Sunday, March 16, 2025

वनामकृविच्या लातूर येथील गळीतधान्य संशोधन केंद्रात सूर्यफूल प्रक्षेत्र दिवस व भुईमूग लागवड प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न

 शास्त्रज्ञ बियाण्यांचे जनक, तर शेतकरी हे त्याचे पालकमाननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित सूर्यफूल संशोधन प्रकल्प आणि भुईमूग संशोधन प्रकल्प, गळीतधान्य संशोधन केंद्र, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने सूर्यफूल प्रक्षेत्र दिवस २०२५ आणि भुईमूग लागवड प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

हा कार्यक्रम दिनांक १५ मार्च (शनिवार) रोजी गळीतधान्य संशोधन केंद्र, नांदेड रोड, लातूर येथे पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी होते. प्रमुख उपस्थिती म्हणून संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, लातूरच्या कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कृषि वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर, मुंबईचे डॉ. जय प्रकाश आणि गळीतधान्य तज्ञ डॉ. मोहन धुपे यांची उपस्थिती लाभली.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले, भारतात कृषि संशोधनाला मोठे महत्त्व असून, देशातील विविध संस्थांनी शेतीविषयक संशोधनावर भर दिला आहे. परभणी विद्यापीठ ‘शेतकरी देवो भव:’ ही भावना ठेऊन संशोधन व विस्तार कार्य करीत आहे. हवामान बदलानुसार नवे वाण विकसित करणे, रोग प्रतिकारक वाण तयार करणे आणि शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा प्रभाव वाढवणे यावर विद्यापीठ लक्ष केंद्रित करत आहे. ते पुढे म्हणाले, शास्त्रज्ञ जर बियाण्यांचे जनक असतील, तर शेतकरी हे त्याचे पालक आहेत. त्यामुळे जनक आणि पालक यांचे नाते अधिक सुदृढ होणे गरजेचे आहे.

तेलबिया पिकांच्या संदर्भात बोलताना कुलगुरूंनी सांगितले की, तीळ, भुईमूग, सूर्यफूल, जवस यांसारख्या पिकांमध्ये ४० टक्केपर्यंत तेल असल्याने या पिकांच्या संशोधनाला चालना देणे आवश्यक आहे. लातूरचे गळीतधान्य संशोधन केंद्र हे देशात वेगळी ओळख निर्माण करीत आहे. येथे विकसित होणारी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर त्वरेने पोहोचणे गरजेचे आहे.

यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनीही गळीत धान्य पिकांचे महत्व सांगून शेतकऱ्यांनी सुर्यफुल, भुईमुग, करडई, जवस, तीळ यासारख्या पिकांची पेरणी करावी असे नमूद केले.

भुईमूग लागवडीच्या तंत्रज्ञानावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन कार्यक्रमाच्या सुरुवातीस गळीतधान्य तज्ञ डॉ. मोहन धुपे यांनी प्रास्ताविक केले आणि भुईमूग लागवडीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर सविस्तर मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमादरम्यान सूर्यफूल व भुईमूग लागवडीतील नवे तंत्रज्ञान, उच्च उत्पन्न देणाऱ्या वाणांची माहिती, कीड व रोग व्यवस्थापन तसेच उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रे यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून कृषि तज्ज्ञांकडून महत्वपूर्ण मार्गदर्शन घेतले.