माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि माजी राष्ट्रीय समन्वयक मा. डॉ. अखिलेंद्र श्रीवास्तव यांची बायोमिक्स संशोधन व उत्पादन केंद्रास भेट
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू
प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि भारतीय कृषी
अनुसंधान परिषदेच्या, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कृषी नवोन्मेष प्रकल्पाचे माजी राष्ट्रीय
समन्वयक आणि नामवंत कृषी संशोधक माननीय डॉ. अखिलेंद्र प्रकाश श्रीवास्तव यांनी विद्यापीठाच्या बायोमिक्स संशोधन व उत्पादन
केंद्राला दिनांक १६ मार्च रोजी अभ्यास भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत उप विद्यापीठ
अभियंता डॉ. दयानंद टेकाळे यांची उपस्थिती होती.
भेटीदरम्यान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले
की, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणण्यासाठी व उत्पादन खर्चात मोठी बचत
होण्यासाठी बायोमिक्स ने मोलाची भूमिका बजावली. बायोमिक्स या जैविक घटकाचा वापर
सर्व पिकांमध्ये होत असून शेतकऱ्यांना त्याचा अतिशय फायदा होत आहे, त्याचबरोबर हुमणी
अळी सारख्या अनेक किडींना नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा बायोमिक्स चा प्रभावीपणे
शेतकरी वापर करत असल्याचे प्रतिपादन केले.
याबरोबरच त्यांनी बायोमिक्स संशोधन आणि जैविक उत्पादनांच्या भविष्यातील संधी, शाश्वत शेतीसाठी
जैविक इनपुट्सचे महत्त्व आणि शेतकऱ्यांसाठी त्याचा लाभ याविषयी चर्चा केली.
माननीय डॉ. श्रीवास्तव यांनी संशोधन प्रक्रियेचा
आढावा घेतला आणि जैविक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती उत्पादन वाढविण्यासाठी
होणाऱ्या प्रगत प्रयोगांची माहिती घेतली. त्यांनी संशोधन केंद्राच्या कार्याचे कौतुक
करत जैविक कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी अधिक संशोधन व नवोपक्रम हाती घेण्याचे
महत्त्व अधोरेखित केले. तसेच मराठवाड्यातील विविध शेतकऱ्यांची यशोगाथा ऐकली असता बायोमिक्स
संशोधन केंद्राचे कार्य फार अतुलनीय आहे असे त्यांनी याप्रसंगी नमूद केले.
यावेळी बायोमिक्स संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी
डॉ चंद्रशेखर अंबाडकर यांनी यावर्षी (२०२४ -२५) जवळपास पन्नास हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी
बायोमिक्सचा लाभ घेतलेला आहे तसेच ६०००० पेक्षाही जास्त हेक्टर क्षेत्रावर
बायोमिक्स चा वापर झालेला आहे असे बायोमिक्स विषयी माहिती देताना सांगितले. तसेच मान्यवरांच्या
या भेटीमुळे संशोधन केंद्राच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाली असून, जैविक शेतीच्या
क्षेत्रात अधिक नावीन्यपूर्ण संशोधन करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे, असे प्रतिपादन
केले.
याप्रसंगी बायोमिक्स विभागातील संशोधन सहाय्यक श्री.
सोमीनाथ फाळके व श्री अमोल ताटे उपस्थित होते.