Friday, March 28, 2025

अखिल भारतीय समन्वयित सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाद्वारे शेतकरी प्रशिक्षण व तुषार सिंचन संच वाटप कार्यक्रम संपन्न

 सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करून पाण्याचा पुरेपूर वापर करावा.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्प आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या भुवनेश्वर येथील भारतीय जल व्यवस्थापन संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने “शेतकरी प्रशिक्षण व तुषार सिंचन संच वाटप कार्यक्रम दिनांक २८ मार्च रोजी संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. यावेळी विशेष उपस्थितीत संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विद्यापीठ अभियंता इंजि. दीपक कशाळकर, माजी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, पाणी व्यवस्थापन संशोधन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी, उप-विद्यापीठ अभियंता  डॉ. दयानंद टेकाळे आदी मान्यवर आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, शेतकऱ्यांनी कृषि विद्यापीठामध्ये निर्माण होणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून आपला विकास साधावा. मा. कुलगुरू महोदय म्हणाले की मानवी जीवनात प्राणवायू एवढेच पाण्याचे महत्व आहे. "जलबिना जीवन नही" हे अंतिम सत्य आहेत्यामुळे शेती करताना पाण्याची बचत करणे, जल संरक्षण, संवर्धन करणे काळाची गरज आहे. त्याकरिता सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करून पाण्याचा पुरेपूर वापर करावा.  तसेच पाण्याचे स्रोत संवर्धित करून पुढच्या पिढीला मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येकाने प्रतिज्ञा केली पाहिजे, असे प्रतिपादन केले.

या प्रसंगी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग म्हणाले की, विद्यापीठाने विकसित केलेले विविध पिकांचे वाण, लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर पोहचविण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत असतो. शेतकऱ्यांनी तुषार सिंचन, ठिबक सिंचन यांचा वापर करून उत्पन्नात भरघोस वाढ करावी.

यावेळी माजी संचालक शिक्षण डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ राहुल रामटेके यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणी व्यवस्थापन संशोधन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी यांनी केले. यावेळी संशोधन प्रकल्पाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम आणि संशोधन कार्याची माहिती दिली.

या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाची माहिती व प्रशिक्षण देण्यात आले. तसेच, अनुसूचित जाती उपयोजना (SCSP) अंतर्गत लोहरा, जि. परभणी आणि अनुसूचित जमाती उपयोजना (TSP) अंतर्गत कोपरवाडी, तालुका. कळमनुरीजि. हिंगोली येथील ग्रामसभेकडून निवड केलेल्या शेतकऱ्यांना २२ तुषार सिंचन संच वाटप करण्यात आले. विद्यापीठाची कृषी दैनंदिनी, दिनदर्शिका यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पाणी बचत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक लाभ होणार आहे.

संशोधन सहायक श्री ऋषिकेश औंढेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमास परिसरातील अनेक शेतकरी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. सुमंत जाधव, डॉ विशाल इंगळे, युवराज भोगिल, कार्तिक गिराम, अनिकेत वाईकरश्री. धुर्वे, सुरेश शिंदे, रत्नाकर पाटील, देवेंद्र कुरा, बाळू रनेर, प्रकाश मोते, विलास जाधव व नागेश ढावणे यांनी परिश्रम घेतले.