Saturday, March 8, 2025

शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत, मधमाशी पालनाच्या यशस्वी अनुभवांची मांडणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने कीटकशास्त्र विभागातील क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ कृषि संवादाचा ३६ वा भाग दिनांक ७ मार्च रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते.

या वेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधिकाधिक भर देण्याचे महत्त्व विशद केले. विद्यापीठाचे संशोधन व विस्तारकार्य शेतकरी केंद्रित असून ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेतून विद्यापीठ कार्यरत आहे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी शेतीतील समस्या मोकळेपणाने मांडाव्यात, शास्त्रज्ञांनी त्या समजून घेत प्रभावी मार्गदर्शन करावे, तसेच हवामान बदलानुसार आवश्यक उपाययोजना सुचवाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी केले. या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील मौजे पिरली येथील प्रगतशील शेतकरी श्री. दत्तू नारायण येरगुडे यांनी मधमाशी पालनाच्या आपल्या यशस्वी प्रवासाविषयी अनुभव सांगितले. त्यांनी २००७ पासून हा व्यवसाय सुरू केला असून, आनंद निकेतन कृषी महाविद्यालय आनंदवन वरोरा आणि भारतीय समाज प्रबोधन संस्था वरोरा येथे डॉ. तात्यासाहेब धानोरकर व डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी या क्षेत्रात यश मिळवले. त्यांनी अनेक शेतकऱ्यांना मधमाशी पालनाचे प्रात्यक्षिक, प्रशिक्षण दिले असून, मधमाशीपालकांचे अनेक गट तयार केले आहेत. किडींच्या नियंत्रणासाठी जैविक औषधांचा अधिकाधिक वापर करावा, रासायनिक घटकांचा माफक वापर करावा, यामुळे मधमाशांचे संरक्षण करता येईल, असे त्यांनी सांगितले. “मधमाशी वाचवा, मधमाशी जगवा,” हा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिला.

त्यांनी शेतीतील मधमाशांचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, कांदा, मोहरी, करडई, सूर्यफूल व भाजीपाला पिकांमध्ये मधमाशीच्या पेट्या ठेवल्यास उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ होते. तसेच, मधमाशी पालन करताना आवश्यक असलेल्या वातावरणाची पूर्तता कशी करावी, हेही त्यांनी समजावून सांगितले.

या कार्यक्रमात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसह विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी पीक संरक्षण व नियोजनविषयी विचारलेल्या प्रश्नांना विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. सुर्यकांत पवार, प्रा. अरुण गुट्टे यांनी सविस्तर उत्तरे दिली.

सूत्रसंचालन डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी केले तर आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले. शेतकरी-शास्त्रज्ञ कृषि संवाद हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरत असून, यामुळे आधुनिक तंत्रज्ञान व संशोधनाची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.