Tuesday, March 11, 2025

वनामकृविच्या चाकूर येथील पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्थेत कलश सिड्स प्रा. लि. च्या सहकार्याने प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि  यांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या चाकूर येथील शासकीय पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन या संस्थेतील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले होते. कलश सिड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने दिनांक ७ मार्च  (शुक्रवार) रोजी हा उपक्रम पार पडला. या प्लेसमेंट ड्राइव्ह अंतर्गत इंटरनॅशनल बिझनेस- मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या.

या प्लेसमेंट ड्राइव्हसाठी एकूण १७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यापैकी  लोचन केने या विद्यार्थ्याची इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून तर कु. कोमल विश्वब्रम्ह आणि कु. आर्शिया शेख यांची प्लांट ऑपरेशन मॅनेजमेंट मधे निवड करण्यात आली. त्यांना वार्षिक रु ३.५० लाख अधिक इतर भत्ते असे पॅकेज देण्यात येणार आहे. तसेच श्रीकांत मुळे, शिवम पवार आणि कौशिक जोशी या तीन विद्यार्थ्यांना देखील पुढील निवड प्रक्रिया साठी पाठवण्यात आले आहे.

या सर्व विद्यार्थ्यांचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि , शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवर, यांनी अभिनंदन करून यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. 

या मुलाखतींचे परीक्षण कलश सिड्स प्रा. लि. चे एचआर हेड श्री. मोहनिश शंकरपल्ली आणि जी. एम. श्री. राहुल गुर्जर यांनी केले होते. विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्य आणि ज्ञानाच्या आधारे संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश या प्लेसमेंट ड्राइव्हच्या माध्यमातून साध्य करण्यात आला.

या उपक्रमाचे आयोजन पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्थेचे  सहयोगी अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच सहायक प्राध्यापक तथा प्लेसमेंट प्रमुख डॉ. ज्योती एल. झिरमिरे, आणि, सहायक प्राध्यापक श्री. अभिषेक राठोड  यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

विद्यार्थ्यांना करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारचे प्लेसमेंट ड्राइव्ह उपयुक्त ठरत आहेत. संस्थेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.






Sunday, March 9, 2025

मोदीपुरम (मीरत, उत्तर प्रदेश) येथे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना उकृष्ट शेतकरी पुरस्कार प्रदान

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले अभिनंदन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मार्गदर्शनातील मराठवाड्याच्या प्रगतशील शेतकऱ्यांना मोदीपुरम (मीरत, उत्तर प्रदेश) येथील शेती पद्धती संशोधन आणि विकास मंडळाचे (FSRDA) राष्ट्रीय पातळीवरील उकृष्ट शेतकरी पुरस्कार प्राप्त. सदरील पुरस्कार भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या मोदीपुरम येथील भारतीय शेती संशोधन संस्थेमध्ये आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय  एकात्मिक शेती पद्धती परिषदेच्या समारोप समारंभात दिनांक ९ मार्च रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.

समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून झाशी येथील आरएलबीसीएयुचे माननीय कुलगुरू तथा भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक डॉ. पंजाब सिंह हे होते. सन्माननीय अतिथी म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, मीरत येथील एसव्हीपीएयुटीचे कुलगुरू माननीय डॉ. के. के. सिंह, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (कृषी विस्तार) माननीय डॉ. राजबीर सिंह, झाशी येथील आरएलबीसीएयुचे माजी कुलगुरू माननीय डॉ. अरविंद कुमार, भागलपुर बिहारच्या बीएयुचे माजी कुलगुरू माननीय डॉ. ए. के. सिंह, मोदीपुरम येथील भारतीय शेती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. सुनील कुमार आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात कुलगुरू माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी पुरस्कार प्राप्त सर्व शेतकऱ्यांचे आणि अभिनंदन केले. यावेळी मार्गदर्शनात ते म्हणाले की, शेतकऱ्यांना उत्पादनापेक्षा आर्थिक नफा अधिक मिळण्यासाठी हवामान अनुकूल वाणांचा विकास होणे आवश्यक आहे. याबरोबरच कमी पाण्यात  येणारे, कीड व रोगांना बळी न-पडणारे, कमीत कमी निविष्ठांचा वापर करून अधिक उत्पादन देणारे वाण विकसित करून लागवडीवरील खर्चात बचत करावी लागेल. तसेच शाश्वत शेतीसाठी शेततळे विकास, सोलार उर्जा आणि सूक्ष्म सिंचनाचा वापर या त्रीसूत्री तंत्रज्ञानावर भर देणे आवश्यक आहे. विद्यापीठाने याच धर्तीवर संशोधन विकसित केले असून तुरीच्या गोदावरी या वाणापासून कोरडवाहू क्षेत्रात एकरी १० ते १२ क्विंटल आणि ठिबक सिंचन वर लागवड केल्यास जवळपास १८ क्विंटल पर्यंत उतार मिळू शकतो. शिवाय एखाद्या शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रावर लागवड केली तर त्यास कोरडवाहू मध्ये १२ ते १४ क्विंटल उतार मिळतो. शेतकऱ्यांनी गोदावरी वाणापासून एकरी १४ क्विंटल पर्यंत उतार घेतल्याचे आणि साधारणपणे एकरी एक लाखापर्यंत उत्पन्न मिळत असल्याच्या प्रतिक्रिया विद्यापीठास प्राप्त होत आहेत. शेतकरी तुरीचा गोदावरी वाण हा ऊसाला पर्याय म्हणून शेतकरी अवलंबत आहेत, असे सांगितले. ते पुढे म्हणाले की, कृषी विकासात शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा असून तो वाढविण्यासाठी विद्यापीठ ‘शेतकरी देव भव:’ या भावनेतून कार्य करत आहे. यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत या उपक्रमांतर्गत विद्यापीठाचे सर्व शास्त्रज्ञ शेतकऱ्यांसोबत राहून संवाद साधतात. याबरोबरच दर मंगळवारी आणि शुक्रवारी ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषि संवाद करतात, असे प्रतिपादन केले.

माजी कुलगुरू माननीय डॉ. अरविंद कुमार, यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेत कुलगुरू ते किसान असा सहभाग असल्याने ही परिषद अतिशय उत्कृष्ट पद्धतीने यशस्वी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. विशेषतः वसंतराव मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि हे स्वतः नऊ शेतकरी, चार शास्त्रज्ञ आणि दोन विद्यार्थी असे एकूण सोळा जणांचा चमूसह सहभागी झाले, ही महत्वपूर्ण बाब आहे असे नमूद केले.  त्यांनी शेतकऱ्यांनी कडधान्य, तेलबिया, भरड धान्याच्या शेतीकडे वळावे. तसेच पाण्याचा कार्यक्षम वापर आणि यंत्रीकीकणावर भर द्यावा असे सांगितले. याबरोबरच या परिषदेचे इतिवृत इंग्रजीसोबतच हिंदीत सुद्धा तयार करून देशातील सर्व कृषी विज्ञान  केंद्रांना उपलब्ध करून द्यावे असे आवाहन केले.

उपमहासंचालक (कृषी विस्तार) माननीय डॉ. राजबीर सिंह यांनी सांगितले की, परिषदेमध्ये देश विदेशातून प्रतिनिधी सहभागी झाले, विशेषकरून परभणी येथून  कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात शास्त्रज्ञासह प्रगतशील शेतकऱ्यांचा चमू सहभागी झाले, ही बाब मनाला भावली असून या परिषदेचे मुख्य आकर्षण राहिले आहे. या परिषदे मुळे शेतकऱ्यांना नव नवीन तंत्रज्ञान शिकायला, चर्चा करायला, तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करायला मिळाले ही फलश्रुती आहे. या परिषदेत डॉ इन्द्र मणि यांनी टूर एफिसिएन्सी ही नवीन संकल्पना रुजविली आहे. त्यांची ही संकल्पना इतर कृषी विद्यापीठांनी देखील राबविण्यावर विचार करावा. या वेळी डॉ. राजबीर सिंह यांनी परभणी विद्यापीठाची तुरीचा गोदावरी आणि  सोयाबीनचा एमएयुएस ७२५ हे वाण प्रचंड लोकप्रिय झाले आहेत असे प्रतिपादन केले.

आरएलबीसीएयुचे माननीय कुलगुरू डॉ. पंजाब सिंह यांनी देशात विविध परिषदेमध्ये आणि महत्वाच्या व्यासपीठावर शेतकऱ्यांची उपस्थिती वाढली आहे. त्यांचा सन्मान केला जात आहे. या परिषदेत परभणी येथील माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि हे स्वतः शेतकऱ्यांसोबत उपस्थित आहेत, ही खूपच चांगली आणि उल्लेखनीय बाब आहे. शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांच्यात समन्वय असला पाहिजे आणि तो परभणी मध्ये आहे यावरून सिद्ध होत झाले, असे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी या परिषदेच्या शिफारशी अमलात येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

या परिषदेमध्ये महाराष्ट्रातून सर्वाधीक शेतकरी प्रतिनिधीसह, ओरिसा, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथून ५५० हून अधिक व्यक्ती सहभागी झाले होते. यामध्ये शास्त्रज्ञ, विद्यार्थी, उद्योजक, खाजगी व स्वयंसेवी संस्था, उद्योग व विविध शासकीय विभागातील अधिकारी, शेतकरी, सहभागी झाले.

यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील एकात्मिक शेती पद्धती संशोधन केंद्राचे तंत्रज्ञान अवलंबत असलेले सर्वाधिक चार शेतकरी बांधवांना उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार देवून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यासोबतच डॉ. वासुदेव नारखेडे यांना आयएफएसडीए फेलो पुरस्काराने तर श्री. राकेश राऊत यांना उत्कृष्ट प्रबंध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, असे एकूण सहा पुरस्कार विद्यापीठास मिळाले.

एकात्मिक शेती पद्धती संशोधन केंद्राचे कार्यास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणा आणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शन नियमित लाभते. यातूनच अशा मोठ्या यशाची प्राप्ती झाली असे अखिल भारतीय समन्वयीत एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. आनंद गोरे यांनी सांगितले.

या पुरस्कारामध्ये प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेती करत असलेले प्रगतशील शेतकरी श्री. प्रतापराव काळे (धानोरा काळे, ता. पूर्णा), श्री. ज्ञानोबा पारधे (बाभूळगाव, ता. परभणी), श्री. जनार्धन आवरगंड  (माखणी, ता. पूर्णा), आणि श्री. रत्नाकर ढगे (सायळ, ता. लोहा), यांना उकृष्ट शेतकरी पुरस्कार यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात विद्यापीठाचे डॉ. आनंद गोरे, किटक शास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड, श्री शरद चेनलवाड, श्री. अर्जुन जाधव, प्रगतशील शेतकरी श्री बाळासाहेब हिगे आणि श्री. सुरेश शृंगारपुतळे तसेच महिला प्रगतशील शेतकरी श्रीमती सुषमा देव (हदगाव, जि. नांदेड), श्रीमती सरीताताई बाराते (मानवत, जि. परभणी), श्रीमती वंदना जोगदंडे (सिल्लोड, जि. नांदेड) यांचीही उपस्थिती होती.

सर्व पुरस्कार प्राप्त शेतकरी शास्त्रज्ञ, विद्यार्थी यांचे संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार, संचालक विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, नियंत्रक श्री. प्रवीणज निर्मळ, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, सर्व सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी यांनी अभिनंदन केले.



श्री. प्रतापराव काळे (धानोरा काळे, ता. पूर्णा)
श्री. जनार्धन आवरगंड  (माखणी, ता. पूर्णा)
श्री. रत्नाकर ढगे (सायळ, ता. लोहा)
श्री. ज्ञानोबा पारधे (बाभूळगाव, ता. परभणी)

आंतरराष्ट्रीय एकात्मिक शेती परिषदेत मराठवाड्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचे अनुभव व यशोगाथा

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिले प्रोत्साहन

मोदीपुरम (उत्तर प्रदेश) येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या भारतीय शेती संशोधन संस्थेच्या वतीने ७ ते ९ मार्च २०२५ दरम्यान पहिली आंतरराष्ट्रीय एकात्मिक शेती पद्धती परिषद आयोजित करण्यात आली. ८ मार्च रोजी या परिषदेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या चार प्रगतशील शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडले. श्री. प्रतापराव काळे (धानोरा काळे, ता. पूर्णा), श्री. ज्ञानोबा पारधे (बाभूळगाव, ता. परभणी), श्री. जनार्धन अवर्गंड (माखणी, ता. पूर्णा) आणि श्री. रत्नाकर ढगे (सायळ, ता. लोहा) या शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे मिळालेल्या यशाचा मागोवा घेतला. विद्यापीठाच्या सातत्यपूर्ण सहकार्यामुळे शेतीतील प्रगती साधता आली, असे त्यांनी नमूद केले. "शेतकरी देवो भव:" या तत्त्वज्ञानाला अनुसरून विद्यापीठ शेतकऱ्यांसाठी नेहमीच उभे आहे, हे या कार्यक्रमाने अधोरेखित झाले. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना प्रोत्साहन दिले.

या वेळी त्यांच्या समवेत अखिल भारतीय समन्वयीत एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. आनंद गोरे, किटक शास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड, श्री शरद चेनलवाड, श्री. अर्जुन जाधव,  मराठवाड्यातील प्रगतशील शेतकरी श्री बाळासाहेब हिगे (पूर्णा, जि. परभणी) आणि श्री. सुरेश शृंगारपुतळे (पूर्णा, जि. परभणी) तसेच महिला प्रगतशील शेतकरी श्रीमती सुषमा देव (हदगाव, जि. नांदेड), श्रीमती सरीताताई बाराते (मानवत, जि. परभणी), श्रीमती वंदना जोगदंडे (सिल्लोड, जि. नांदेड) यांचीही उपस्थिती होती.

यावेळी मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनी पद्मश्री पुरस्कार विजेते शेतकरी माननीय डॉ. भारत भूषण त्यागी यांच्या कृषी तीर्थ, तालुका बेहटा, जिल्हा बुलंदशहर (उत्तर प्रदेश) येथील सेंद्रिय शेती प्रकल्पाला भेट दिली.

या भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, नैसर्गिक कीड व्यवस्थापन, मातीची सुपीकता टिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जैविक पद्धती, तसेच उत्पादन वाढीसाठी वापरल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण उपाययोजना यांची प्रत्यक्ष माहिती घेतली. माननीय डॉ. त्यागी यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधत शाश्वत शेती तंत्रज्ञान, बाजारपेठेतील संधी आणि सेंद्रिय उत्पादनांच्या वाढत्या मागणीबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात सहभागी असलेल्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या मार्गदर्शनामुळे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

श्री. रत्नाकर ढगे (सायळता. लोहा)
पद्मश्री पुरस्कार विजेते शेतकरी माननीय डॉ. भारत भूषण त्यागी


पद्मश्री पुरस्कार विजेते शेतकरी माननीय डॉ. भारत भूषण त्यागी आणि श्रीमती सुषमा देव

वसंतराव नाईक मराठावाडा कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. डब्ल्यू. एन. नारखेडे हे एफएसआरडीए फेलो फेलो म्हणून सन्मानित



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अखिल भारतीय कोरडवाहू कृषी संशोधन प्रकल्प, परभणी येथील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. डब्ल्यू. एन. नारखेडे यांना मोदीपुरम (मीरत, उत्तर प्रदेश) येथील शेती पद्धती संशोधन आणि विकास मंडळाचा (FSRDA) एफएसआरडीए फेलो अवॉर्ड दिनांक ७ ते ९ मार्च दरम्यान आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय  एकात्मिक शेती पद्धती परिषदेत प्रदान करण्यात आला.

या बहुमानाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. डब्ल्यू. एन. नारखेडे यांचे कौतुक करून अभिनंदन केले. या सन्मान सोहळ्याला नवी दिल्ली येथील माजी उपमहासंचालक (शिक्षण) डॉ. अरविंद कुमार, हैदराबाद येथील भारतीय गळीतधान्य संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. डी. एम. हेगडे, भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाचे सल्लागार डॉ. एस. भास्कर, क्रीडा (CRIDA) हैदराबादचे  संचालक  डॉ. व्ही. के. सिंग आणि  मोदीपुरम येथील भारतीय शेती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. सुनील कुमार, कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम. एल. जाट या मान्यवरांची उपस्थिती लाभली.

हा गौरव डॉ. डब्ल्यू. एन. नारखेडे यांना कृषी संशोधन आणि विकास क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रदान  करण्यात आला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञास मिळालेल्या या राष्ट्रीय बहुमानामुळे विद्यापीठातील शास्त्रज्ञामध्ये चैतन्य जागृत झाले. या त्यांच्या यशाबद्दल संशोधन संचालक डॉ खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ राकेश अहिरे, विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, अधिकारी आणि कर्मचारी यांनी अभिनंदन केले.


वनामकृवित जागतिक महिला दिन उत्साहात साजरा – महिलांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक स्वावलंबनावर भर

 'महिलांचा सन्मान  हेच आपले ध्येय' असणे आवश्यक... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने दिनांक ८ मार्च रोजी ऑनलाईन जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. मार्गदर्शनात त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक स्वावलंबन आवश्यक असून, त्यादृष्टीने विद्यापीठ विविध उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, विद्यापीठात दरवर्षी ३ जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष महिला दिन साजरा केला जातो. यावेळी महिलांना उत्पादन विक्रीसाठी संधी मिळते. विद्यापीठाने अनेक महिलांना उद्योजिका बनवण्यात मोलाचे योगदान दिले असून, त्यांचे यश वृत्तपत्रांतून झळकत असते. याबरोबरच माननीय कुलगुरूंनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व विशद केले. यावर्षीच्या 'Accelerate Action' या जागतिक महिला दिनाच्या संकल्पनेनुसार महिलांच्या प्रगतीसाठी तत्परता आवश्यक आहे. महिलांच्या सहभागातून समाजात सकारात्मक बदल होत आहे. शिक्षणात मुली अग्रेसर आहेत आणि देशाच्या विकासातही त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे ‘महिलांचा सन्मान, हेच आपले ध्येय’ असावे, असेही त्यांनी सांगितले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यापीठ महिलांच्या सुरक्षेची काळजी घेत असून विद्यार्थिनींच्या स्वास्थ्यासाठी आगामी काळात विशेष उपक्रम राबवत आहे, असे नमूद केले.

प्रास्ताविकात सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल माहिती दिली.

माजी प्राध्यापिका डॉ. आशा आर्या यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासात आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. आजची जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे युवक-युवतींमध्ये शारीरिक क्षमता कमी होत आहे. त्यामुळे सकस आहार, वेळेचे नियोजन आणि नियमित व्यायाम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

परभणी जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती कविता नावंदे यांनी महिलांसाठी आत्मसंरक्षण महत्त्वाचे असल्याचे सांगितले. आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण घेतल्यास मुली आणि महिलांना निश्चितच लाभ होतो. यासाठी वेळेचे भान ठेवून प्रतिकार करण्यासाठी आत्मविश्वास असणे गरजेचे आहे, असे सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, महिला प्रति समाजात आदर निर्माण व्हावा. याबरोबरच छेडछाड करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण होणेही आवश्यक आहे. यातून काही प्रमाणात गैरप्रकार थांबू शकतो, असे प्रतिपादन केले.

यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे, डॉ. दिगंबर पेरके, डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम,  कार्यक्रम समन्वयक डॉ. दीप्ती पाटगावकर, माननीय कुलगुरू यांचे तांत्रिक अधिकारी डॉ. प्रवीण कापसे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीं गायत्री वाणी, क्षितिजा मस्के आणि किंजल मोरे यांनी विद्यापीठाने पूर्वी राबविलेल्या उपक्रमांमधून धैर्य आणि आत्मविश्वास वाढला असल्याचे आपल्या मनोगतात व्यक्त केले.

सूत्रसंचालन डॉ. प्रीतम भुतडा यांनी केले तर आभार जनसंपर्क अधिकारी डॉ. शंकर पुरी यांनी मानले. विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, महिला अधिकारी आणि विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Saturday, March 8, 2025

शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत, मधमाशी पालनाच्या यशस्वी अनुभवांची मांडणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने कीटकशास्त्र विभागातील क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ कृषि संवादाचा ३६ वा भाग दिनांक ७ मार्च रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते.

या वेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधिकाधिक भर देण्याचे महत्त्व विशद केले. विद्यापीठाचे संशोधन व विस्तारकार्य शेतकरी केंद्रित असून ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेतून विद्यापीठ कार्यरत आहे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी शेतीतील समस्या मोकळेपणाने मांडाव्यात, शास्त्रज्ञांनी त्या समजून घेत प्रभावी मार्गदर्शन करावे, तसेच हवामान बदलानुसार आवश्यक उपाययोजना सुचवाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी केले. या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील मौजे पिरली येथील प्रगतशील शेतकरी श्री. दत्तू नारायण येरगुडे यांनी मधमाशी पालनाच्या आपल्या यशस्वी प्रवासाविषयी अनुभव सांगितले. त्यांनी २००७ पासून हा व्यवसाय सुरू केला असून, आनंद निकेतन कृषी महाविद्यालय आनंदवन वरोरा आणि भारतीय समाज प्रबोधन संस्था वरोरा येथे डॉ. तात्यासाहेब धानोरकर व डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी या क्षेत्रात यश मिळवले. त्यांनी अनेक शेतकऱ्यांना मधमाशी पालनाचे प्रात्यक्षिक, प्रशिक्षण दिले असून, मधमाशीपालकांचे अनेक गट तयार केले आहेत. किडींच्या नियंत्रणासाठी जैविक औषधांचा अधिकाधिक वापर करावा, रासायनिक घटकांचा माफक वापर करावा, यामुळे मधमाशांचे संरक्षण करता येईल, असे त्यांनी सांगितले. “मधमाशी वाचवा, मधमाशी जगवा,” हा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिला.

त्यांनी शेतीतील मधमाशांचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, कांदा, मोहरी, करडई, सूर्यफूल व भाजीपाला पिकांमध्ये मधमाशीच्या पेट्या ठेवल्यास उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ होते. तसेच, मधमाशी पालन करताना आवश्यक असलेल्या वातावरणाची पूर्तता कशी करावी, हेही त्यांनी समजावून सांगितले.

या कार्यक्रमात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसह विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी पीक संरक्षण व नियोजनविषयी विचारलेल्या प्रश्नांना विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. सुर्यकांत पवार, प्रा. अरुण गुट्टे यांनी सविस्तर उत्तरे दिली.

सूत्रसंचालन डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी केले तर आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले. शेतकरी-शास्त्रज्ञ कृषि संवाद हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरत असून, यामुळे आधुनिक तंत्रज्ञान व संशोधनाची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Friday, March 7, 2025

मराठवाडा विभागीय कृषी महोत्सव - २०२५ चे भव्य आयोजन

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते महोत्सवाचे उद्घाटन


अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, दिंडोरी प्रणित यांच्या वतीने मराठवाडा विभागीय कृषी महोत्सव – २०२५ चे आयोजन ७ ते १० मार्च २०२५ दरम्यान प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम, परभणी येथे करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते करण्यात आले. समारंभास प्रमुख अतिथी म्हणून माननीय खासदार श्री संजयजी जाधव उपस्थित होते. यावेळी गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे, गुरुपुत्र, कृषिरत्न श्री आबासाहेब मोरे, आयुक्त श्री धैर्यशील जाधव, आत्मा परभणीचे प्रकल्प संचालक श्री दौलत चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती कविता नावंदे, तसेच सेवा मार्गाचे विभागीय प्रतिनिधी श्री संदीपभाऊ देशमुख, डॉ. गोविंद साळुंके (बीड), माजी नगराध्यक्ष श्री सचिनजी गोरे (परभणी) यांची प्रमुख उपस्थिती होती.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ) इन्द्र मणि यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शेती आणि आध्यात्मिक विश्वास एकत्रितपणे समाजविकासासाठी महत्त्वपूर्ण आहेत. अध्यात्माच्या जोडीने विकासाचे कार्य करण्याची महाराष्ट्र आणि मराठवाड्याची संस्कृती असून ही बाब प्रसंशनीय आहे. कार्यक्रमाचे आयोजक हे धार्मिक गुरु असून ते राष्ट्र विकास, कृषी विकास यातून समाजाचा विकास सतत साधत आहेत. मराठवाड्यात कृषी क्षेत्रातील संशोधन आणि विकासासाठी विद्यापीठ सातत्याने कार्यरत आहे. विशेषतः गोदावरी तुरीच्या वाणाने महाराष्ट्रासह देशपातळीवर लौकिक मिळवला असून, अनेक शेतकरी लखपती बनत आहेत. विद्यापीठ शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेतून कार्यरत असून, शेतकऱ्यांना दर्जेदार तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण बियाणे, रोपे उपलब्ध करून देत आहे. आज (७ मार्च) मराठवाड्यातील चार शेतकऱ्यांचा आणि दोन शास्त्रज्ञांचा राष्ट्रीय पातळीवर उत्तर प्रदेश येथे सन्मान होत आहे, ही अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांसाठी विद्यापीठ दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबतया उपक्रमांतर्गत शास्त्रज्ञांना थेट शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक मंगळवार व शुक्रवार सायंकाळी ऑनलाइन कृषी संवादही आयोजित केला जातो, असे प्रतिपादन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की, या संस्थेने केलेले कार्य विद्यापीठाच्या कार्यास पूरक असून विद्यापीठ आपल्या सोबत आहे, अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमात तज्ञांचे मार्गदर्शन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन आयोजित केले याबद्दल आयोजकांचे माननीय कुलागुरुनी अभिनंदन करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

या कृषी महोत्सवात विभागीय कृषी प्रदर्शन, पूरक व्यवसाय प्रदर्शन, युवा प्रबोधन, कृषी ढिंढी विज्ञान प्रदर्शन, मराठवाडा कृषी संस्कृती दर्शन, स्वयंचलित यंत्रसामग्री प्रदर्शन, बियाणे व पशुपालन मेळावा, मोफत आरोग्य तपासणी शिबिर यांसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मराठवाड्यातील हजारो शेतकरी, कृषी संस्था, संशोधक, विद्यार्थी आणि कृषी उद्योजकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

कार्यक्रमासाठी सेवा मार्गाचे विभाग प्रतिनिधी डॉ. यशवंत राजेभोसले (माजलगाव), श्री संतोषजी पाटील (छ. संभाजीनगर), श्री विजय कडू पाटील (अहिल्यानगर), श्री देशमुख (नांदेड), श्री रवी पतंगे (परभणी), श्री. अरविंद काका देशमुख (परभणी), सरपंच श्री रमेश शेरे यांसह हजारो सेवेकरी, शेतकरी आणि भाविक या भव्य दिव्य मराठवाडा कृषी महोत्सवास उपस्थित होते.








Thursday, March 6, 2025

जागतिक महिला दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात विशेष कार्यक्रम

 महिलांचा सन्मान कृतीतून सिद्ध व्हावा... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


कोणालाही छोटे करून स्वतः मोठे होता येत नाही, तर आपले कार्य मोठे ठेवावे लागते, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त विद्यापीठाच्या वतीने दिनांक ६ मार्च रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

या कार्यक्रमास माजी लेडी गव्हर्नर व अमरावती येथील तक्षशीला महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. कमलताई गवई आणि आयएएस मिशनचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे, कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांची विशेष उपस्थिती होती.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, पूर्वी कृषि विद्यापीठात मुलींचे प्रमाण कमी होते, मात्र आता ५० टक्क्यांहून अधिक मुली कृषि शिक्षण घेत असून त्या गुणवत्तेमध्ये मुलांपेक्षा सरस ठरत आहेत. सध्या महिला परिवर्तनापेक्षाही काळाचे परिवर्तन होताना दिसून येत आहे. मानवी जीवनामध्ये महिलांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान होतो, तेथे सुख, शांती आणि समृद्धी नांदते. म्हणून महिलांचा सन्मान प्रत्येकाने करावा आणि हे आपल्या कृतीतून सिद्ध व्हावे. याबरोबरच महिला सक्षमीकरणाला गती देण्यासाठी 'Accelerate Action' या जागतिक महिला दिनाच्या संकल्पनेनुसार कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यापीठाने महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.

माननीय कुलगुरू पुढे म्हणाले की, डॉ. कमलताई यांनी समाज जडणघडणीमध्ये उल्लेखनीय कार्य केले. याबरोबरच त्यांचे साधे राहणी आणि उच्च विचार मनाला प्रभावित करणारे असून त्यांच्या सानिध्यात विद्यापीठ जागतिक महिला दिन साजरा करत आहे, याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच डॉ. नरेशचंद्र काठोळे हे दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश टाकतात. त्यांचे मिशन आयएएस, अनेक पुस्तकांचे लेखन, ३५० हून अधिक आयएएस अधिकारी निर्माण करण्याबद्दल योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

माजी लेडी गव्हर्नर आणि प्राचार्य डॉ. कमलताई गवई यांनी विपश्यना जीवन जगण्याची कला असल्यामुळे विपश्यना आणि वृक्षारोपण करत लोककल्याणासाठी चांगले कार्य करण्यावर भर दिला. याबरोबरच जीवनात तडजोड करून यशस्वी आहे, असे नमूद केले. त्या पुढे म्हणाल्या की, शेती करणे हे कठीण आहे, परंतु या कृषि विद्यापीठात मुली बहुसंखेने शिक्षण घेत आहेत याचे कौतुक वाटते. शेतकऱ्यांचे न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी केलेले कार्य विशद करून महिलांनी विशेषतः मुलींनी आर्थिक, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आत्मनिर्भर व्हावे असा सल्ला दिला. कोणत्याही देशाची प्रगती महिलांच्या प्रगतीवर ओळखली जाते असे सांगून भारत देशात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समानतेच्या अधिकारामुळे महिलांना स्वतंत्र आंदोलन उभारावे लागले नाही, असे त्यांनी नमूद केले. महिलांच्या सक्षमीकरणांमध्ये वडील, पती, मुलगा म्हणून पुरुषच प्रोत्साहन देतात. यामुळे अजूनही आपल्या संस्कृतीमध्ये पुरुष श्रेष्ठ असून महिलांनीही पुरुषांचा आदर करावा, असे त्या म्हणाल्या. त्यांनी घर, शेती, स्वतःचे शिक्षण, समाजसेवा सांभाळत तारे वरची कसरत करत माननीय सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायाधीश श्री. भूषण गवई यांची आई म्हणून यशस्वी पालन केले. त्यांचे जीवन घडत असतानाचा चढ-उतार नमूद करून आयुष्यात त्यांचे पती बिहार व केरळ राज्याचे माजी राज्यपाल दिवंगत रा. सू. गवई यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले असे सांगितले.

आयएएस मिशनचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी शेतकऱ्यांची स्थिती गंभीर असून समाजामध्ये शेतकरी सहज ओळखू येतो. यामध्ये चांगला बदल होणे आवश्यक असून यासाठी कृषि विद्यापीठ कार्य करते याचा अभिमान वाटतो असे नमूद केले. ते पुढे म्हणाले की, युवकांमध्ये मध्ये क्षमता असून सध्याच्या स्थितीत त्यांना जागे करण्याची गरज आहे. त्यांनी आयएएस मिशनच्या माध्यमातून आतापर्यंत साडेतीनशेहून अधिक आयएएस अधिकारी घडविले आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीपासूनच आयएएसचा अभ्यास करण्यास प्रवृत्त केले असून रोजचे काम रोजच करा आणि प्रत्येक कार्य स्वतःच्या वेगळ्या पद्धतीने करा असा प्रेरणादायी संदेश देवून प्रोत्साहित केले.

शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार यांनीही महिला विषयी आदर व्यक्त करून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांनी महिलांकडून पुरुषांनी शिकण्याची गरज आहे असे नमूद करून त्यांच्या आई, अर्धांगिनी व सर्व महिलांविषयी मनःपूर्वक आदर व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गोदावरी पवार यांनी केले. सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे आणि डॉ. गजेंद्र लोंढे यांनी आयोजनासाठी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन श्रीमती सारिका नारळे यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय व आभार प्रदर्शन डॉ. फरिया खान यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.