणि शुक्रवारी
संध्याकाळी सात वाजता आयोजित ऑनलाइन 'शेतकरी-शास्त्रज्ञ कृषी
संवाद' याचा त्यांच्या शेती प्रगतीतील योगदानासंदर्भात
उल्लेख केला. विद्यापीठ देशपातळीवरील एकमेव मॉडेल राबवून शेतकऱ्यांच्या यशोगाथा
समोर आणत आहे. यातून शेतकरी स्वतःच इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात, ही पद्धत सहज, सरळ आणि प्रभावी ठरत आहे. शाश्वत
शेतीला यातून मोठा लाभ होणार असून, या कार्यक्रमाचा योग्य
लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे
आवाहन माननीय कुलागुरुनी यावेळी केले.
मृदा शास्त्रज्ञा डॉ. पपिता गौरखेडे यांनी प्रगतशील प्रगतशील
शेतकरी श्री. नरेश शिंदे यांची मुलाखत घेतली.
यावेळी श्री. नरेश शिंदे यांनी नैसर्गिक शेतीविषयी सखोल मार्गदर्शन करताना शाश्वत
शेती पद्धतींचे महत्व स्पष्ट केले. त्यांनी नैसर्गिक शेती ही केवळ पर्यावरणपूरक
नाही तर ती दीर्घकाळ टिकणारी आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते, असे
सांगितले.
हळद ही एक महत्त्वाची औषधी आणि मसाल्याची पिके पैकी एक आहे.
श्री. शिंदे यांनी हळदीच्या लागवडीपासून ते प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत येणाऱ्या
अडचणी, त्यावर उपाययोजना आणि यामध्ये घ्यावयाची काळजी यावर सविस्तर माहिती दिली. त्यांनी
सांगितले की, हळदीच्या लागवडीसाठी चांगल्या प्रतिच्या
बियाणांची निवड, योग्य प्रकारच्या सेंद्रिय खते आणि विद्यापीठाच्या
बायोमिक्सचा वापर, तसेच पाण्याचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. नैसर्गिक पद्धतीने शेती केल्यास मातीचा पोत
सुधारतो आणि उत्पादनातील गुणवत्ताही वाढते.
हळद काढल्यानंतर योग्य प्रकारे सुकवणे, प्रक्रिया
करणे आणि साठवणूक यावरही त्यांनी भर दिला. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून
सांगितले की, जर शेतकऱ्यांनी प्रक्रिया केलेली हळद बाजारात
आणली तर त्यांना अधिक चांगला भाव मिळू शकतो.
श्री. शिंदे यांनी नैसर्गिक शेतीचा स्वीकार केल्यामुळे
त्यांच्या उत्पादनात कसा फरक पडला, तसेच उत्पन्नात वाढ कशी झाली याचे
उदाहरण देऊन इतर शेतकऱ्यांना प्रेरणा दिली. शेवटी, नैसर्गिक
शेती ही शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर पर्याय असून ती केवळ आरोग्यासाठीच नव्हे,
तर आर्थिकदृष्ट्याही लाभदायक ठरू शकते, असे मत
त्यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांनी माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, संशोधन
संचालक डॉ. खिजर बेग आणि विद्यापीठातील सर्व शास्त्रज्ञांची वेळोवेळी मिळत
असलेल्या सहकार्याबद्दल आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाबद्दल आभार मानले.
कार्यक्रमात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून शंभरहून अधिक
शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला. त्यांनी श्री. शिंदे यांना नैसर्गिक
शेतीविषयी अनेक प्रश्न विचारले त्यास त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.