वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या बदनापूर येथील कृषि महाविद्यालयात विविध
विकासकामांचे उद्घाटन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या
हस्ते व विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक
२४ मार्च रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमात मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन
करून नवीन प्रकल्पांच्या कार्यक्षम वापराबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रमुख
आकर्षणांमध्ये कृषि महाविद्यालय व वस्तीगृह इमारतींवरील सौरऊर्जा प्रकल्पांचा
समावेश होता. कृषि महाविद्यालयाच्या इमारतीवरील ३० किलोवॅट क्षमतेच्या तसेच
मुलांच्या वस्तीगृहावर ३० किलोवॅट आणि मुलींच्या वस्तीगृहावर २५ किलोवॅट
क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन कुलगुरूंच्या हस्ते पार पडले. यावेळी
कुलगुरूंनी शून्य उत्सर्जन संकल्पनेकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. त्यांनी या
सौरऊर्जा प्रकल्पांच्या कार्यक्षम वापरावर भर देत, शेतातील विहिरी व कूपनलिका
वरील मोटारींच्या विजेची गरज सौरऊर्जेद्वारे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचेही
सुचविले.
या सौरऊर्जा
प्रकल्पांमुळे कृषि महाविद्यालयाच्या वीज बिलात मोठ्या प्रमाणात बचत होणार असून, नव्या
पिढीसमोर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा आदर्श निर्माण केला जात आहे.
कार्यक्रमात अंतिम
वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सुरू केलेल्या रेशीम शेती
व कुक्कुटपालन प्रकल्पांचेही उद्घाटन करण्यात आले. रेशीम शेती प्रकल्पाचे प्रभारी
सहायक प्राध्यापक डॉ. अस्मिता सुरडकर व कुक्कुटपालन प्रकल्प प्रभारी सहायक प्राध्यापक
डॉ. महेश तनपुरे यांनी आपल्या प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. मान्यवरांनी या
उपक्रमांचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी अशा लघु प्रकल्पांद्वारे आपले कौशल्य
वृद्धिंगत करून भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी स्वतःला तयार करावे, असा
संदेश दिला.
कृषि महाविद्यालयाचे
सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. दीपक पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत करून विविध
प्रकल्पांची माहिती दिली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी,
कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भव्य
उपक्रमांमुळे महाविद्यालयाचा विकास अधिक गतिमान होईल, असा
विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.