बैलशक्तीचा प्रभावी वापर व कृषी प्रक्रिया उद्योगाचा विस्तार गरजेचा –माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे प्रतिपादन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित संशोधन
प्रकल्प "पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण" योजनेस माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या, नवी दिल्ली
येथील राष्ट्रीय कृषी नवोन्मेष प्रकल्पाचे माजी राष्ट्रीय समन्वयक व नामवंत कृषी
संशोधक माननीय डॉ. अखिलेंद्र प्रकाश श्रीवास्तव यांनी दिनांक १७ मार्च रोजी भेट
दिली.
यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, माजी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके,
सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, विभाग
प्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे, उप विद्यापीठ अभियंता तथा
संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, उपसंचालक संशोधन डॉ. मदन
पेंडके आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी
बैलशक्तीचा अधिक प्रभावी वापर करून शेतीतील उत्पादन क्षमता वाढवण्याची गरज व्यक्त
केली. योजनेने विकसित केलेली आधुनिक अवजारे वापरून शेतीतील कामे सुलभ करण्यास मदत
होईल, असे सांगून त्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगात बैलशक्तीचा उपयोग वाढवण्यावर
भर दिला. विशेषतः महिलांच्या बचत गटांमार्फत हे उद्योग चालविल्यास ग्रामीण भागात
रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे ते म्हणाले.
नामवंत कृषी संशोधक माननीय डॉ. अखिलेंद्र श्रीवास्तव यांनी पशु शक्तीच्या
सहाय्याने शेती यांत्रिकीकरण, नवीन तंत्रज्ञान आणि भविष्यातील संधींवर सखोल मार्गदर्शन केले.
योजनेने विकसित केलेल्या एक-बैलचलित वखर, टोकन यंत्र,
कोळपे, दोन पासाचे खत कोळपे यांसारख्या
अवजारांचा अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल, असे त्यांनी
नमूद केले. तसेच कुक्कुटपालन, शेळीपालन व गोठ्यातील
यांत्रिकीकरण यावर अधिक संशोधन होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
योजनेने विकसित केलेले स्वयंचलित जनावरे धुण्याचे यंत्र, जनावरांसाठी
मसाज यंत्र व अर्धस्वयंचलित बोलना खाद्य पुरवठा यंत्र पाहून त्यांनी समाधान व्यक्त
केले आणि शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दयानंद टेकाळे यांनी केले. त्यांनी या
भेटीमुळे योजनेच्या संशोधन कार्यास नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करत मान्यवरांचे
आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. दत्ता पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी
आयोजनासाठी वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. अजय वाघमारे, श्री.
दीपक यंदे, श्री. मंगेश खाडे, श्री.
रुपेश काकडे, श्रीमती पवार आदींनी विशेष मेहनत घेतली.
या भेटीदरम्यान योजनेतील शास्त्रज्ञांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या संशोधनाबद्दल माहिती सादर केली. मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे या योजनेला नवा बळकटीकरण मिळेल, असा विश्वास विद्यापीठाच्या संशोधकांनी व्यक्त केला.