वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ,
परभणी अंतर्गत अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाच्या पशु
संवर्धनातील यांत्रिकीकरण विभाग आणि आर.आर.ए. नेटवर्क, हैदराबाद
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "कृषि यांत्रिकीकरण व मूल्यवर्धन" या
दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप २१ मार्च रोजी उत्साहात पार पडला. या
प्रशिक्षणाचा झारखंड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र
आणि तेलंगणा या चार राज्यांतील १५ शेतकऱ्यांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या समारोप
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल
रामटेके होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर उपस्थित
होते. यावेळी आर.आर.ए. नेटवर्क, हैदराबादचे तांत्रिक सल्लागार डॉ. महाराणी
दिन, हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. कैलास
डाखोरे, वनस्पती कृषि शास्त्र विभागाच्या प्राध्यापिका
गोदावरी पवार आणि संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे यांचीही उपस्थिती लाभली.
अध्यक्षीय भाषणात डॉ.
रामटेके यांनी योजनेने विकसित केलेली बैलचलित सुधारित अवजारे व यंत्रे यांचा
प्रत्यक्ष उपयोग शेतकऱ्यांनी करून शेतीतील खर्च कमी करण्याचे आवाहन केले. त्यात बैलचलित
कापूस टोकण यंत्र,
हळद व अद्रक काढणी अवजार, सौर ऊर्जाचलित
फवारणी यंत्र, हळद लागवड यंत्र, बहुविध
अवजार, खत कोळपे, कृषि प्रक्रिया
उद्योगांसाठी यंत्रे, तसेच जनावरांसाठी स्वयंचलित धुण्याचे
यंत्र यांचा समावेश आहे.
प्रमुख पाहुणे दीपक
कशाळकर यांनी या अवजारांच्या सुरक्षिततेसाठी विशेष शेड तयार करण्याची घोषणा केली
तसेच शासनाकडे अवजारे संग्रहालयासाठी दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला जाईल, असे
त्यांनी सांगितले. डॉ. महाराणी दिन यांनी योजनेने विकसित केलेल्या अवजारांची
उपयुक्तता पाहून मे महिन्यात ३० शेतकऱ्यांसाठी नवीन प्रशिक्षण आयोजित करण्याची
विनंती केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक
संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन
योजनेचे पशु शास्त्रज्ञ डॉ. संदेश देशमुख यांनी केले. या प्रशिक्षणाच्या
यशस्वीतेसाठी वरिष्ठ संशोधन सहाय्यक अजय वाघमारे, दीपक यंदे,
प्रदीप मोकाशे, रुपेश काकडे, मंगेश खाडे, श्रीमती पवार तसेच कृषि अभियांत्रिकी
महाविद्यालयातील एम.टेक. व पीएचडीच्या विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमास विद्यापीठातील इतर संशोधन योजनांचे प्रतिनिधी, प्राध्यापक
व शास्त्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.