प्रक्रिया उद्योग व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्नवाढ करावी… माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभाग आणि एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान यांच्या
संयुक्त विद्यमाने "हळद काढणी पश्चात व्यवस्थापन व मूल्यवर्धन" या
विषयावर कार्यशाळा दिनांक २८ मार्च रोजी आडगाव (रंजे), ता वसमत येथे संपन्न झाली.
या कार्यशाळेस विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि अध्यक्षस्थानी
होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर प्रदेश शासनाच्या कृषि विभागाचे निवृत्त सह
संचालक (कृषि अभियांत्रिकी) व समन्वयक अधिकारी (पीक अवशेष व्यवस्थापन) डॉ. नीरज
कुमार श्रीवास्तव हे उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी जैविक हळद, केळी व इतर भाजीपाला
पिकांच्या लागवडीसंबंधी मार्गदर्शन केले. तसेच, विद्यापीठाच्या
"शेतकरी देवो भव:" या भावनेचा उल्लेख करून,
शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योग व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून
उत्पन्नवाढ करावी, असे प्रतिपादन केले. विद्यापीठाच्या
वर्धापन दिनानिमित्त १८ मे रोजी शेतकऱ्यांसाठी कृषि मेळाव्याचे आयोजन करण्यात
येणार असून, त्यात विविध प्रक्रिया उद्योगांचे प्रात्यक्षिक
हाती घेण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेस आडगाव (रंजे)
गावचे सरपंच श्री. दिलीपराव चव्हाण, प्रगतशील शेतकरी श्री. अंकुश
रामराव चव्हाण, सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. बी. क्षीरसागर,
विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे आणि कृषि अधिकारी श्री. गजानन वरुडकर
यांची विशेष उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे डॉ. नीरज
कुमार श्रीवास्तव यांनी आडगाव (रंजेबुवा) येथील हळदीचे उत्तर प्रदेशात निर्यातसंधी
उपलब्ध होऊ शकतात,
याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शक डॉ. आर. बी.
क्षीरसागर यांनी हळद काढणी पश्चात प्रक्रिया व मूल्यवर्धन उद्योगाबद्दल सखोल
माहिती देत, शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगात सहभागी होण्याचे
आवाहन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. व्ही. एस.
खंदारे यांनी केले. तसेच, डॉ. गजानन गडदे यांनी हळद लागवड
तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करत निंबोळी अर्क व विषमुक्त भाजीपाला उत्पादनाच्या
तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली. गावचे सरपंच श्री. दिलीपराव चव्हाण आणि
प्रगतशील शेतकरी श्री. रंगनाथ चव्हाण यांनी विद्यापीठातील तंत्रज्ञान आणि विविध
योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त
केली.
या कार्यशाळेच्या यशस्वी
आयोजनासाठी डॉ. बी. एम. कलालबंडी, डॉ. ए. टी. दवंडे, डॉ.
एस. बी. पव्हणे, डॉ. पी. एस. देशमुख, डॉ.
एस. जे. खंडागळे, डॉ. कैलास पालेपाड, डॉ.
राजू गावडे तसेच आडगाव (रंजेबुवा) येथील ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशा सातपुते यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. प्रियंका
कारंडे यांनी केले.
कार्यशाळेला शेतकऱ्यांचा
उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि त्यांना हळद प्रक्रियेसाठी उपयुक्त तंत्रज्ञान व
नवीन संधींची माहिती मिळाली.