Monday, March 24, 2025

वनामकृविच्या छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प आणि कृषि महाविद्यालयास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भेट

 "वर्ड चा उत्तम वापर करत वर्ल्ड कवेत घ्या" असा मंत्र माननीय कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना दिला


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक २४ मार्च रोजी विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प आणि कृषि महाविद्यालय (लिहाखेडी) येथे भेट दिली. या प्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे त्यांच्यासमवेत होते.

विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन सत्रात माननीय कुलगुरूंनी कृषि शिक्षण घेत असलेल्या दुसऱ्या सत्राच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच व्यक्तिमत्व विकासावर भर देण्याचा सल्ला दिला. चार वर्षांची पदवी शिक्षणाची कालावधी ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाची संधी असते. त्यामुळे कृषि शिक्षणासोबत इतर क्षेत्रातील वाचन देखील तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच, मोकळ्या वेळेत गट तयार करून कृषि ज्ञानाची चर्चा करा, संवाद कौशल्य सुधारण्यासाठी प्रयत्न करा आणि आपल्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राची सखोल माहिती ठेवा, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

विद्यार्थ्यांनी आपल्या वेशभूषेकडे विशेष लक्ष द्यावे, कारण स्मार्ट आणि व्यवस्थित राहणाऱ्या व्यक्तींना समाज सहज स्वीकारतो, असे सांगत त्यांनी आरोग्याची काळजी घेण्याचीही सूचना दिली. मराठीबरोबरच इंग्रजीतही प्रभुत्व मिळविण्यासाठी प्रयत्न करा, कारण उत्तम संवाद कौशल्य हे यशाची गुरुकिल्ली आहे. योग्य शब्दांची निवड करणाऱ्या लोकांनी जग जिंकले आहे, असे सांगून "वर्ड चा उत्तम वापर करत वर्ल्ड कवेत घ्या" असा मंत्रही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

या प्रसंगी सहयोगी संचालक संशोधन तथा प्राचार्य डॉ. सूर्यकांत पवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. माननीय कुलगुरूंच्या या भेटीमुळे संपूर्ण महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास मोठी चालना मिळेल, असा विश्वास प्राचार्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास फळ संशोधन केंद्र हिमायत बागचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित मुंडे, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाचे डॉ. दिलीप हिंगोले, डॉ. सी. बी. पाटील, डॉ. नितीन पतंगे, डॉ. आशिष बागडे, श्री. संतोष ढगे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुरेखा कदम यांनी केले.