Thursday, March 13, 2025

वनामकृविचे माननीय कुलसचिव श्री. संतोष वेणीकर यांची बदनापूर कृषी महाविद्यालय व संशोधन केंद्राला भेट

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या माननीय कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांनी विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषी महाविद्यालयास दिनांक १२ मार्च रोजी सदिच्छा भेट देऊन महाविद्यालयाच्या कार्याचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी महाविद्यालयातील विविध समस्या जाणून घेतल्या आणि प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्या समवेत विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दीपक पाटील, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. डी. सोमवंशी आदींची उपस्थिती होती.

यावेळी माननीय कुलसचिव यांनी महाविद्यालयातील आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांच्या भाजीपाला लागवड या अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रम (ELP) युनिट ला भेट देऊन त्यांच्या कार्याची स्तुती केली. विद्यार्थ्यांनी केलेल्या भाजीपाला उत्पादनाच्या उपक्रमाची पाहणी करून त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

याबरोबरच त्यांनी विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रास भेट देऊन संशोधन प्रकल्पांचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान वाइल्ड गार्डन व सीएमएस हायब्रिडायझेशन कार्यक्रम यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच संशोधन केंद्राच्या भविष्यातील कार्ययोजना आणि प्रगतशील धोरणांवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ, अधिकारी, संशोधक आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्याचा सादरीकरणाद्वारे आढावा सादर केला. माननीय कुलसचिव यांनी संशोधन कार्याच्या गुणवत्ता व उपयुक्ततेबाबत समाधान व्यक्त करून भविष्यातील संशोधन उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. या माननीय कुलसचिव यांच्या भेटीमुळे महाविद्यालयास ऊर्जा मिळाली तसेच संशोधन केंद्राच्या प्रगतीला नवीन दिशा मिळणार असून, आगामी संशोधन कार्यासाठी ही चर्चा उपयुक्त ठरणार आहे, असे महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दीपक पाटील यांनी नमूद करून मान्यवरांचे आभार मानले.

यावेळी महाविद्यालय आणि संशोधन केंद्राचे सर्व प्राध्यापक, शास्त्रज्ञ, अधिकारी, आणि कर्मचारी उपस्थित होते.