Tuesday, March 18, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातर्फे आंबा पिकावरील विशेष कार्यक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि शेकरु फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रीय व नैसर्गिक शेती प्रशिक्षण व संवाद मालिकेत "अतिघन केशर आंबा पिकाचे व्यवस्थापन" या विषयावर आधारित हा विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १८ मार्च रोजी ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. कार्यक्रमास महाराष्ट्र आंबा बागायतदार संघाचे उपाध्यक्ष तथा फळबाग तज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.

याप्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी डॉ. भगवानराव कापसे यांच्या सखोल ज्ञानाचा लाभ शेतकरी बांधवांना मिळत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मराठवाड्यात आंबा लागवडीच्या वाढीसाठी हे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच, या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात फळबाग तज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना  अतिघन आंबा लागवडीचे फायदे व आधुनिक व्यवस्थापन तंत्रांवर सखोल विवेचन केले. शेतकऱ्यांनी या वेळी अतिघन लागवडीबाबत आपल्या शंका मांडल्या आणि तज्ज्ञांनी त्यावर समाधानकारक उत्तरे दिली.

कार्यक्रमाचे आयोजन संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रीय शेती प्रकल्प केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद गोरे आणि मृदाशास्त्रज्ञ डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. मिनाक्षी पाटील यांनी केले. या वेळी आंबा उत्पादक शेतकऱ्यांसह राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे यूट्यूबद्वारे थेट प्रसारण करण्यात आले, ज्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना या उपयुक्त माहितीचा लाभ घेता आला.