Tuesday, March 25, 2025

कापूस संशोधन योजनेच्या कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

 एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन योजना, परभणी आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद - केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन: गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन तंत्रज्ञान प्रसार प्रकल्प' अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मंगळवारी, २५ मार्च रोजी कापूस संशोधन योजना, परभणी येथे पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. तर विशेष अतिथी म्हणून संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी उपस्थिती दर्शवली. व्यासपीठावर कापूस संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. अशोक जाधव, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, गहू व मका योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. उमाटे, कार्यक्रम समन्वयक डॉ. दिंगंबर पटाईत आणि प्रगतशील शेतकरी श्री. रत्नाकर ढगे आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कापूस, सोयाबीन व मका या पिकांच्या उत्पादन वाढीबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन केले. गुलाबी बोंडअळीच्या प्रतिकारशक्ती व्यवस्थापनासाठी केवळ रासायनिक कीटकनाशकांवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला. विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी सदैव सहकार्याची भूमिका बजावली असून 'शेतकरी देव भव:' हे ब्रीदवाक्य अधोरेखित करत कापसाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी विद्यापीठ विशेष संशोधन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रगतशील शेतकरी श्री रत्नाकर ढगे यांचा २६ जानेवारीला राष्ट्रपती भवनामध्ये बोलाविण्यात येवून त्यांचा सन्मान करण्यात आला, तो त्यांनी केलेल्या परिश्रमाची ही पावती आहे, त्यामुळे असे अनेक शेतकरी आपल्या मराठवाड्यातून निर्माण झाले पाहिजेत अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या 'नांदेड ४४' सारख्या कापूस वाणांच्या यशस्वी प्रयोगांची माहिती दिली. विद्यापीठाने आता सरळ वाणांमध्ये बीटी तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे नवीन वाण तीन वर्षांपर्यंत पुनर्लागवड करण्यायोग्य असून शेतकऱ्यांचा बियाण्यावरील खर्चही कमी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी कापसाच्या उत्पादनात झालेल्या वाढीच्या अनुभव मांडले. मागील वर्षी काही शेतकऱ्यांनी १५ क्विंटल प्रति एकर उत्पादन घेतले असून, सर्व शेतकऱ्यांनी या पुढील हंगामात अधिकाधिक उत्पादनाचा निर्धार करावा, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान पाच गावांतील प्रत्येकी १२ अशा एकूण ६० शेतकऱ्यांना विविध निविष्ठांचे वाटप करण्यात आले. यासोबतच कृषी विद्यापीठाच्या 'कृषी दैनंदिनी २०२५' चेदेखील वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी अधिकारी डॉ. अशोक जाधव यांनी केले. डॉ. डी. डी. पटाईत यांनी कपाशीवरील कीड व्यवस्थापन, डॉ. पी. बी. जाधव यांनी घनपद्धतीने कापूस लागवड, तर डॉ. पी. एस. नेहरकर यांनी कीटकनाशकांच्या संतुलित वापराबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी श्री. रत्नाकर ढगे यांनी राष्ट्रपती भवनातील त्यांच्या सत्काराचा अनुभव सांगत गटशेतीविषयी माहिती दिली. श्री. पंडित थोरात यांनी प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना मिळालेल्या वाढीव उत्पन्नाविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिंगंबर पटाईत यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत जाधव यांनी केले. कापूस संशोधन योजना, परभणी येथील कृषी सहाय्यक व संशोधन सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. परभणी आणि पाथरी तालुक्यातील खानापूर, आर्वी, टाकळगव्हाण, लोणी आणि बाभळगाव येथून ८० हून अधिक शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.