Tuesday, March 18, 2025

नवतेजस्विनी महोत्सव २०२५: महिला आर्थिक सशक्तीकरणाकरिता विशेष उत्सव

 वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इंद्र मणि यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन

महिला व बालविकास विभागाच्या महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), परभणी यांच्यावतीने सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन व जागतिक महिला दिनानिमित्त नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास प्रकल्पांतर्गत "नवतेजस्विनी महोत्सव २०२५ " चे भव्य आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इंद्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महापालिका आयुक्त श्री. धैर्यशील जाधव, जिल्हा कृषि अधीक्षक श्री. दौलत चव्हाण, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. उदय कुलकर्णी, नाबार्डचे सहा महाव्यवस्थापक श्री. सुनिल नवसारे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री. बाळासाहेब झिंजाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी माविमच्या कार्याची प्रशंसा केली. ते म्हणाले, महिलांनी लघुउद्योजक बनून आत्मनिर्भर होणे ही काळाची गरज आहे. 'लखपती दीदी' योजनेच्या माध्यमातून महिलांनी अर्थसहाय्य घेऊन मोठे उद्योजक व्हावे. माविम आणि विद्यापीठ संयुक्तरीत्या महिलांसाठी पॅकेजिंग, लेबलिंग आणि ब्रँडिंगसाठी विशेष उपक्रम राबविणार असून, महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. याद्वारे महिला उद्योजकतेला नवे बळ मिळेल, असे त्यांनी प्रतिपादन केले. या महोत्सवात महिला बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थ व विविध हस्तकला वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्री दालने उभारण्यात आली आहेत. प्रदर्शनातील दालनास माननीय कुलागुरुनी भेट देऊन उत्पादक महिलांना प्रोत्साहन दिले.

नवतेजस्विनी महोत्सव १८ ते २० मार्च २०२५ या कालावधीत सिटी क्लब, परभणी येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ७५ दालने उभारली असून यामध्ये १५० महिला उद्योजकांचा सहभाग असणार आहे. सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत नागरिकांना प्रदर्शन आणि विक्री दालनांना भेट देता येणार आहे. यामुळे तिन्ही दिवस ग्राहकांना या महोत्सवाची पर्वणी लाभणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री. बाळासाहेब झिंजाडे यांनी केले. कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट बँक लिंकेज गटाना एकूण एप्रिल २०२४ ते आज पर्यंत रुपये ५२ कोटीचे बँक कर्ज वाटप करण्यात आले. यातील प्राथमिक स्वरूपात ८ बचत गटाना सन्मानीत करण्यात आले तसेच उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलही लोकसंचलित साधन केंद्राचा सन्मान करण्यात आला.

सूत्रसंचालन श्रीमती जयश्री टेहरे व श्रीमती गंगासागर भराड यांनी केले, तर आभार श्रीमती भावना कुलकर्णी यांनी मानले. या कार्यक्रमाला जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी श्री. कैलास तिडके, कृषि तंत्रज्ञान व माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. गजानन गडदे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री. जावळीकर, एचडीएफसी बँकेचे श्री. सचिन देशमुख, व्यवस्थापक श्री. संघर्ष खाडे आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

महिलांच्या उद्योगवाढीस चालना देणाऱ्या या महोत्सवाला नवतेजस्विनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, ग्राहकांनीही मोठ्या प्रमाणात खरेदी करत महिलांच्या उत्पादने आणि कौशल्याला दाद दिली.