Sunday, March 9, 2025

मोदीपुरम (मीरत, उत्तर प्रदेश) येथे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना उकृष्ट शेतकरी पुरस्कार प्रदान

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले अभिनंदन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मार्गदर्शनातील मराठवाड्याच्या प्रगतशील शेतकऱ्यांना मोदीपुरम (मीरत, उत्तर प्रदेश) येथील शेती पद्धती संशोधन आणि विकास मंडळाचे (FSRDA) राष्ट्रीय पातळीवरील उकृष्ट शेतकरी पुरस्कार प्राप्त. सदरील पुरस्कार भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या मोदीपुरम येथील भारतीय शेती संशोधन संस्थेमध्ये आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय  एकात्मिक शेती पद्धती परिषदेच्या समारोप समारंभात दिनांक ९ मार्च रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.

समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून झाशी येथील आरएलबीसीएयुचे माननीय कुलगुरू तथा भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक डॉ. पंजाब सिंह हे होते. सन्माननीय अतिथी म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, मीरत येथील एसव्हीपीएयुटीचे कुलगुरू माननीय डॉ. के. के. सिंह, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (कृषी विस्तार) माननीय डॉ. राजबीर सिंह, झाशी येथील आरएलबीसीएयुचे माजी कुलगुरू माननीय डॉ. अरविंद कुमार, भागलपुर बिहारच्या बीएयुचे माजी कुलगुरू माननीय डॉ. ए. के. सिंह, मोदीपुरम येथील भारतीय शेती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. सुनील कुमार आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात कुलगुरू माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी पुरस्कार प्राप्त सर्व शेतकऱ्यांचे आणि अभिनंदन केले. यावेळी मार्गदर्शनात ते म्हणाले की, शेतकऱ्यांना उत्पादनापेक्षा आर्थिक नफा अधिक मिळण्यासाठी हवामान अनुकूल वाणांचा विकास होणे आवश्यक आहे. याबरोबरच कमी पाण्यात  येणारे, कीड व रोगांना बळी न-पडणारे, कमीत कमी निविष्ठांचा वापर करून अधिक उत्पादन देणारे वाण विकसित करून लागवडीवरील खर्चात बचत करावी लागेल. तसेच शाश्वत शेतीसाठी शेततळे विकास, सोलार उर्जा आणि सूक्ष्म सिंचनाचा वापर या त्रीसूत्री तंत्रज्ञानावर भर देणे आवश्यक आहे. विद्यापीठाने याच धर्तीवर संशोधन विकसित केले असून तुरीच्या गोदावरी या वाणापासून कोरडवाहू क्षेत्रात एकरी १० ते १२ क्विंटल आणि ठिबक सिंचन वर लागवड केल्यास जवळपास १८ क्विंटल पर्यंत उतार मिळू शकतो. शिवाय एखाद्या शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रावर लागवड केली तर त्यास कोरडवाहू मध्ये १२ ते १४ क्विंटल उतार मिळतो. शेतकऱ्यांनी गोदावरी वाणापासून एकरी १४ क्विंटल पर्यंत उतार घेतल्याचे आणि साधारणपणे एकरी एक लाखापर्यंत उत्पन्न मिळत असल्याच्या प्रतिक्रिया विद्यापीठास प्राप्त होत आहेत. शेतकरी तुरीचा गोदावरी वाण हा ऊसाला पर्याय म्हणून शेतकरी अवलंबत आहेत, असे सांगितले. ते पुढे म्हणाले की, कृषी विकासात शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा असून तो वाढविण्यासाठी विद्यापीठ ‘शेतकरी देव भव:’ या भावनेतून कार्य करत आहे. यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत या उपक्रमांतर्गत विद्यापीठाचे सर्व शास्त्रज्ञ शेतकऱ्यांसोबत राहून संवाद साधतात. याबरोबरच दर मंगळवारी आणि शुक्रवारी ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषि संवाद करतात, असे प्रतिपादन केले.

माजी कुलगुरू माननीय डॉ. अरविंद कुमार, यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेत कुलगुरू ते किसान असा सहभाग असल्याने ही परिषद अतिशय उत्कृष्ट पद्धतीने यशस्वी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. विशेषतः वसंतराव मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि हे स्वतः नऊ शेतकरी, चार शास्त्रज्ञ आणि दोन विद्यार्थी असे एकूण सोळा जणांचा चमूसह सहभागी झाले, ही महत्वपूर्ण बाब आहे असे नमूद केले.  त्यांनी शेतकऱ्यांनी कडधान्य, तेलबिया, भरड धान्याच्या शेतीकडे वळावे. तसेच पाण्याचा कार्यक्षम वापर आणि यंत्रीकीकणावर भर द्यावा असे सांगितले. याबरोबरच या परिषदेचे इतिवृत इंग्रजीसोबतच हिंदीत सुद्धा तयार करून देशातील सर्व कृषी विज्ञान  केंद्रांना उपलब्ध करून द्यावे असे आवाहन केले.

उपमहासंचालक (कृषी विस्तार) माननीय डॉ. राजबीर सिंह यांनी सांगितले की, परिषदेमध्ये देश विदेशातून प्रतिनिधी सहभागी झाले, विशेषकरून परभणी येथून  कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात शास्त्रज्ञासह प्रगतशील शेतकऱ्यांचा चमू सहभागी झाले, ही बाब मनाला भावली असून या परिषदेचे मुख्य आकर्षण राहिले आहे. या परिषदे मुळे शेतकऱ्यांना नव नवीन तंत्रज्ञान शिकायला, चर्चा करायला, तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करायला मिळाले ही फलश्रुती आहे. या परिषदेत डॉ इन्द्र मणि यांनी टूर एफिसिएन्सी ही नवीन संकल्पना रुजविली आहे. त्यांची ही संकल्पना इतर कृषी विद्यापीठांनी देखील राबविण्यावर विचार करावा. या वेळी डॉ. राजबीर सिंह यांनी परभणी विद्यापीठाची तुरीचा गोदावरी आणि  सोयाबीनचा एमएयुएस ७२५ हे वाण प्रचंड लोकप्रिय झाले आहेत असे प्रतिपादन केले.

आरएलबीसीएयुचे माननीय कुलगुरू डॉ. पंजाब सिंह यांनी देशात विविध परिषदेमध्ये आणि महत्वाच्या व्यासपीठावर शेतकऱ्यांची उपस्थिती वाढली आहे. त्यांचा सन्मान केला जात आहे. या परिषदेत परभणी येथील माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि हे स्वतः शेतकऱ्यांसोबत उपस्थित आहेत, ही खूपच चांगली आणि उल्लेखनीय बाब आहे. शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांच्यात समन्वय असला पाहिजे आणि तो परभणी मध्ये आहे यावरून सिद्ध होत झाले, असे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी या परिषदेच्या शिफारशी अमलात येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

या परिषदेमध्ये महाराष्ट्रातून सर्वाधीक शेतकरी प्रतिनिधीसह, ओरिसा, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथून ५५० हून अधिक व्यक्ती सहभागी झाले होते. यामध्ये शास्त्रज्ञ, विद्यार्थी, उद्योजक, खाजगी व स्वयंसेवी संस्था, उद्योग व विविध शासकीय विभागातील अधिकारी, शेतकरी, सहभागी झाले.

यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील एकात्मिक शेती पद्धती संशोधन केंद्राचे तंत्रज्ञान अवलंबत असलेले सर्वाधिक चार शेतकरी बांधवांना उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार देवून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यासोबतच डॉ. वासुदेव नारखेडे यांना आयएफएसडीए फेलो पुरस्काराने तर श्री. राकेश राऊत यांना उत्कृष्ट प्रबंध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, असे एकूण सहा पुरस्कार विद्यापीठास मिळाले.

एकात्मिक शेती पद्धती संशोधन केंद्राचे कार्यास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणा आणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शन नियमित लाभते. यातूनच अशा मोठ्या यशाची प्राप्ती झाली असे अखिल भारतीय समन्वयीत एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. आनंद गोरे यांनी सांगितले.

या पुरस्कारामध्ये प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेती करत असलेले प्रगतशील शेतकरी श्री. प्रतापराव काळे (धानोरा काळे, ता. पूर्णा), श्री. ज्ञानोबा पारधे (बाभूळगाव, ता. परभणी), श्री. जनार्धन आवरगंड  (माखणी, ता. पूर्णा), आणि श्री. रत्नाकर ढगे (सायळ, ता. लोहा), यांना उकृष्ट शेतकरी पुरस्कार यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात विद्यापीठाचे डॉ. आनंद गोरे, किटक शास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड, श्री शरद चेनलवाड, श्री. अर्जुन जाधव, प्रगतशील शेतकरी श्री बाळासाहेब हिगे आणि श्री. सुरेश शृंगारपुतळे तसेच महिला प्रगतशील शेतकरी श्रीमती सुषमा देव (हदगाव, जि. नांदेड), श्रीमती सरीताताई बाराते (मानवत, जि. परभणी), श्रीमती वंदना जोगदंडे (सिल्लोड, जि. नांदेड) यांचीही उपस्थिती होती.

सर्व पुरस्कार प्राप्त शेतकरी शास्त्रज्ञ, विद्यार्थी यांचे संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार, संचालक विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, नियंत्रक श्री. प्रवीणज निर्मळ, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, सर्व सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी यांनी अभिनंदन केले.



श्री. प्रतापराव काळे (धानोरा काळे, ता. पूर्णा)
श्री. जनार्धन आवरगंड  (माखणी, ता. पूर्णा)
श्री. रत्नाकर ढगे (सायळ, ता. लोहा)
श्री. ज्ञानोबा पारधे (बाभूळगाव, ता. परभणी)