वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागातील भारतीय कृषि हवामान शास्त्र संघाच्या परभणी
चॅप्टरतर्फे २३ मार्च रोजी जागतिक हवामान दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला.
हा विशेष कार्यक्रम कृषि हवामानशास्त्र विभागातील पदव्युत्तर आणि पीएचडी
विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. यंदाच्या जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) थीम
"क्लोजिंग द अर्ली वॉर्निंग गॅप टुगेदर" या संकल्पनेवर कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात डॉ. के. के.
डाखोरे यांनी पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक हवामानशास्त्रीय तंत्रज्ञान यांचे
एकत्रीकरण करण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान
मॉडेलिंग आणि प्रिसिजन फार्मिंग यासारख्या तंत्रज्ञानाधारित उपायांचे महत्त्व
स्पष्ट केले. तसेच, शेतीच्या टिकावूपणासाठी आणि
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या आधुनिक हवामानशास्त्रीय पद्धतींचा उपयोग
करण्याबाबत मार्गदर्शन केले.
केरळ कृषि विद्यापीठातील
कृषि हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बी. अजितकुमार यांनी "केरळमधील
भूपृष्ठ तापमान गतीशीलता आणि उष्णतेशी संबंधित असुरक्षितता" या विषयावर सखोल
व्याख्यान दिले. तर बारामती येथील आयसीएआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एबायोटिक स्ट्रेस
मॅनेजमेंटचे वैज्ञानिक डॉ. रामनारायण सिंग यांनी "कृषि हवामानशास्त्रातील
बदलती भूमिका : हवामान पॅटर्न, पीक निरीक्षण आणि एआय भविष्यवाणी" या
विषयावर मार्गदर्शन केले. या चर्चांमधून आधुनिक हवामान अंदाज प्रणाली आणि कृत्रिम
बुद्धिमत्तेच्या मदतीने हवामानशास्त्र अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या
माध्यमातून हवामानशास्त्र आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणाने शेतकऱ्यांसाठी
प्रभावी अर्ली वॉर्निंग सिस्टिम विकसित करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. डॉ.
एम. जी. जाधव यांनी व्याख्यानातील महत्त्वाचे मुद्दे समारोपात मांडले, तर डॉ.
पी. आर. जयभाय आणि डॉ. ए. एम. खोब्रागडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
श्री. स्वात्विक पांडया यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर श्री. संतानु धवसे आणि सौ. अंजली कळे यांनी प्रमुख वक्त्यांची ओळख करून
दिली. कार्यक्रमाचा समारोप श्री. अंकुश चौगुले यांच्या आभार प्रदर्शनाने करण्यात
आला.
नवीन निवडून आलेले
कार्यकारी समिती सदस्य डॉ. रोहित शर्मा आणि डॉ. अरविंद तुपे यांनी ऑनलाईन
माध्यमातून कार्यक्रमात सहभाग घेतला व परभणी चॅप्टरच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
तसेच केरळ कृषि विद्यापीठ,
तामिळनाडू कृषि विद्यापीठ, आणि इतर
विद्यापीठांतील अनेक पदव्युत्तर आणि पीएचडी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग
घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
श्री. वाय. ई. कदम,
रामकृष्ण माने, आणि बी. एस. भालेराव या संशोधन
सहकाऱ्यांनी तसेच पदव्युत्तर आणि पीएचडी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. हा
उपक्रम कृषि हवामानशास्त्र क्षेत्रात नव्याने संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या
समावेशाला चालना देणारा ठरला.