रासायनिक निविष्ठांवरील अवलंबित्व कमी करण्यावर भर… माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि
महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कीटकशास्त्र
विभागातील क्रॉपसॅप प्रकल्प अंतर्गत ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ कृषि संवादाच्या ३८
व्या भागात विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी रासायनिक
निविष्ठांवरील अवलंबित्व कमी करून इतर पर्यायी निविष्ठांचा वापर करण्यावर भर
देण्याची आवश्यकता अधोरेखित केली. हा कार्यक्रम २१ मार्च रोजी पार पडला.
अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि म्हणाले की, केंद्र सरकारने आगामी काळात रासायनिक निविष्ठांवरील अवलंबित्व कमी करून
पर्यायी जैविक निविष्ठांचा वापर वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या दृष्टीने
शेतकरी, संशोधक व कृषि विद्यापीठांनी एकत्र येऊन काम करणे
आवश्यक आहे. यासोबतच महाराष्ट्र शासनही या दिशेने कार्यरत असल्याचे त्यांनी
सांगितले. विद्यापीठाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार
असून, दर्जेदार जैविक निविष्ठांचे उत्पादन आणि वितरण मोठ्या
प्रमाणावर करण्याचा मानस विद्यापीठाने व्यक्त केला आहे. तसेच भेसळीच्या समस्या
रोखण्यासाठी कठोर नियम आणि उपाययोजना करण्याची शिफारस शासनाकडे करण्यात येणार
असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी
केले. या वेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या
यशस्वी आयोजनासाठी मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी पुढाकार
घेतला.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसह अकोल्यातील अनेक शेतकऱ्यांनी या संवादात
उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांनी हिरवळीच्या खताच्या लागवडीबाबत, शेतातील काडीकचरा
कुजविण्याच्या तंत्रज्ञानाविषयी, हवामान अंदाज आणि कीड
व्यवस्थापन यासंदर्भात प्रश्न विचारले. तसेच बायोमिक्सचा उपयोग, हिरवळीच्या खतासाठी पाणी व्यवस्थापन आणि कांदा साठवणीसंबंधीही
मार्गदर्शनाची मागणी केली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देताना कीटकशास्त्र विभाग
प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, रोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. सूर्यकांत पवार, डॉ.
गजानन गडदे, डॉ. अरुण गुट्टे, डॉ. वसंत
सूर्यवंशी, हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे आणि
उद्यानविद्या तज्ञ डॉ. संजुला भंवर यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. या वेळी
विस्तार शिक्षण तज्ञ डॉ. प्रविण कापसे यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी केले, तसेच त्यांनी आभार
प्रदर्शनही केले.