Sunday, March 9, 2025

आंतरराष्ट्रीय एकात्मिक शेती परिषदेत मराठवाड्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचे अनुभव व यशोगाथा

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिले प्रोत्साहन

मोदीपुरम (उत्तर प्रदेश) येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या भारतीय शेती संशोधन संस्थेच्या वतीने ७ ते ९ मार्च २०२५ दरम्यान पहिली आंतरराष्ट्रीय एकात्मिक शेती पद्धती परिषद आयोजित करण्यात आली. ८ मार्च रोजी या परिषदेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या चार प्रगतशील शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडले. श्री. प्रतापराव काळे (धानोरा काळे, ता. पूर्णा), श्री. ज्ञानोबा पारधे (बाभूळगाव, ता. परभणी), श्री. जनार्धन अवर्गंड (माखणी, ता. पूर्णा) आणि श्री. रत्नाकर ढगे (सायळ, ता. लोहा) या शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे मिळालेल्या यशाचा मागोवा घेतला. विद्यापीठाच्या सातत्यपूर्ण सहकार्यामुळे शेतीतील प्रगती साधता आली, असे त्यांनी नमूद केले. "शेतकरी देवो भव:" या तत्त्वज्ञानाला अनुसरून विद्यापीठ शेतकऱ्यांसाठी नेहमीच उभे आहे, हे या कार्यक्रमाने अधोरेखित झाले. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना प्रोत्साहन दिले.

या वेळी त्यांच्या समवेत अखिल भारतीय समन्वयीत एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. आनंद गोरे, किटक शास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड, श्री शरद चेनलवाड, श्री. अर्जुन जाधव,  मराठवाड्यातील प्रगतशील शेतकरी श्री बाळासाहेब हिगे (पूर्णा, जि. परभणी) आणि श्री. सुरेश शृंगारपुतळे (पूर्णा, जि. परभणी) तसेच महिला प्रगतशील शेतकरी श्रीमती सुषमा देव (हदगाव, जि. नांदेड), श्रीमती सरीताताई बाराते (मानवत, जि. परभणी), श्रीमती वंदना जोगदंडे (सिल्लोड, जि. नांदेड) यांचीही उपस्थिती होती.

यावेळी मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनी पद्मश्री पुरस्कार विजेते शेतकरी माननीय डॉ. भारत भूषण त्यागी यांच्या कृषी तीर्थ, तालुका बेहटा, जिल्हा बुलंदशहर (उत्तर प्रदेश) येथील सेंद्रिय शेती प्रकल्पाला भेट दिली.

या भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, नैसर्गिक कीड व्यवस्थापन, मातीची सुपीकता टिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जैविक पद्धती, तसेच उत्पादन वाढीसाठी वापरल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण उपाययोजना यांची प्रत्यक्ष माहिती घेतली. माननीय डॉ. त्यागी यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधत शाश्वत शेती तंत्रज्ञान, बाजारपेठेतील संधी आणि सेंद्रिय उत्पादनांच्या वाढत्या मागणीबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात सहभागी असलेल्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या मार्गदर्शनामुळे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

श्री. रत्नाकर ढगे (सायळता. लोहा)
पद्मश्री पुरस्कार विजेते शेतकरी माननीय डॉ. भारत भूषण त्यागी


पद्मश्री पुरस्कार विजेते शेतकरी माननीय डॉ. भारत भूषण त्यागी आणि श्रीमती सुषमा देव