Thursday, March 27, 2025

वनामकृविद्वारा मानवत येथे ॲग्री-फोटोव्होल्टेईक संशोधनाला चालना – जर्मन अधिकाऱ्यांची प्रकल्पाला भेट

बदलत्या हवामानामुळे शेतीवर होणारे परिणाम संशोधनात अग्रस्थानी असणे आवश्यक माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, जर्मन एजन्सी जीआयझेड आणि सन सीड प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी जिल्ह्यातील मानवत येथे ॲग्री-फोटोव्होल्टेईक संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी २६ मार्च रोजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रमुख उपस्थितीत जीआयझेड जर्मनीचे अधिकारी श्री. व्हॅलेंटीन कोषक, श्री. मेथ्यीएस रॅमथन, श्री. एड्रियन अर्नेस्ट आणि मिस फ्रेंनझिस्का यांनी भेट दिली. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांचीही उपस्थिती होती.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी यावेळी बोलताना अन्नधान्य, ऊर्जा, पाणी व बदलत्या हवामानामुळे शेतीवर होणारे परिणाम यांसारख्या बाबी कृषी संशोधनात अग्रस्थानी असणे आवश्यक असल्याचे सांगितले.  

संशोधनाच्या प्रगतीबाबत जर्मन अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत कृषी व ऊर्जा क्षेत्राच्या विकासात ॲग्री-फोटोव्होल्टेईक तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मत व्यक्त केले. याबरोबरच या प्रकल्पात संशोधन करणारे पदव्युत्तर व आचार्य पदवीचे विद्यार्थी हे भविष्यातील ॲग्रीपीव्ही क्षेत्रातील ब्रँड अँम्बेसेडर असतील, असे गौरवोद्गार जर्मन अधिकाऱ्यांनी काढून प्रकल्पातील सर्व शास्त्रज्ञ व विद्यार्थी यांना प्रोत्साहन दिले.

भविष्यात या प्रकल्पातून होणारे संशोधन हे भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील योजनांसाठी उपयोगी ठरेल, अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.

या भेटीदरम्यान संशोधन प्रकल्पामार्फत केळी, तुर, जवस, हरभरा, घेवडा, साळ, झुकेनी, कांदा, कोबी, नेपियर आणि उन्हाळी मूग यांसारख्या विविध पिकांवर नव्याने प्रयोग करण्यात आले असल्याची माहिती प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. गोदावरी पवार यांनी दिली. यावेळी प्रकल्पातील शास्त्रज्ञ डॉ. सुनिता पवार, डॉ. बी. एम. कलालबंडी, जीआयझेड दिल्लीचे इंजिनिअर अभिषेक शास्त्री तसेच विद्यापीठातील विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.