महिलांचा सन्मान कृतीतून सिद्ध व्हावा... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
कोणालाही छोटे करून स्वतः मोठे होता येत नाही, तर आपले कार्य मोठे ठेवावे लागते, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त विद्यापीठाच्या वतीने दिनांक ६ मार्च रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
या कार्यक्रमास माजी लेडी
गव्हर्नर व अमरावती येथील तक्षशीला महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.
कमलताई गवई आणि आयएएस मिशनचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे प्रमुख मार्गदर्शक
म्हणून उपस्थित होते. तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन
संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे,
कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांची विशेष उपस्थिती होती.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी
सांगितले की,
पूर्वी कृषि विद्यापीठात मुलींचे प्रमाण कमी होते, मात्र आता ५० टक्क्यांहून अधिक मुली कृषि शिक्षण घेत असून त्या
गुणवत्तेमध्ये मुलांपेक्षा सरस ठरत आहेत. सध्या महिला परिवर्तनापेक्षाही काळाचे
परिवर्तन होताना दिसून येत आहे. मानवी जीवनामध्ये महिलांचे अनन्यसाधारण महत्त्व
आहे. ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान होतो, तेथे सुख, शांती आणि समृद्धी नांदते. म्हणून
महिलांचा सन्मान प्रत्येकाने करावा आणि हे आपल्या कृतीतून सिद्ध व्हावे. याबरोबरच महिला
सक्षमीकरणाला गती देण्यासाठी 'Accelerate Action' या जागतिक
महिला दिनाच्या संकल्पनेनुसार कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यापीठाने
महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
माननीय कुलगुरू पुढे म्हणाले
की, डॉ. कमलताई यांनी समाज जडणघडणीमध्ये उल्लेखनीय
कार्य केले. याबरोबरच त्यांचे साधे राहणी आणि उच्च विचार मनाला प्रभावित करणारे असून
त्यांच्या सानिध्यात विद्यापीठ जागतिक महिला दिन साजरा करत आहे, याबद्दल आनंद
व्यक्त केला. तसेच डॉ. नरेशचंद्र काठोळे हे दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश टाकतात.
त्यांचे मिशन आयएएस, अनेक पुस्तकांचे लेखन, ३५० हून अधिक आयएएस अधिकारी निर्माण
करण्याबद्दल योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
माजी लेडी गव्हर्नर आणि प्राचार्य
डॉ. कमलताई गवई यांनी विपश्यना जीवन जगण्याची कला असल्यामुळे विपश्यना आणि वृक्षारोपण
करत लोककल्याणासाठी चांगले कार्य करण्यावर भर दिला. याबरोबरच जीवनात तडजोड करून यशस्वी
आहे, असे नमूद केले. त्या पुढे म्हणाल्या की, शेती करणे हे कठीण आहे, परंतु या कृषि
विद्यापीठात मुली बहुसंखेने शिक्षण घेत आहेत याचे कौतुक वाटते. शेतकऱ्यांचे न्याय
आणि हक्क मिळवून देण्यासाठी केलेले कार्य विशद करून महिलांनी विशेषतः मुलींनी आर्थिक,
शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आत्मनिर्भर व्हावे असा सल्ला दिला. कोणत्याही देशाची
प्रगती महिलांच्या प्रगतीवर ओळखली जाते असे सांगून भारत देशात भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समानतेच्या अधिकारामुळे महिलांना स्वतंत्र आंदोलन
उभारावे लागले नाही,
असे त्यांनी नमूद केले. महिलांच्या सक्षमीकरणांमध्ये वडील, पती, मुलगा म्हणून पुरुषच प्रोत्साहन देतात.
यामुळे अजूनही आपल्या संस्कृतीमध्ये पुरुष श्रेष्ठ असून महिलांनीही पुरुषांचा
आदर करावा, असे त्या म्हणाल्या. त्यांनी घर, शेती, स्वतःचे शिक्षण,
समाजसेवा सांभाळत तारे वरची कसरत करत माननीय सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायाधीश
श्री. भूषण गवई यांची आई म्हणून यशस्वी पालन केले. त्यांचे जीवन घडत असतानाचा
चढ-उतार नमूद करून आयुष्यात त्यांचे पती बिहार व केरळ राज्याचे माजी राज्यपाल दिवंगत
रा. सू. गवई यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले असे सांगितले.
आयएएस मिशनचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी शेतकऱ्यांची
स्थिती गंभीर असून समाजामध्ये शेतकरी सहज ओळखू येतो. यामध्ये चांगला बदल होणे आवश्यक
असून यासाठी कृषि विद्यापीठ कार्य करते याचा अभिमान वाटतो असे नमूद केले. ते पुढे म्हणाले
की, युवकांमध्ये मध्ये क्षमता असून सध्याच्या स्थितीत त्यांना जागे करण्याची गरज
आहे. त्यांनी आयएएस मिशनच्या माध्यमातून आतापर्यंत साडेतीनशेहून अधिक आयएएस
अधिकारी घडविले आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीपासूनच आयएएसचा अभ्यास
करण्यास प्रवृत्त केले असून रोजचे काम रोजच करा आणि प्रत्येक कार्य स्वतःच्या
वेगळ्या पद्धतीने करा असा प्रेरणादायी संदेश देवून प्रोत्साहित केले.
शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार यांनीही महिला विषयी आदर व्यक्त
करून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांनी महिलांकडून पुरुषांनी
शिकण्याची गरज आहे असे नमूद करून त्यांच्या आई, अर्धांगिनी व
सर्व महिलांविषयी मनःपूर्वक आदर व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गोदावरी पवार यांनी केले. सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे आणि डॉ. गजेंद्र लोंढे यांनी आयोजनासाठी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन श्रीमती सारिका नारळे यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय व आभार प्रदर्शन डॉ. फरिया खान यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.