Saturday, March 22, 2025

वनामकृविच्या धाराशिव येथील शासकीय कृषि महाविद्यालयातील मधमाशी पालन प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे धाराशिव येथील शासकीय कृषि महाविद्यालय आणि केंद्रीय मधमाशी प्रशिक्षण व संशोधन संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १७ ते २१ मार्च दरम्यान कृषि महाविद्यालय धाराशिव येथे पाच दिवसीय मधमाशी पालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये महाविद्यालयातील ९८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

दि. १७ मार्च २०१५ रोजी प्रशिक्षणाचे उद्घाटन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. दिगंबर पेरके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. पेरके यांनी विद्यार्थ्यांना केवळ नोकरीच्या संधीवर अवलंबून न राहता उद्योजकतेकडे वळण्याचे आवाहन केले. नवीन शैक्षणिक धोरणात उद्योजकता आणि कौशल्य विकास यावर भर देण्यात आलेला असून मधमाशी पालन हा शेतीपूरक प्रभावी व्यवसाय ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले.

प्रशिक्षणादरम्यान कृषि कीटकशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. अनिता साबळे यांनी मार्गदर्शन करताना मधमाशांच्या वाढत्या गरजेबाबत माहिती दिली. परागीभवनाच्या प्रक्रियेस मदत करणाऱ्या मधमाशांची शेतकऱ्यांमध्ये मोठी मागणी असून, हंगामानुसार मधमाशीच्या पेट्या भाड्याने देणे आणि विक्री करणे यामध्ये उद्योजकांसाठी मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मधमाशी प्रशिक्षण व संशोधन संस्थेचे तज्ज्ञ प्रशिक्षक श्री. हेमंतकुमार डुंबरे यांनी विद्यार्थ्यांना मधमाशी पालनाच्या तांत्रिक बाबींबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी मधमाशांच्या विविध प्रजाती, पेट्यांचे निरीक्षण आणि व्यवस्थापन, व्यवसाय सुरू करण्याचे टप्पे, मध काढण्याच्या पद्धती, शुद्ध आणि अशुद्ध मधातील फरक आदी विषयांवर प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सरावाद्वारे सातेरी मधमाशी, युरोपियन मधमाशी आणि डंखरहित मधमाशी हाताळण्याचा अनुभव घेतला.

प्रशिक्षणादरम्यान हिमाचल प्रदेश आणि मलेशिया येथील मधमाशी उद्योजकांशी ऑनलाईन संवाद साधून त्यांच्या अनुभवांचे आदानप्रदान करण्यात आले. तसेच मधमाशी पालन उद्योगासाठी शासकीय योजना आणि कर्जसुविधांविषयी माहिती देण्यात आली. शेतीसोबत पूरक व्यवसाय म्हणून मधमाशी पालनाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.

श्री. हेमंतकुमार डुंबरे यांनी "जगभरातील मधमाशा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मानवाच्या अस्तित्वासाठी मधमाशी संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात मोठ्या संधींचा लाभ घेतला पाहिजे," असे प्रतिपादन केले.

प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. प्रशिक्षणात मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून मधमाशी संवर्धनासाठी योगदान देण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. सदर प्रशिक्षणाच्या आयोजनामध्ये डॉ. अनिता साबळे आणि डॉ. महेश वाघमारे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.